
अमेरिकेतील मुदतपूर्व निवडणूक म्हणजे अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर व्यक्त झालेले जनमतच असते. त्यांच्या कारकिर्दीत कारभाराच्या गाड्याची दिशा योग्य आहे की नाही, यावरचा तो कौल असतो.
अग्रलेख : विश्वासार्हतेचा कौल
अमेरिकेतील मुदतपूर्व निवडणूक म्हणजे अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर व्यक्त झालेले जनमतच असते. त्यांच्या कारकिर्दीत कारभाराच्या गाड्याची दिशा योग्य आहे की नाही, यावरचा तो कौल असतो. त्याचा अमेरिकेसह जगाच्या राजकारणावर आणि स्थैर्यावर भलाबुरा परिणाम होत असतो. म्हणून हा कौल महत्त्वाचा. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडेन २०२०मध्ये निसटत्या बहुमताने निवडून आले. त्यानंतर त्यांच्या निवडीपासून ते नेतृत्वावर आणि सरकारच्या कारभारावर त्यांनी पराभूत केलेले डोनाल्ड ट्रम्प सातत्याने आगपाखड करायचे. याही निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या ट्रम्प महाशयांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सत्ताधारी बायडेन यांच्या कारभाराविरोधात तुफान राळ उठवली होती.
त्यामुळे अमेरिकेतील आतापर्यंतच्या मुदतपूर्व निवडणुकांच्या परंपरेनुसार सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाला किंमत मोजावी लागेल आणि रिपब्लिकनांची सरशी होईल, असा होरा होता. तथापि, तो धुळीला मिळवत डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बायडेन यांच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. लोकप्रियता घसरलेली असताना मिळालेले हे यश त्यांना आणि त्यांच्या पक्षाला उभारी देणारे आहे. त्यामुळेच जी-२० देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी वाटाघाटीसाठी जाताना त्यांच्यातला आत्मविश्वास दुणावलेला दिसला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या या यशात त्यांच्या कारभाराचा जितका वाटा आहे, तितकाच ट्रम्प यांच्या एकारलेपणाचाही आहे.
कोणत्याही पक्षासाठी यश मिळवून देणारा नेता हे त्याचे बलस्थान असतो. त्याच्या बळावर निवडणुकांचा फड जिंकता येतो आणि सत्तेची खुर्चीही संपादित करता येते. तथापि, आत्ममग्न झालेला, एकाधिकारशाही करणारा नेता मिळाला तर तो त्या पक्षाची जोखीमही ठरू शकतो, हेच खरे! सध्या अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाची अवस्था तशी झालेली आहे. ‘अमेरिका फर्स्ट’, ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशा लोकानुनयवादी घोषणा करत ट्रम्प यांचे नेतृत्वाचे नाणे चलनी ठरले. ट्र्म्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांचा कारभार आणि विधाने, निर्णय आणि धोरणे नेहमीच चर्चेची ठरली. त्यावर उलटसुलट मतप्रवाह व्यक्त झाले. अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन विजयी झाले तेव्हा पराभूत ट्रम्प यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा घोशा लावला.
अमेरिकेच्या लोकशाहीला आणि निवडणूक प्रक्रियेला काळिमा लावणारी कृत्ये त्यांच्या समर्थकांनी केली. ट्रम्प यांना २०२४ मधील अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे. त्याची मोर्चेबांधणी ते या निवडणुकीनिमित्ताने करत होते. तथापि, त्यांना चार पावले मागे नेण्याचे काम निकालाने केले आहे. ट्रम्प अध्यक्षपदाचे उमेदवार झाल्यास त्यांना आव्हान देण्याची ताकद फ्लोरिडामधील त्यांच्याच पक्षाचे विजयी उमेदवार रॉन डिसँटिस यांच्यात आहे. डिसँटिस यांना पक्षाची ताकद देऊन निवडून आणण्याऐवजी ट्रम्प यांनी त्यांच्याविरोधात अश्लाघ्य पद्धतीची टीकामोहीम चालवली, चारित्र्यावर शिंतोडे उडवले. एवढेच नव्हे तर या निवडणुकीत केवळ आपले खुशमस्करे असलेल्या, फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्यांना ट्रम्प यांनी उमेदवारी दिली आणि त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. उलट, पक्षाशी एकनिष्ठ, चांगल्या पार्श्वभूमीचे ट्रम्प यांनी न निवडलेले उमेदवार विजयी झाले. या पराभूतांमध्ये डग मॅस्त्रिनो (पेनसिल्व्हानिया), डॅन कॉक्स, जे. आर. मॅजेवस्की, येस्ली व्हेगा आदींचा समावेश आहे. यातील मॅस्त्रिनो यांनी तर जानेवारी २०२०मध्ये कॅपिटॉल हिलवर जी लोकशाहीविरोधी हुल्लडबाजी झाली त्यासाठी मनुष्यबळही पुरवले होते.
अध्यक्ष बायडेन यांना अनुभव मोठा असला तरी त्यांचे वय आणि वक्तृत्व आड येते, या त्यांच्या मर्यादा निवडणुकीने अधोरेखित केल्या. चाळीस वर्षांत पहिल्यांदाच टोकाची वाढलेली महागाई, कोरोनोत्तर काळात नाजूक बनलेली अर्थव्यवस्था, मंदीचे सावट, पर्यावरणविषयक समस्यांवर तोडगा काढतानाची दमछाक, चीनबरोबरील व्यापार-युद्ध आणि त्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठीचे प्रयत्न, रशिया-युक्रेन युद्धाची व्याप्ती, त्याची युरोपसह अमेरिकेला मोजावी लागलेली किंमत अशा कितीतरी मुद्द्यांना यानिमित्ताने हात घातला गेला. देशांतर्गत पातळीवर पारंपरिक वंशवाद, ट्रम्प यांनीच नेमलेल्या न्यायाधीशांनी गर्भपातबंदीचा दिलेला निर्णय, वाढती गुन्हेगारी अशाही बाबी प्रचारात आल्या. तरीही बायडेन यांच्या भाषेत सांगायचे तर, ‘लोकशाहीविरोधी, फुटिरतावादी, एकाधिकारशाही वृत्तीला अमेरिकेतील जनतेने नाकारले आहे’.
अमेरिकी सिनेटवर वर्चस्व राखण्यात बायडेन आणि त्यांचा डेमोक्रॅटिक पक्ष यशस्वी झाला आहे. ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचे आणि मुद्द्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचे मतांत रूपांतर होत नाही, हे त्या पक्षाच्या धुरिणांनाही उमगले आहे. त्यांचे एकारलेले नेतृत्व आणि त्याच्या छायेतून रिपब्लिकन पक्षाला बाहेर काढावे, तर त्यांची लोकप्रियता आड येऊ शकते. त्यामुळे आगामी काळात उभय पक्षांतर्गत घडामोडीच अध्यक्षपदाच्या २०२४मधील निवडणुकीची दिशा ठरवतील, हे नक्की. मात्र, बायडेन यांना या विजयाने अमेरिकेबाबत धोरणात्मक आर्थिक, परराष्ट्रीय निर्णय घेणे, तसेच देशांतर्गत विषयांवर तोडगा काढण्यास मिळालेली मोकळीकही लाखमोलाची आहे.