अग्रलेख : मुजोरी आणि मजबुरी

केंद्रातील मंत्रिपदाची झूल अंगावर चढली की काही नेत्यांना कशी मस्ती आणि गुर्मी येते, याची अनेक उदाहरणे या देशाने पाहिली आहेत.
Ajay Mishra
Ajay MishraSakal

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुजोर वर्तनानंतरही भाजपश्रेष्ठींनी तातडीने कारवाई करण्याचे टाळले. मतपेढीचाच विचार करून भाजप जर हे वर्तन खपवून घेणार असेल, तर इतरांपेक्षा वेगळा असल्याच्या भाजपच्या दाव्यावर विश्वास कसा ठेवायचा?

केंद्रातील मंत्रिपदाची झूल अंगावर चढली की काही नेत्यांना कशी मस्ती आणि गुर्मी येते, याची अनेक उदाहरणे या देशाने पाहिली आहेत. मात्र, सध्या केंद्रीय गृहखात्याचे राज्यमंत्री अजय मिश्रा हे ज्या मस्तवाल पद्धतीने वागत आहेत, ते बघितले की खरा प्रश्न पडतो तो हा की भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्रे हाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची अशी काय मजबुरी आहे, ज्यामुळे ही मुजोरी खपवून घेतली जाते? शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना या मिश्रा यांच्या चिरंजीवांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर परिसरात थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली आणि तिघा आंदोलक शेतकऱ्यांना चिरडून ठार केले. खरे तर याच मंत्रीपुत्राने आधी एका आंदोलकावर गोळी झाडल्याचाही आरोप आहे.काही दिवस हे चिरंजीव कायद्याच्या कक्षेच्या बाहेर राहून राजरोस फिरत होते.

अखेरीस जनतेचा क्षोभ; तसेच न्यायालयाचा दणका यानंतर उत्तर प्रदेश सरकारला या चिरंजीवांना गजाआड करणे भाग पडले तरी त्यांच्यावर लावलेली गुन्हेगारी कलमे ही सौम्य स्वरूपाचीच होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल आला आणि त्यात ही घटना सहजासहजी घडलेली नाही तर तो पूर्वनियोजित कट होता, असा निष्कर्ष निघाला. त्यानंतरच मग योगी आदित्यनाथ सरकारला अधिक कठोर कलमे या मंत्रीपुत्राविरोधात लावणे भाग पडले. मात्र, हे मिश्रा महोदय त्यामुळे कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यांनी हा संताप एका पत्रकाराच्या अंगावर धावून जात सर्वांपुढे ‘सादर’ केला. त्या पत्रकाराचा ‘गुन्हा’ एवढाच होता की, हे मंत्रीमहोदय एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात आले असता, त्याने या नव्याने लादलेल्या कलमांबाबत त्यांच्याकडे पृच्छा केली. केवढे हे धाडस! त्यामुळे मंत्रिमहोदयांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्या पत्रकाराच्या हातातील टीव्ही चॅनेलचा बूम हिसकावून घेण्याचा प्रयत्न तर केलाच; शिवाय समस्त पत्रकारांची त्यांनी ‘चोर’ आदी शेलक्या विशेषणांनी संभावनाही केली. त्यानंतरदेखील भाजप हायकमांड म्हणजेच मोदी आणि शहा हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघूनही स्वस्थचित्त आहेत. त्यामुळेच या दोघांपुढे मिश्रा महोदयांनी काही मजबुरी तर उभी केलेली नाही ना, असा प्रश्न समोर येतो.

मतपेढीची काळजी?

या प्रश्नाचे एक उत्तर अगदी सहज देता येते आणि त्याचे मूळ हे अडीच-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आहे. खरे तर मिश्रा यांच्या चिरंजीवांनी हा जो काही शेतकरी आंदोलकांवर थेट गाडी घालण्याचा निर्घृण असा प्रकार केला तेव्हाच त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी व्हायला हवी होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही आणि चिरंजीव गजाआड गेल्यानंतरही पिताश्री थेट गृहखात्याचेच कामकाज करत राहिले. एकीकडे दस्तुरखुद्द मोदी हे आपल्याच पक्षाच्या खासदारांना ‘वर्तणुकीत बदल करा; अन्यथा आम्ही बदल करू!’ म्हणजेच पुढच्या निवडणुकीत तुम्हांला उमेदवारी देणार नाही, अशा सूचक धमक्या देत असतानाही हे मिश्रा महोदय मात्र सुखेनैव पत्रकारांची संभावना ‘गुंड’ म्हणून करताना, स्वत:च गुंडागर्दी करताना टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत!

तरीही मोदी वा शहा त्यांच्या विरोधात काही कारवायला धजत नाहीत, याचे एक कारण म्हणजे उत्तर प्रदेशात जाती-पातींची गणिते जमवण्यास बसलेल्या मोदी-शहा यांना मिश्रा प्रतिनिधित्व करत असलेल्या मतपेढीच्या कथित नाराजीचे भय वाटते काय? तंसे असेल तर कायद्याचे राज्य या कल्पनेला काय अर्थ उरतो? मिश्रा यांचा वर्तन व्यवहार पाहता त्याच्यामागे कोणी आहे की नाही याचा विचार न करता कयदा आणि सार्वजनिक जीवनातील सभ्यतेच्या चौकटींचा विचार करुन कारवाई केली पाहिजे. ते टाळून कणखर नेते काय साधताहेत? खरे तर या मतपेढीचा विचार करण्यापेक्षा भाजपने शेतकरी आंदोलनामुळे देशभरात निर्माण झालेल्या असंतोषाचा अधिक गांभीर्याने विचार करणे प्राप्त परिस्थितीत गरजेचे आहे. मिश्रा यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी होती. शिवाय ‘जगाला कसे वागावे, कसे बोलावे, काय खावे,’ यासंबंधात शांतिपाठ देणारा समस्त भाजप मिश्रा यांच्या गुंडागर्दीकडे डोळेझाक करत आहे. ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ म्हणून डिंडिम वाजवणाऱ्या या पक्षाला हे शोभणारे नाही. अखेर मिश्रा यांच्याविरोधातील जनक्षोभ लक्षात घेऊन त्यांना तातडीने दिल्लीस पाचारण करण्यात आले आहे. त्यांना आता भाजप हायकमांडपुढे आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना भाजप केवळ समज देऊन सोडून देते, की त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करते, ते कळेलच. मात्र, आता त्यांची हकालपट्टी झाली तरी भाजपची अब्रू गेली ती गेलीच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com