अग्रलेख : चाकोरीतील चिंतन

राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या अमानुष हत्येनंतर सहा-सात वर्षे राजकीय विजनवासात गेलेल्या सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
Sonia Gandhi and Rahul Gandhi
Sonia Gandhi and Rahul GandhiSakal
Summary

राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या अमानुष हत्येनंतर सहा-सात वर्षे राजकीय विजनवासात गेलेल्या सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या अमानुष हत्येनंतर सहा-सात वर्षे राजकीय विजनवासात गेलेल्या सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभवालाच सामोरे जावे लागले होते. त्यास आता जवळपास अडीच दशकांचा कालावधी उलटून गेला आहे आणि मध्यंतरीचा १० वर्षांचा सत्तेचा काळ सोडला तरी नंतरच्या लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकात काँग्रेसला जेमतेम पन्नाशी गाठता आली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या ‘चिंतन शिबिरा’त काय होते, याकडे देशभरातील काँग्रेसजनांचे लक्ष लागलेले होते. प्रत्यक्षात १९९८ मधील पराभवानंतर मध्य प्रदेशातील पंचमढी या थंड हवेच्या ठिकाणी झालेल्या अशाच एका शिबिरातील भाषणच तर सोनिया गांधी वाचून दाखवत नाहीत ना, असाच प्रश्न काँग्रेसजनांना पडला आहे. खरे तर २०१४ नंतर देशाचे राजकीय नेपथ्य आरपार बदलून गेले आहे. राज्यामागून राज्ये काँग्रेसच्या हातातून जात आहेत आणि पक्षाचे राजकीय व्यवस्थापन पुरते कोलमडून पडल्यामुळे ‘आम आदमी पार्टी’सारख्या नव्या पक्षाने पंजाबातील काँग्रेसची सत्ताही हिसकावून घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींकडून पक्षाला काही वेगळ्या अपेक्षा होत्या.

प्रत्यक्षात त्यांनी ‘आपल्या हातात काही जादूची कांडी नाही आणि पक्षाला तळागाळात जाऊन काम करावे लागेल, दलित-आदिवासी-मागासवर्गीय यांच्यात पक्षाला नव्याने उभारी धरावी लागेल...’ हीच पंचमढीतील रेकॉर्ड पुन्हा एकदा वाजवली. खरे तर गेले दोन-अडीच वर्षे काँग्रेसमधील जुन्या-जाणत्यांचा ‘जी-२३’ या नावाने प्रसिद्ध पावलेला एक गट पक्षांतर्गत सुधारणांची मागणी करत आहे. त्यातील मुख्य प्रश्न हा या पक्षाचे नेतृत्व कोणी करावयाचे, हा आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारायला तयार नाहीत आणि त्यामुळे सध्या तरी पक्षाध्यक्षपद हंगामी स्वरूपात का होईना सोनियांकडेच आहे. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्या ना पक्षाला पूर्ण वेळ देऊ शकतात; ना प्रचारमोहिमेत सामील होऊ शकतात. त्यामुळे खरे तर या शिबिरात त्या संबंधात काही ठोस निर्णय अपेक्षित होता. प्रत्यक्षात पक्षाचा कारभार ‘मागील पानावरून, पुढे सुरू!’ याच पूर्वापार रीतीने सुरू राहणार, याची प्रचीती काँग्रेसजनांना शिबिरातील भाषणांवरून आली.या शिबिराच्या समारोप सत्रात होऊ घातलेल्या राहूल गांधी यांच्या भाषणाकडेही सर्वांचे लक्ष लागलेले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट हल्ला जरूर चढवला; मात्र त्याचवेळी विविध राज्यांत भाजपशी खंबीरपणे मुकाबला करणाऱ्या प्रादेशिक पक्षांवरही टीकास्त्र सोडले. खरे तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, ओडिशा अशा काही राज्यांत तेथील प्रादेशिक पक्षांनी भाजपला नामोहरम करून सोडले आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव हे भाजपशी चांगली झुंज देत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पक्षांची खोडी काढण्याचे राहूल यांना काही कारण नव्हते. अर्थात, हेही पंचमढीतील चिंतन शिबिरात जे काही झाले, त्याचीच आठवण करून देणारे होते. तेथेही ‘एकला चालो रे!’ अशीच भूमिका घेताना, अगदी अपरिहार्य झाले तरच प्रादेशिक पक्षांची हातमिळवणी करावयाची, असाच राग आळवला गेला होता. अर्थात, प्रादेशिक पक्षांच्या निवडणुकीतील यशाच्या आकड्यांकडे न बघता, त्यांची विचारधाराही लक्षात घ्यायला हवी, या त्यांच्या उद्‍गारात तथ्य आहे. अर्थात, हा टोला त्यांनी ‘आप’ला लगावला होता, हेही लपून राहिलेले नाही. मात्र, त्यानंतरच्या पाच-पंचवीस वर्षांत पुलाखालून गंगा-यमुनेचे तसेच गोदेचेही बरेच पाणी वाहून गेले आहे आणि महाराष्ट्रात तर काँग्रेस पक्ष हा शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या सरकारात मिळेल त्या सत्तेच्या चतकोरावर समाधान मानू पाहत आहे. मात्र, राहुल यांच्या प्रादेशिक पक्षांबाबतच्या भूमिकेमुळे जोर आला तो महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना! त्यांनी आता भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेत जे काही घडले, त्याबाबत थेट सोनिया गांधींकडे तक्रार केली आहे. ‘राष्ट्रवादी’ने तेथे स्थानिक पातळीवर ज्या काही नव्या सोयरिकी केल्या, त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो, अशी धमकीही या नानांनी दिली आहे. प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता अगदीच कमी आहे, हे त्यांनाही ठाऊक आहेच; कारण तो निर्णय त्यांच्या नव्हे तर थेट सोनिया गांधी यांच्याच हातात आहे. शिवाय, ‘मास्टर सभे’त उद्धव ठाकरे यांनी संघपरिवारालाच शिंगावर घेत, आपली भूमिका काँग्रेसपेक्षा वेगळी नाही, हे दाखवून दिले आहे.

याच चिंतन शिबिरात जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी महात्मा गांधी जयंतीपासून राहुल गांधी जनसंपर्क यात्रा काढतील, अशीही घोषणा झाली. मात्र, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय यदाकदाचित अमलात आलाच तर त्याबाबत गांधी कुटुंबियांचा अपवाद करण्याचेही ठरले. याचा अर्थ स्पष्ट आहे. पराभवामागून पराभव पदरी येत असतानाही तळागाळातील जनतेत कोणताही आधार नसलेल्या शिबिरातील या नेतेगणांना गांधी कुटुंब हाच आपला राजकारणातील आधार वाटतो. काँग्रेसच्या या शोकांतिकेचे तेच मूळ कारण आहे, असे सध्याचे चित्र असले तरी त्यात बदल करण्याची या नेत्यांची मानसिकता नाही, असा या शिबिराचा बोध आहे. एकूणात काँग्रेसची वाटचाल यापुढेही ‘तेच ते आणि तेच ते!’ याच गतीने सुरू राहणार, असे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com