esakal | अग्रलेख : ‘परीक्षा’ शाळांची

बोलून बातमी शोधा

Exam
अग्रलेख : ‘परीक्षा’ शाळांची
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन कसे करावे, याबाबत ‘सीबीएसई’ने सूत्र जाहीर केले आहे. ते बदलांना सामोरे जाणारे आहे. मात्र त्यातल्या व्यावहारिक अडचणीही लक्षात घ्यायला हव्यात. आता खरी परीक्षा आहे ती शाळांचीच.

केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली, त्यांच्या पाठोपाठ आयसीएसई, तसेच महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर सातत्याने प्रश्न उपस्थित आहे, तो मूल्यमापन कसे होणार हा. याचे कारण मूल्यमापनाशिवाय शिक्षणाचा प्रवाह पुढे जाऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने मूल्यमापनासाठी जे सूत्र जाहीर केले आहे, त्याचे महत्त्व आणि परिणाम यांचा विचार व्हायला हवा. केवळ कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीमुळेच नव्हे तर शैक्षणिक सुधारणांचा भाग म्हणूनही परीक्षापद्धतीत बदल हवेतच; पण या बदलांची अंमलबजावणी प्रत्येक शाळा कशा रीतीने करणार हा खरा मुद्दा आहे. सीबीएसईने काढलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या चाचण्या, सहामाही आणि सराव परीक्षा, प्रकल्प अहवाल, अन्य कामगिरी यावर मूल्यमापन करण्यासाठी सात सदस्यांची समिती नेमण्याची शिफारस शाळांना केलेली आहे. यात शाळेच्या मुख्याध्यापकांसह त्याच शाळेतील पाच शिक्षक आणि दोन बाहेरचे शिक्षक असतील. शाळेची गत तीन वर्षांतील कामगिरीही ते तपासतील. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, अंतर्गत कामगिरीतील गुण यांचा विचार करून गुणदान कसे करावे, हे सांगितले आहे.

एकूण प्रक्रिया व्यापक प्रमाणात निर्दोष करण्याचा, गुणवत्तेला दृष्टीआड न करण्याचा आणि वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीची नोंद घेण्याचा यात प्रयत्न केलेला दिसतो, हे खरेच आहे. पण या सगळ्याचे यश अवलंबून आहे, ते शाळा याची अंमलबजावणी कशी करतात, यावरच. याचे कारण मूल्यमापन सार्थ आणि योग्यरीतीने करण्याची ‘परीक्षा’ आता त्या त्या शाळांची असेल. या शाळा जर उत्तम निकाल लावणे एवढेच उद्दिष्ट ठेवून हे मूल्यमापन करू लागल्या तर विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. म्हणूनच तीन महिन्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेण्याची सूचना करण्यात आली असावी. त्यातून मूल्यमापन योग्य रीतीने झाले आहे किंवा नाही, याचा अदमास घेता येऊ शकतो. तेव्हा आता खरी जबाबदारी या बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या शाळांची राहील. विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीशी निकाल संवादी असला पाहिजे, हे शाळांनी पाहावे. वस्तुतः परीक्षांची ही विकेंद्रित पद्धत अनेक शिक्षणतज्ज्ञ आधीपासूनच सांगत होते. नववीपर्यंत जर आपण शाळांवर विश्वास ठेवतो, तर दहावीच्या वर्षात ठेवायला काय हरकत आहे? सातत्यपूर्ण मूल्यमापन हा वास्तविक नवीन शैक्षणिक धोरणाचाही गाभा आहे. त्यामुळे यंदाची ही ‘परीक्षा’ वेगवेगळ्या शाळा कशारीतीने देतात हे पाहणे महत्त्वाचे असेल.

शेवटच्या दोन महिन्यांत अभ्यास करून परीक्षा द्यायची आणि उत्तीर्ण व्हायचे, असा अनेक विद्यार्थ्यांचा परिपाठ असतो. पण या पद्धतीमुळे त्यांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे महत्त्व सगळ्यांच्याच मनावर बिंबवणे आवश्यक आहे आणि नव्या पद्धतीमुळे त्याची सुरुवात होऊ शकेल, अशी आशा आहे. ‘सीबीएसई’ने आपल्या शाळांकरिता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन आणि गुणदानाबाबत जाहीर केलेल्या निकषांनुसार घटक चाचण्यांसाठी १० गुण, सहामाही परीक्षेतील कामगिरीसाठी ३० गुण आणि बोर्डाच्या परीक्षेआधी घेतलेल्या सराव परीक्षेसाठी १० गुण असे वितरण केले आहे. त्यावर आधारित गुणदान केले जाईल. यातील चाचण्यांची नोंद बोर्डाकडे झालेली आहे. सराव परीक्षा किती घेतल्या त्यावर त्याची सरासरी काढून गुण धरले जातील. हे वरकरणी चांगले वाटत असले तरी यातील व्यावहारिक अडचणींचाही विचार करायला हवा.

बोर्ड शाळांवर विसंबले हे जितके खरे आहे, तितकेच कामकाज पार पाडत असताना हलगर्जीपणा झाला, गुणदानात हात सैल सुटला असे वाटल्यास शाळांवर दंडाची कारवाई, मान्यता काढून घेतली जाण्याची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळे शाळांचे प्रशासन एका दबावाखाली राहणार आहे. बरे जर बोर्डाला २० जूनला निकाल जाहीर करायचा असेल तर एकूण प्रक्रियेसाठी दिलेला कालावधी खूपच मर्यादित आहेत. ही प्रक्रिया पार पाडताना महाराष्ट्र, केरळ, दिल्लीसारख्या राज्यांतील बिकट स्थितीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे होता, पण त्याचे प्रतिबिंब यात उमटलेले दिसत नाही. या सगळ्या प्रक्रियांच्या नोंदी, डॉक्युमेंटेशन करणेही अपेक्षित आहे. या सगळ्याला लागणारा अवधी आणि कोरोनाचे आव्हान यांचा विसर पडता कामा नये. ज्ञानार्जन ही प्रेरणा असेल तर त्यातून शिकणारा विद्यार्थी कोणत्याही वेळेला केलेल्या मूल्यमापनाला तयारच असेल. त्यामुळे ती प्रेरणा रुजवणे शिक्षणसंस्थांपुढील आव्हान असेल. त्यामुळे ऐनवेळी अभ्यास करून गुण पदरात पाडून घेण्यापेक्षा सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहात राहून, पुस्तकातील जे समजले, उमगले, पचले त्याची उजळणी करत पुढे जाणे आवश्यक आहे. राज्य सरकार दहावीच्या मूल्यमापनाची पद्धती जाहीर करणार आहे, ते या विचारांना कोणत्या वाटेने नेते, अभिनव काही आणते काय, हे पाहावे लागेल. पडझडीतून, आपत्तीतून, प्रतिकूलतेतून शिकूनच माणूस पुढे जात असतो. ही नवी वाट कशी आकाराला येते, यावरच शिक्षणाची नवी पहाट कशी असेल, हे ठरणार आहे.