esakal | अग्रलेख : सत्त्वपरीक्षा!
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Exam

अग्रलेख : सत्त्वपरीक्षा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दहावी, बारावीच्या परीक्षांचा घोळ संपत नसल्याने पुढील परीक्षा आणि प्रवेशप्रक्रिया दोन्हीही रखडले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या दोघांमध्ये केवळ अस्वस्थता नाही तर ते एका मानसिक तणावाखाली वावरत आहेत. सगळ्याच बाबतीतील अनिश्‍चिततेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर शक्‍य तितक्‍या लवकर तोडगा निघायला पाहिजे.

कोविड महासाथीला आळा घालण्याच्या उपायांवर सर्व लक्ष केंद्रित झाल्यानंतर इतर काही गोष्टींकडे दुर्लक्ष होणार हे काही प्रमाणात स्वाभाविक असले तरी दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सध्या ज्या अनिश्चिततेचा सामना करावा लागतो आहे, त्याला धोरणात्मक संभ्रम कारणीभूत आहे, हे नाकारता येणार नाही. या दोन्ही परीक्षा आपल्याकडे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि वर्षभर किंवा त्याहूनही आधीपासून विद्यार्थी त्यासाठी तयारी करीत असतात. केवळ पुढच्या इयत्तेत जाण्यापुरते त्यांचे महत्त्व नाही, तर पुढील विद्याशाखेची निवड, उच्च शिक्षणाच्या संभाव्य संधी, रोजगाराच्या दृष्टीने कौशल्याविकासाची दिशा अशा अनेक गोष्टी या परीक्षांशी निगडित आहेत. ऑनलाईन, ऑफलाईन आणि काही प्रमाणात खासगी क्‍लासच्या बळावर मुलांनी दहावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केले. तथापि, त्यांच्या क्षमतांचे मूल्यमापन करणाऱ्या परीक्षेचे घोंगडे भिजत पडल्याने त्यांच्यावरचा मानसिक ताण दिवसागणीक वाढत आहे. ‘सीबीएसई’ने दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांवर मूल्यमापन करायचे व नंतर निकाल लावण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र सरकारने दहावीची परीक्षा घेणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर केलेले नाहीत. किंबहुना या विषयावर मंत्रालयाने आणि शालान्त परीक्षा मंडळाने काही वेगळा विचार केला आहे किंवा नाही, हेच स्पष्ट झालेले नाही.

उच्च शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या बारावीच्या परीक्षांसंबधी केंद्रीय शिक्षणमंत्र्यासोबत रविवारी बैठक झाली. पण ती ठोस निर्णयाविनाच पार पडली. बहुतांश राज्यांचे शिक्षण मंत्री, सचिव यांनी परीक्षा घ्यावी,अशी आग्रही भूमिका मांडली. सर्व राज्यांचे अभिप्राय व सूचना २५मेपर्यंत मिळाल्यानंतर परीक्षेला मूर्त रूप येईल. महाराष्ट्रातील बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेच्या तारखा, तसेच किती विषय असतील, परीक्षेची पद्धती कशी असेल, हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. तथापि, ही परीक्षा कधी, केव्हा, कशा प्रकारे होणार, ऑनलाईन की ऑफलाईन; की दोन्हीही पद्धतीने होणार, याविषयी काहीच स्पष्ट झालेले नाही. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप कसे असेल, किती टप्प्यात परीक्षा होणार, वेळापत्रकापासून विविध बाबतीत लवचिकता राहणार की नाही, असे एक ना अनेक प्रश्न शिक्षण खात्यासह संबंधित पालक, विद्यार्थ्यांना छळत आहेत. जोपर्यंत या सगळ्यांची तड लागत नाही, तोपर्यंत अभियांत्रिकी, वैद्यकीयसह हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र, कायदा यांच्यासह बहुतांश ज्या विद्याशाखांकरता सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) होतात, त्यांचेही वेळापत्रक रखडत आहे. गेल्या वर्षापासून ही रखडपट्टी सुरू आहे.

मोकळी हवा आणि मन मोकळे करण्यासाठी सामाजिक अवकाश आणि समवयस्कांचा सहवास, शिक्षकांचे थेट मार्गदर्शन यांच्याशी आलेले तुटलेपण यामुळे विद्यार्थी आधीच हवालदील झाले आहेत. जे काही सुरू आहे, ते सर्व आभासी- व्हर्च्युअल. शिवाय, करिअरबाबतची स्वप्ने, पालकांच्या आशा-अपेक्षा यांचे ओझे आहेच. परीक्षेसारख्या युद्धजन्य स्थितीला तोंड देण्याची सज्जता किती दिवस राखायची ही चिंता त्यांच्या उमेदीची आणि सहनशीलतेची परीक्षा पाहात आहे. चार भिंतीत राहिल्याने सगळ्यांमध्येच अस्वस्थता आहे. सकारात्मकता बाळगत अभ्यासातला उत्साह आणि सर्जनशीलता मुले किती काळ टिकवून ठेवू शकतात, हीच अभ्यासक्रमापेक्षा अधिक जटील अशी त्यांची सत्त्वपरीक्षा ठरली आहे.

विद्यार्थी आणि पालकांवरील हा ताण लक्षात घेऊन सरकारने सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करायला हवा. तत्त्व आणि व्यवहार, शैक्षणिक हित आणि वैयक्तिक सुरक्षा यांच्यात मेळ साधणारे धोरण आखून संदिग्धता लवकरात लवकर दूर करायला हवी. शक्‍य-अशक्‍यतांचा साकल्याने विचार करून विद्यमान परीक्षा पद्धतीत काही कल्पक बदल करणे, तिचे वेळापत्रक, प्रश्नांचे स्वरूप, त्यांची काठिण्य पातळी, विद्यार्थ्यांचे झालेले ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण, अभ्यासक्रमाची कार्यवाही अशा अनेक बाबींचा विचार करून परीक्षेचे स्वरूप तातडीने स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. छत्तीसगडमध्ये बारावीची परीक्षा एक जूनपासून होणार आहे. त्याकरता ठराविक केंद्रांवरून विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका घेवून घरी जायचे आहे. नंतरच्या पाच दिवसांत पेपर सोडवून ते त्या केंद्रांवर जमा करायचे आहेत. त्यानंतर त्यांची तपासणी करून निकाल जाहीर होणार आहे. अशा काही कल्पक पर्यायांचा आणि मार्गांचा विचार करण्याची आज आवश्‍यकता आहे. ही प्रक्रिया पार पडत असतानाच विविध विद्याशाखा आणि अभ्यासक्रमांच्या सीईटींबाबतही तितकीच पारदर्शकता प्रणाली, पद्धती आणि स्पष्टता जितक्‍या लवकर येईल, तितके बरे होईल. नीट, जेईई अशा एक ना अनेक परीक्षांचे वेळापत्रकच रखडल्याने त्यासाठीची तयारी किती दिवस करायची, किती वेळा तीच तीच घोकंपट्टी करायची या दुविधेत विद्यार्थी आहेत. त्यांचे मानसिक द्वंद्व जितक्‍या लवकर संपेल तितके विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य आणि मनोबल टिकून राहील, ते तितक्‍या स्वस्थ मनाने परीक्षा सामोरे जातील. नाहीतर वाढणारे ताणतणाव नव्या समस्यांना आणि आव्हानांना जन्माला घालतील.

loading image