
बॅडमिंटन हा खेळ प्रामुख्याने वैयक्तिक, अगदी ‘टेनिस’सारखा. पण त्याला जेव्हा सांघिक खेळाचे स्वरूप येते, तेव्हा बात न्यारीच असते.
बॅडमिंटन हा खेळ प्रामुख्याने वैयक्तिक, अगदी ‘टेनिस’सारखा. पण त्याला जेव्हा सांघिक खेळाचे स्वरूप येते, तेव्हा बात न्यारीच असते. एकमेका सहाय्य करू... असे म्हणत गाजवलेले शौर्य आणि मिळवलेले यश प्रत्येक खेळाडूचे असले तरी त्या यशाला एक वेगळी चमक असते. थॉमस करंडकाचे भारतीयांनी मिळवलेले ऐतिहासिक अजिंक्यपद म्हणूनच अभिमानास्पद. प्रत्येक बोट एकसारखे नसते. पण पाचही बोटांची वज्रमूठ विलक्षण ताकद निर्माण करते. याचा प्रत्यय या विजयाने पुन्हा एकदा दिला आहे. नंदू नाटेकर यांच्यापासून सुरू झालेली दिग्गज खेळाडूंची परंपरा, प्रकाश पदुकोन, श्रीकांत वाड, पूल्लेला गोपीचंद यांनी वाढवली आणि त्यानंतर पुढच्या पिढीचे शिलेदार किदांबी श्रीकांत, पुरपल्ली कश्यप, एच.एस. प्रणोय, लक्ष्य सेन यांनी कायम ठेवली. नव्या पिढीच्या या खेळाडूंमध्ये समोर कितीही प्रबळ प्रतिस्पर्धी असला तरी त्याला हरवण्याची क्षमता नक्कीच आहे. पण सांघिक विजेतेपद मिळवायचे असेल तर उत्तम परस्पर समन्वय असावा लागतो. त्याचेच फलित म्हणजे बॅडमिंटन संघाने मिळविलेले अजिंक्यपद. कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, चीन अशा बलाढ्य संघांनी यापूर्वी हे दाखवून दिले आहेच.
भारतीय बॅडमिंटन म्हटले, की साईना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू अगदी कोणाच्याही डोळ्यासमोर येतात;आता या खेळात भारतीय पुरुषांनीही लक्ष वेधून घेतले आहे. लक्ष्य सेन, श्रीकांत, प्रणोय, सात्विकरा-चिराग शेट्टी या सर्वांनी भारतीय पुरुष बॅडमिंटनच्या नव्या युगाचा बिगुल फुंकला आहे. सध्या सर्वत्र ‘आयपीएल’चा भोंगा वाजत आहे. भले ‘टीआरपी’च्या निकषावर त्याचा आवाज काहीसा कमी झाला असेलही; पण या गोंगाटात भारताच्या बॅडमिंटनमधील ‘पाच पांडवां’नी आपल्या कीर्तीची पताका फडकवली. टोकियो ऑलिंपिकमधील यशानंतर क्रिकेटेतर खेळात क्रांती घडवली जात आहे, यात शंकाच नाही.
आम्ही वैयक्तिक फायदाचा विचार करत नसतो; या विजेतेपदामुळे आम्ही कोण कोण जिंकलो, हे कदाचित कोणाला समजणारही नाही, पण भारत जिंकला, असे बोलले जाईल. तेच आमच्यासाठी लाखमोलाचे आहे’. थॉमस कप जिंकणाऱ्या संघातील आणि निर्णायक क्षणी विजय मिळवणाऱ्या श्रीकांतचे हे उत्तर. पदक स्वीकारल्यानंतर तिरंगा उंचावला जात असताना आणि राष्ट्रगीत गायले जात असताना संघातील सर्वच जण सलाम करीत असलेले हे दृश्य तमाम भारतीयांसाठी गर्वाचे होते. हाच श्रीकांत कधी काळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी होता; जागतिक उपविजेताही होता, पण संघ रचनेत त्याला दुसऱ्या क्रमांकाची लढत देण्यात आली आणि पहिली एकेरीची लढत खेळण्यासाठी लक्ष्य सेनला प्रत्येक सामन्यात प्राधान्य देण्यात आले; पण श्रीकांतने कोठेही अहंकार दाखवला नाही. सांघिक खेळात यश मिळवायचे असेल तर प्रथम अहंकार बाजूला ठेवावा लागतो. तो विचार अंगीकारणारे श्रीकांतसारखे खेळाडू सांघिक खेळाची वीण घट्ट करत असतात म्हणूनच आज या भव्य दिव्य यशाचे शिखर त्यांनी गाठले.
पुरुषांसाठी थॉमस करंडक; तर महिलांसाठी उबेर करंडक या नावाने अशी सांघिक जागतिक विजेतेपदाची स्पर्धा होत असते. साईना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि दुहेरीत ज्वाला गुत्ता अशा फुलराण्या खेळल्या. साईना, सिंधू यांच्या संघाने २०१४ आणि २०१६मध्ये ब्राँझपदकेही मिळवली आहेत; पण विजेतेपदापर्यंत हे ‘फुल'' कोमेजत असे. त्यावेळी सांघिक प्रयत्न कोणत्या तरी कारणामुळे अपूर्ण रहात होते; पण पुरुषांच्या या संघाने सांघिक खेळ कसा असतो, हे दाखवून दिले. कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली. देशात इतर सर्व खेळ आणि त्यांचा सराव सुरू होत होता; परंतु बॅडमिंटनला काही मुहूर्त मिळत नव्हता. पण कितीही खंड आला तरी तुमची बाराखडी पक्की असेल तर पुढचा अभ्यास तेवढाच सक्षमपणे होत असतो. हा पाया गोपीचंद यांनी पक्का करून घेतला. साईना आणि सिंधू यांना घडवणारे हे गुरूवर्य आता पडद्यामागे असतील; पण श्रीकांत, प्रणोय यांना त्यांनी घडवले आहे. सांघिक स्पर्धेत दुहेरीची जोडी तेवढीच महत्त्वाची असते, त्यामुळे या विश्वविजेतेपदामध्ये सात्विकराज आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरीत जिंकलेल्या सर्व लढती लाखमोलाच्या आहेत आणि जोडी गोपीचंद यांनी तयार केली. त्याच्यासाठी गेली काही वर्षे ते मेहनत घेत होते.
भारतीय बॅटमिंटन संघटनेकडून प्रामुख्याने प्रशिक्षण क्षेत्रात करण्यात येत असलेली गुंतवणूक, सुविधा या सर्वांचा हा परिपाक आहे. चॅम्पियन्स एका रात्रीत घडत नसतात. रोपट्याला खतपाणी घालून जोपासना केल्यावरच ते झाड विजेतेपदाच्या फळांनी बहरते, हे खेळातले सत्य आहे. थॉमस करंडकासारखे लखलखीत यश नव्या पिढीला प्रेरणा तर देतेच; पण त्यातून नवनवे खेळाडूही जन्माला घालत असते. १९८३च्या कपिलदेव यांच्या विश्वविजेतेपदानंतर हेच घडले होते. आता बॅडमिंटनमध्येही या विजयाच्या निमित्ताने नवी पहाट उगवेल, हीच अपेक्षा.