अग्रलेख : बालिश बहु बडबडली! Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut
अग्रलेख : बालिश बहु बडबडली!

अग्रलेख : बालिश बहु बडबडली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एका अभिनेत्रीने भारतीय स्वातंत्र्याबद्दल जे तारे तोडले आहेत, त्याचा ज्ञानाशी वा विश्लेषणाशी काही संबंध नाही. अशा प्रकारचा विचार करणाऱ्यांचे प्रलाप अधूनमधून सुरू असतात. फरक एवढाच, की आधीच्या काळात तसल्या गणंगांची सहजपणे उपेक्षा केली जात असे. आता मात्र सेलिब्रिटी वलयाच्या रंगीत माळा मिरवणाऱ्या व्यक्ती अशा बालिश वक्तव्यांतून उपेक्षेचा विषय होण्याऐवजी प्रसिद्धीच्या धनी बनताना दिसत आहेत.

सुप्रतिष्ठित अशा ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत वादग्रस्त बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा आपल्या अचाट बुद्धिमत्तेचे दर्शन घडविले आहे! अवघा भारत आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आपल्या स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ थाटामाटाने साजरा करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, हेच म्हणजे १९४७ मध्ये देशाला मिळालेले ‘स्वातंत्र्य’ ही ‘भीक’ होती आणि भारतवासीयांना खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्येच मिळाले, असे तारे कंगनाबाईंनी तोडले आहेत. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना, कंगनाने काढलेल्या या ‘जाज्ज्वल्य’ उद्‍गारांनंतर जोरदार टाळ्या पडल्या!

वृत्तवाहिन्यांच्या अशा कार्यक्रमांत इनेगिने मोजकेच असे समाजातील प्रतिष्ठित लोक आमंत्रित केलेले असतात. त्यापैकी कोणीही कंगनाच्या विधानास आक्षेप घेतला नाही. एवढेच नव्हे सूत्रसंचालन करणाऱ्या ‘अँकर’नेही या विधानाबद्दल कंगनावर कौतुकाच्या चार शब्दांच्या अक्षताच टाकल्या! काही इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी ‘भक्तांच्या मांदियाळी’त सामील होऊन जे काही दिवे रोजच्या रोज लावायला सुरुवात केली आहे, ते बघता हे अपेक्षितही आहे. देशात २०१४ आधीच्या ६०-६५ वर्षांत काही म्हणता काहीही झालेले नाही, असा सूर यापूर्वीही अनेकांनी लावला आहे. त्यामुळे कंगनाने तोडलेल्या या ताऱ्यांत फार काही नवी माहिती वा ज्ञान वा विश्लेषण नाही. फरक एवढाच, की आधीच्या काळात तसल्या गणंगांची सहजपणे उपेक्षा केली जात असे. आता मात्र सेलिब्रिटी वलयाच्या रंगीत माळा मिरवणाऱ्या व्यक्ती अशा बालिश वक्तव्यांतून उपेक्षेचा विषय होण्याऐवजी प्रसिद्धीच्या धनी बनताना दिसत आहेत.

गेले जवळपास सव्वा वर्षं शेतकरी हे राजधानी दिल्लीला वेढा घालून बसले आहेत. इंधनाच्या किमतीत मध्यंतरी पाच-दहा रुपयांची कपात झाली असली, तरीही त्यानंतरचे भावही आवाक्याबाहेरचे आहेत. इंधनदरातील या अकटोविकट महागाईचा परिणाम हा सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीत झाला आहे. त्याशिवाय, पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तान तसेच चीन हे एकमेकांच्या हातात हात घालून नवनवी आव्हाने उभी करत आहेत. कोरोनामुळे देशातील आरोग्य तसेच शिक्षण या क्षेत्रांची वाताहात झाली आहे. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अशा विषयांवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच कंगनाबाईंनी ही खेळी तर केली नाही ना, असा प्रश्न त्यामुळेच समोर येतो. कंगना ही भाजपची बॉलीवुडमधील सर्वात ‘लाडकी’ अभिनेत्री! कंगनाने आतापावेतो साधारणपणे ३०-३५ चित्रपटांत नायिकेच्या भूमिका आपल्या मगदुरानुसार पार पाडल्या असून एका चित्रपटासाठी ती १०-१२ कोटींचा मेहनताना घेते, असे सांगण्यात येते.

मात्र, कोणत्याही चित्रपटातील भूमिकेपेक्षा कंगना खऱ्या अर्थाने प्रकाशात आली ती सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे. मग तिची शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी जाहीर खणाखणी झाली आणि मोदी सरकारने तिला तातडीने ‘केंद्रीय राखीव पोलिस दला’मार्फत सुरक्षा पुरवली! हा तिचा मोठाच बहुमान होता. कारण यानिमित्ताने सीआरपीएफची सुरक्षा मिळवणारी ती बॉलीवुडमधील पहिली आणि एकमेव ‘स्टार’ आहे. शिवाय, त्यामुळेच अशी म्हणजेच ‘वाय कॅटॅगरी’तील सुरक्षा असलेले देशाचे सरन्यायाधीश, गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आदी मोजक्याच ६० व्यक्तींमध्ये तिचा समावेश झाला आहे!

मात्र, सुशांतसिंह प्रकरणात पाठीशी उभे राहणारे भाजप नेते तसेच कार्यकर्ते यांची तिने आता या नव्या शोधामुळे भलतीच पंचाईत करून टाकली आहे! खासदार वरुण गांधी यांनी कंगनाच्या या विधानाची खिल्ली उडवताना हा निव्वळ वेडेपणा आहे की देशद्रोह, असा सवाल उपस्थित केला आहे. तर दिल्ली भाजप प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी कंगनाचे हे विधान म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या वीरांचा अपमान असून, त्याबद्दल तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, बाकी सुशांतसिंह प्रकरणी कंगनाच्या बाजूने हिरीरीने पुढे आलेले भाजपचे सर्वच बोलके पोपट तोंडात मिठाची गुळणी घेऊन, स्वस्थचित्त आहेत, यात नवल ते काहीच नाही! त्याचे मूळ कंगनाने जनतेला भेडसावणाऱ्या अन्य विषयांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवले, यात आहे.

मध्यंतरी विद्यमान सत्ताधाऱ्यांशी जवळीक असलेल्या संघटनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने १९४७ मधील स्वातंत्र्य इंग्रजांनी ९९ वर्षांच्या लीजवर दिले आहे, असे विधान करून नेमकी हीच खेळी केली होती. कंगनाने तोडलेले हे तारे म्हणजे याच मालिकेतील एक नवा दिवा आहे आणि तो देशाला ध्रुवीकरणाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. येत्या वर्षांतील विधानसभा निवडणुकांसाठी हे असले उपद्व्याप सुरू असतील, तर भारतीय लोकशाहीचे भवितव्य किती अंधकारमय आहे, हे वेगळे सांगायला नको. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्वरित या विधानाबद्दल कंगनाला जाहीरपणे खडसावायला हवे. तसे करण्याचे त्यांनी टाळले तर त्यांना हेच तर हवे आहे, यावर शिक्कामोर्तब होईल.

loading image
go to top