अग्रलेख : बिहारी झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar

शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यात यश आले, तेव्हापासून भाजप नेत्यांच्या अंगी बारा हत्तींचे बळ आले होते.

अग्रलेख : बिहारी झटका

नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाच्या खेळीला चोख उत्तर देत आपले मुख्यमंत्रिपद तर शाबूत राखले आहेच; शिवाय त्याचवेळी राष्ट्रीय स्तरावरील नेता म्हणून आपल्या प्रतिमेला पुनश्च एकवार उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, त्यासाठी एकेकाळी त्यांना ‘पलटूराम’ म्हणून हिणवणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्याच राष्ट्रीय जनता दलाशी पुन्हा एकदा जमवून घ्यावे लागले आहे. मात्र, त्यांनी ‘राजद’बरोबर केलेल्या या आघाडीला काँग्रेस, हिंदुस्तानी अवाम मोर्चा तसेच तीन डाव्या पक्षांनीही पाठिंबा दिल्यामुळे भाजपविरोधातील विरोधकांच्या एकजुटीच्या आशा-आकांक्षांनाही नव्याने पालवी फुटली आहे. शिवाय, नितीशकुमार यांचा सतत ‘सुशासनबाबू’ म्हणून उल्लेख करणाऱ्या भाजपचे आपल्याच मित्रपक्षांच्या विरोधातील वर्तन नेमके कसे असते, यावरही त्यामुळे लख्ख प्रकाश पडला आहे.

शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यात यश आले, तेव्हापासून भाजप नेत्यांच्या अंगी बारा हत्तींचे बळ आले होते. गेल्या आठवड्यात थेट पाटण्यात जाऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष आता अस्तंगत होतील, असे भाकित करून त्याची साक्ष दिली होती. अर्थात, नितीशकुमार यांना भाजपच्या कारवायांची जाणीव त्यापूर्वीच झाली होती आणि दिल्लीत केंद्र सरकारने आयोजित केलेल्या विविध बैठकांना जाण्याचे टाळून त्यांनी ती दाखवूनही दिली होती. तरीही नितीशकुमार अचानक ‘एनडीए’तून बाहेर पडतील आणि तत्काळ नव्याने ‘महागठबंधन’ उभे करू शकतील, याची कल्पना भाजप नेत्यांना न येणे, यास आणखीही एक कारण आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलात एक ‘एकनाथ शिंदे’ आरसीपी सिंह यांच्या रूपाने उभा करण्याचे भाजपचे पडद्याआडून प्रयत्न सुरू होते. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा अचानक राजीनामा देऊन, भाजपच्या या प्रयत्नांवरच बोळा फिरवला आणि शिवाय त्याचवेळी मित्रपक्षाशी ‘गद्दारी’ करण्याचा डावही उघडकीस आणला आहे.

मुत्सद्दीपणात नितीशकुमार यांनी भले भाजपच्या तथाकथित चाणक्यांना धूळ चारली असली, तरी गेल्या आठ-दहा वर्षांत त्यांची प्रतिमा ही ‘पलटूराम’ म्हणून समोर आली. जनता दलातून बाहेर पडून १९९४ मध्ये नितीशकुमार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ‘समता पार्टी’ स्थापन केली आणि लगोलग दोन वर्षांत सामोऱ्या आलेल्या १९९६मधील लोकसभा निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केली. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात त्यांनी काही काळ मंत्रिपदही भूषवले होते. मात्र, २०१३मध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करताच ते अस्वस्थ झाले. मोदी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत गोध्राकांडानंतर गुजरातेत झालेला भीषण हिंसाचार हे त्यामागचे कारण होते. त्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये आपले कट्टर विरोधक लालूप्रसाद यादव यांच्याशी समझोता करून, निवडणुका लढवल्या आणि या आघाडीने निवडणुका जिंकल्याही.

मात्र, लालूंचे चिरंजीव तेजस्वी यांच्याशी त्यांचे फार काळ जमू शकले नाही आणि तेजस्वी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांनी एका रात्रीत ती आघाडी तोडून पुनश्च भाजपशी पाट लावून मुख्यमंत्रिपद शाबित राखले. तेव्हा मात्र गुजरात हिंसाचाराच्या कटू आठवणी त्यांनी दूरवर फेकून दिल्या होत्या! त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपबरोबर लढवण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरला नव्हता. त्याच संधीचा फायदा घेऊन, भाजपने नितीशकुमार यांना धडा शिकवण्याचे डावपेच आखले. रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग यांच्या पक्षातर्फे त्यांनी भाजपचे अनेक बंडखोर मैदानात उतरवण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली आणि नितीशकुमार यांच्या ‘जेडीयू’चे बळ ७१ वरून ४३ इतके खाली घसरले. हा नितीशकुमार यांना मोठाच धक्का होता. याच निवडणुकीत तेजस्वी यांच्या नेतृत्वाखालील राजदप्रणीत काँग्रेस व अन्य पक्षांच्या आघाडीलाही मोठे यश मिळाले होते. त्यामुळेच आज भाजपच्या कुटिल रणनीतीला चोख उत्तर देऊन, त्यांना पुन्हा सरकार स्थापन करता आले आहे. गेले काही दिवस भाजपचे नेते ‘जेडीयू’मध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करत होते, असेही आरोप आता केले जाऊ लागले असून काही आमदारांना कोट्यवधीची ‘ऑफर’ दिली गेल्याचेही समोर आले आहे.

नितीशकुमारांनी आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन त्याचाच वचपा काढला. तीन दशकांच्या राजकीय प्रवासात जवळपास २० वर्षे भाजपसमवेत सुखाने संसार करणाऱ्या नितीशकुमार यांना हा दोस्ताना दुसऱ्यांदा का तोडावा लागला, या प्रश्नाचे उत्तर मोदी आणि अमित शहा यांच्या हातात भाजपची सूत्रे गेल्यानंतर बदललेल्या रणनीतीत आहे. ही रणनीती केवळ विरोधकांना नव्हे तर मित्रांनाही संपवण्याची आहे. त्यासाठीच नितीशकुमार यांचा मुख्य आधार असलेल्या मागास जातींमध्येच भाजप फूट पाडण्याचे प्रयत्न करत होता. ज्या प्रादेशिक पक्षांच्या बळावर भाजप पसरला, त्यांनाच संपवण्याचे हे कारस्थान आहे. शिवसेनेच्या बाबतीत भाजपने जे केले तेच बिहारमध्ये त्यांना करावयाचे होते. मात्र, नितीशकुमार यांची विश्वासार्हता लयास गेली आहे. तरीही विरोधकांना नितीशकुमार आपला ‘चेहरा’ वाटत असेल, तर ते विरोधकांच्या दिवाळखोरीचे लक्षण आहे.

कोणाची सत्ता येणार यासंबंधीचे निर्णय लोकांच्या म्हणजे सर्वसामान्य मतदारांच्या कक्षेत न होता, राजधातील कॉरिडॉरमध्ये होऊ लागले आहेत, हे महाराष्ट्र, बिहारसह विविध राज्यांत अलीकडे दिसू लागले आहे. हा प्रवाह निकोप नाही. लोकशाहीच्या दृष्टीने याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

Web Title: Editorial Article Writes Bihar Nitish Kumar Politics Bjp Rajad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..