अग्रलेख : ‘सायबर’मधल्या शत्रूसंगे..

ठाणे शहर पोलिसांच्या वेबसाईटवर काही काळासाठी काही हॅकरनी कब्जा मिळवला. `मुस्लिमांची माफी मागा’ असे फलक कथित हॅकरनी वेबसाईटवर झळकवले.
Cyber Crime
Cyber CrimeSakal
Summary

ठाणे शहर पोलिसांच्या वेबसाईटवर काही काळासाठी काही हॅकरनी कब्जा मिळवला. `मुस्लिमांची माफी मागा’ असे फलक कथित हॅकरनी वेबसाईटवर झळकवले.

ठाणे शहर पोलिसांच्या वेबसाईटवर काही काळासाठी काही हॅकरनी कब्जा मिळवला. `मुस्लिमांची माफी मागा’ असे फलक कथित हॅकरनी वेबसाईटवर झळकवले. प्रेषित महंमद पैगंबरांबद्दल अनुदार उद्‌गार काढणाऱ्या राजकीय व्यक्तींच्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या निषेध मोर्चांच्या पार्श्वभूमीवर ही वेबसाईट हॅकरनी ताब्यात घेतली. पोलिसांच्या तज्ज्ञांनी वेबसाईटवर पुन्हा ताबा मिळवला आणि ती सुरळीत सुरू झाली. तथापि, सुरक्षेच्या दृष्टीने कमालीच्या संवेदनशील अशा पोलिस खात्याची वेबसाईट हॅक होणे, ही नामुष्की आहे. त्याची जबाबदारी केवळ राज्याच्या गृह विभागावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. देश म्हणून सायबर विश्वातील गुन्हेगारीकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, याचा बुरखा फाडणारी ही घटना आहे. इंडोनेशियास्थित हॅकरचा एखादा समूह पोलिसांच्या वेबसाईटवर ताबा मिळवत असेल, तर महाराष्ट्रातील, देशातील नागरिक खरोखरीच सुरक्षित आहेत का, याचाही विचार करावा लागेल.

डिजिटायझेशनचा रेटा सर्वच क्षेत्रात आहे. बँकिंग, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, सरकारी योजना, उत्पादन, सेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटायझेशन सुरू आहे. ती आजच्या काळाची आणि उद्याचे भविष्य घडवण्याची गरज आहेच. त्याबद्दल काडीमात्र शंका नाही. हा रेटा सुरू असताना डिजिटायझेशनमधील धोक्यांवरील उपाययोजनेकडे देशपातळीवर कमालीची उदासीनता आहे. त्याचा गैरफायदा हॅकर लोक उठवतात. अल्पकाळासाठी का होईना, पण देशाच्या, राज्याच्या सायबर सुरक्षिततेची अब्रू जायची ती जाते. या घटनांपासून शिकून अंग झटकून यंत्रणा कामाला लागली, असे दिसत नाही. थातुरमातुर उपाययोजनांवर भर दिला जातो. काही काळाने हॅकिंगची घटना नव्याने घडते आणि पुन्हा अब्रू जाते. झपाट्याने बदलत चाललेल्या जगात डिजिटायझेशन, इंटरनेटवर आधारित तंत्रज्ञान हा विकासाचा परवलीचा शब्द आहे, याची पूर्ण जाणीव असतानाही अशा घटना घडतात, तेव्हा सरकारी कामातील चालढकलीची प्रवृत्ती भीषण संकटांना निमंत्रण देत आहे, असा आरोप करायला वाव राहतो. गेल्या पाच वर्षांमध्ये जगभरातील प्रत्येक ताणतणावात सायबर लढायांचा वाटाही वाढत चालला आहे.

विद्यमान रशिया-युक्रेन युद्धात परस्परांच्या वेबसाईट हॅक करण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. आगामी युद्ध जमिनीवरून कमी आणि डिजिटल आयुधांद्वारे अधिक लढले जाईल, असे गेले दशकभर सांगितले गेले. या भाकिताच्या वर्तमानातून आजचा प्रवास सुरू आहे. अशा काळात सायबर हल्ल्यांचा धोका आधीच ओळखणे, त्यावर अत्यावश्यक उपाययोजना प्राधान्याने करणे आणि सर्व प्रकारची माहिती, प्रचार, उलाढाल सुरक्षित ठेवणे हा नियोजनाचा भाग आहे. तो भाग कमी पडल्याचे हे ठाण्यातील प्रकाराने समोर आले. प्रत्येक सायबर हल्ल्यांमागे वेगवेगळी कारणे असल्याचे नजीकचा इतिहास सांगतो. पैशावर डल्ला मारणाऱ्या सायबर चोरांपासून ते प्रांतीय-वांशिक-धार्मिक तेढ वाढवण्यापर्यंतची कारणे आतापर्यंत उघड झाली.

भारत माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख निर्यातदार म्हणून अभिमानाने मिरवणारा देश असला, तरी सायबर सुरक्षेच्या बाबतीत प्रमुख आयातदार इतकीच प्रतिमा आहे. अमेरिका, चीन, ब्रिटन, जपान आणि फ्रान्स या देशांच्या तुलनेत भारताची सायबर सुरक्षा सतत संगणक हॅकर्सच्या छायेत आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुणे या पट्ट्यात जागतिक कीर्तीच्या शेकडो खासगी कंपन्या जगाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सांभाळतात; मात्र भारताच्या सायबर सुरक्षेची भगदाडे बुजवण्याची घाई कोणाला नाही. वास्तवात, सायबर सुरक्षा ही उद्योगाची नवी विशाल बाजारपेठ आहे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीने मेमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात सायबर सुरक्षा धोक्यात येण्याचे दोन लाख प्रकार दररोज घडतात. यामध्ये बनावट ई मेल, बनावट वेबसाईट, हॅकिंग अशा साऱ्या घटनांचा समावेश आहे. फुकट पैसे मिळवण्याचा मोह हे जसे या घटनांमागचे प्रमुख सामूहिक कारण आहे, तसेच धोरणात्मक पातळीवर सायबर सुरक्षेची प्रचंड आबाळ हेदेखील आहे.

डिजिटल पाकिट (वॉलेट) ही संकल्पना २०१६ च्या नोव्हेंबरपर्यंत मूठभरांना माहिती असणारा भारत आज वर्षाकाठी आठ लाख कोटी रुपयांचे व्यवहार कागदी नोटांशिवाय करतो. स्वाभाविकच डिजिटल पाकिटमारांची संख्याही झपाट्याने वाढते. दोन-तीन वर्षे वयाच्या बाळाच्या हातात मोबाईल देऊन ‘आमच्या बाळाला मोबाईल कळतो’ ही देशातील सायबर साक्षरतेची समाजातील सर्वसाधारण व्याख्या आहे. त्याच मोबाईलवर येणारा एखादा संदेश मोबाईलवरचे बँक खाते पार रिकामे करू शकतो, खासगी माहितीचा दुरूपयोग करू शकतो हे या ‘सर्वसाधारण व्याख्ये’पासून अद्याप दूरच आहे. या दर्जाची सायबर साक्षरता असलेल्या कुटुंबांनी बनलेल्या समाजात धार्मिक तेढ पसरवण्यासाठी एखादा संदेशही पुरेसा ठरत असल्याची उदाहरणेही शेकड्यांनी निर्माण झाली आहेत. त्यामुळे, प्रश्न केवळ एखादी सरकारी वेबसाईट सायबर शत्रूंच्या ताब्यात जाण्याचा उरत नाही; तर तो आपण वेगाने डिजिटायझेशनचे टप्पे गाठत असताना सुरक्षेला वाऱ्यावर किती काळ सोडणार आहोत, हा प्रमुख प्रश्न बनतो. सायबर सुरक्षेच्या आणि परिणामतः येथील विविध व्यवस्थांच्या चिंधड्या उडण्याआधीच या प्रश्नाला हात घालण्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com