अग्रलेख : गुंगाऱ्याचे गांभीर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

अमृतपालसिंग आणि त्याला बळ देणाऱ्या शक्तींना निष्प्रभ करण्यासाठी सुरक्षेच्या पातळीवर आणि राजकीय पातळीवरही ठोस प्रयत्नांची गरज आहे.

अग्रलेख : गुंगाऱ्याचे गांभीर्य

अमृतपालसिंग आणि त्याला बळ देणाऱ्या शक्तींना निष्प्रभ करण्यासाठी सुरक्षेच्या पातळीवर आणि राजकीय पातळीवरही ठोस प्रयत्नांची गरज आहे.

फुटीचे बीज दगडावरही रुजते, असे म्हणतात. पण एकदा का ते वाढीला लागले की, त्याची विषवल्ली व्हायला वेळ लागत नाही. ऐंशीच्या दशकात दहशतवादी, फुटिरतावादी कारवायांनी होरपळलेल्या पंजाबात सध्या अशांततेचे वातावरण आहे. ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा नेता अमृतपालसिंग याने सरकारी यंत्रणेला, कायदा- सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याचे कृत्य केले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी सारी पोलिस यंत्रणा गेली काही रात्रीचा दिवस करत आहे; पण अमृतपाल गुंगारा देतो आहे. यातून अनेक प्रश्न उभे राहतात. तपासयंत्रणेच्या कार्यक्षमतेविषयी ते आहेतच. पण ते तेवढेच नाहीत.

एका व्यक्तीचे अवाजवी प्रस्थ वाढवून राज्यात अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्तींना वेगळे पाडण्यासाठी, निष्प्रभ करण्यासाठी हे प्रकरण राजकीय पातळीवर नीट हाताळायला हवे. केवळ कायदा-सुव्यवस्था एवढ्या सीमित दृष्टिकोनातून याकडे पाहून चालणार नाही. हे जसे देशांतर्गत परिस्थितीबाबत आहे, तसेच देशाबाहेरच्या कारवाया रोखण्याबाबतही आहे. ब्रिटनने भारतीय उच्चायुक्तालयाला नीट सुरक्षा पुरवली नाही, याविषयी भारताने व्यक्त केलेला संताप रास्त होता. पण हा प्रतिसाद एवढ्यापुरता राहू नये. तो अधिक सर्वसमावेशक असावा. पोलिसांनी अमृतपालच्या नातेवाईकांसह आतापर्यंत दीडशेवर व्यक्तींना त्याला मदत केली, किंवा माहीतगार म्हणून ताब्यात घेतले आहे.

त्यातील अनेकजण आसामातील तुरुंगात आहेत. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले, तरी त्याचा सुगावा लागत नाही. त्यामुळे पोलिस, तपास यंत्रणा आणि गुप्तचर संस्था यांच्या कार्यक्षमतेबाबत संताप आणि नाराजी आहे.

उच्च न्यायालयानेदेखील ऐंशी हजारांचा फौजफाटा असतानाही अमृतपाल सापडत नसल्याने सरकारला फटकारले. ही नामुष्की कशी टाळायची, असा प्रश्‍न पंजाबातील आम आदमी पक्षाच्या भगवंत मान यांच्या सरकारपुढे आहे. दुसरीकडे पंजाबातील फुटिरतावादाचे गाडले गेलेले भूत उकरून काढण्याचे काम परदेशातील काही जण करीत आहेत. ब्रिटन,अमेरिका, कॅनडा यासारख्या देशातील भारतीय वकिलातींसमोर निदर्शने झाली. कोणतीही विषवल्ली वाढण्याआधीच मुळासकट उपटून टाकलेली बरी. या प्रश्‍नाकडे देशासमोरील आव्हान म्हणूनच पाहावे लागेल.

साधारण वर्षभरापूर्वी पंजाबात सत्तांतर होऊन,‘आप’चे सरकार सत्तेवर आले. सत्ताधारी काँग्रेसला जनतेने सपशेल नाकारले; तर भाजप आणि त्याचा एकेकाळचा मित्र शिरोमणी अकाली दलाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गहू-तांदळाचे कोठार असलेल्या कृषिप्रधान पंजाबात समस्यांचा सुकाळ आहे. त्याचा सामाजिक जीवनावर परिणाम होतो आहे. मद्य, अमली पदार्थांच्या विळख्यात येथील तरुण पिढी बरबाद होते आहे. बेरोजगारीची वाढती समस्या, शेतीच्या प्रश्‍नांतील वाढता गुंता यामुळे भर पडत आहे. सीमावर्ती असलेल्या या राज्यात पाकिस्तानच्या कारवाया वरचेवर सतावत असतात.

सध्या अमृतपालचा शोध घेत असताना त्याला पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’कडून मदत तर मिळत नाही ना, त्याने परदेशात पलायन केलेले नाही ना, अशाही दृष्टिकोनातून तपासयंत्रणा शोध घेत आहेत. मुळात पंजाबचा वारसा सांगणाऱ्या या ‘वारीस पंजाब दे’कडे वेळीच का लक्ष दिले नाही, हा प्रश्‍न आहे. त्याचा संस्थापक दीप सिद्धूच्या अपघाती मृत्यूनंतर अमृतपालने दुबईतील नोकरी सोडून त्याची धुरा स्वीकारली. फुटिरतावादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेची नक्कल आणि त्याचाच अजेंडा घेऊ पाहणाऱ्या अमृतपालच्या हालचालींवर, कृत्यांवर देखरेख ठेवून वेळीच त्याला का आवरले गेले नाही? त्याने अजनाळा येथे कार्यकर्त्याला सोडवण्यासाठी कायद्याची सर्रास पायमल्ली केली तेव्हा त्याच्यावर कारवाईचा बडगा लगोलग का उगारला नाही, असे कितीतरी प्रश्‍न निर्माण होतात. ‘कर्तृत्वापेक्षा प्रतिमा महान’ असा प्रकार त्याच्याबाबत घडला, त्यातून त्याला राजकीय आणि सामाजिक स्तरातून बळ मिळाले.

तपासादरम्यान हाती लागलेली शस्त्रास्त्रे, तसेच इतर घडामोडीतून त्याची विश्‍वासार्हता कमी होत आहे, हे निश्‍चित. पण म्हणूनच त्याला वेगळे पाडून निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. भिंद्रनवाले असतानाही त्याच्या कारवायांना ब्रिटन, अमेरिका, कॅनडातून खलिस्तानधार्जिण्यांकडून खतपाणी मिळत होते. रसद पुरवली जात होती. आजही त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. लंडन, सॅन फ्रॅन्सिस्कोमधील भारतीय वकिलातींसमोर झालेल्या निदर्शनातून स्पष्ट होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण दिल्लीतील ब्रिटनच्या वकिलातीच्या इमारतीजवळील सुरक्षेत मोठी कपात केली. त्या देशांकडे निषेधही नोंदवला.

मात्र फुटिरतावादासारख्या समस्येवर तोडगा काढत असताना त्याला परकी भूमीवर बळ मिळता कामा नये, यासाठी अधिक व्यापक प्रयत्नही करावे लागतील. उभय देशांतील सौहार्द, मैत्र अधिक कुशलतेने जपावे लागेल. ते, हेही ध्यानात घ्यावे. पंजाबात ‘आप’चे आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. या दोन पक्षांमधील स्पर्धा व्यापक देशहिताला मारक ठरणार नाही, याबाबत कटाक्ष ठेवावा लागेल. अमृतपालसिंगमध्ये बळ कोणी भरले याची शहानिशा करून दोषींना दंड दिलाच पाहिजे. पण ही समस्या हाताळताना संकुचित राजकीय स्वार्थाला थारा नको.