अग्रलेख : आप कतार में है..!

सकाळी उठून टीव्हीला नाक लावून बसण्याचे दिवस आता सुरु होणार आहेत. तुम्ही फुटबॉलवेडे आहात का? फुटबॉल कधी खेळलात का? हे प्रश्न इथे फिजूल ठरतात.
Football Worldcup
Football WorldcupSakal
Summary

सकाळी उठून टीव्हीला नाक लावून बसण्याचे दिवस आता सुरु होणार आहेत. तुम्ही फुटबॉलवेडे आहात का? फुटबॉल कधी खेळलात का? हे प्रश्न इथे फिजूल ठरतात.

सकाळी उठून टीव्हीला नाक लावून बसण्याचे दिवस आता सुरु होणार आहेत. तुम्ही फुटबॉलवेडे आहात का? फुटबॉल कधी खेळलात का? हे प्रश्न इथे फिजूल ठरतात. आयुष्यात चेंडूला पायही न लावणारा एखादा गडीही फुटबॉलचा खेळ कुठे रंगात आलेला दिसला की रेंगाळतोच. या खेळाची जादूच अशी आहे. अमेझॉनच्या जंगलातले काही आदिवासी, सेंटिनल बेटांवरच्या आदिम जमाती वगळता संपूर्ण जग या खेळात मनापासून रमते, हे काही अतिशयोक्तीपूर्ण वाक्य नव्हे, तर वस्तुस्थिती आहे. अरबी मुलुखातल्या कतार या चिमुकल्या, पण धनवान देशाने यंदाचा फुटबॉल विश्वकरंडक सोहळा आपल्या देशात नेला. त्यासाठी तेलासारखा पैसा खर्च केला! पाण्यासारखा म्हणण्यात काही हशील नाही, कारण कतार हा तेलसाठ्यांच्या जोरावर संपन्न झालेला देश आहे. लोकसंख्या जेमतेम तीसेक लाख, त्यातले निम्मेअधिक उपरेच! पण भूमिगत तेलसाठ्यांवर नागोबासारखा बसलेला हा देश जगातल्या पहिल्या काही श्रीमंत देशांमध्ये मोडतो. यंदाच्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी कतारने सुमारे २२० अब्ज डॉलर एवढा खर्च केला आहे. म्हणजे सुमारे पावणेदोन लाख कोटी रुपये! एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेइतका हा अवाढव्य खर्च असेल.

कतारमध्ये उद्या- रविवारी अल खोर या शहरातील अल-बैत स्टेडियमवर या सोहळ्याचा समारंभपूर्वक प्रारंभ होईल, आणि १८ डिसेंबरपर्यंत निम्म्याहून अधिक जगातील नागरिकांचे वेळापत्रक बरेचसे कोलमडेल.- किमान बदलेल तरी! सोहळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दक्षिण कोरियन पॉप राजपुत्र जुंगकुक याचा जलसा रंगेल. हिंदी चित्रपटात चमकलेली नोरा फतेही हीदेखील आपल्या दिलखेचक अदांनी वाळवंटात हिरवळ फुलवेल, असे कळते. कतारमध्ये एरवी वातावरण कर्मठ असते. सार्वजनिक ठिकाणी सभ्यपणे वागावे लागते. मद्यपान वगैरे तर बातच सोडा. पण विश्वकरंडकाच्या निमित्ताने कतारने मनावर दगड ठेवून आपले नीतिनियम थोडे शिथिल केले. फुटबॉल सोहळ्याच्या निमित्ताने किमान पंधराएक लाख पर्यटक कतारला येतील, असा अंदाज आहे. दोहानजीकच्या समुद्रकिनाऱ्यांवर हुंदडायला त्यांना परवानगी आहे. पण एरवी वावरताना ‘खांदे आणि गुडघे उघडे टाकू नका’ असे आवाहन कतार सरकारने पर्यटकांना केले आहे. मद्य ठराविक ठिकाणीच मिळेल आणि तेही महाग. फुटबॉलची लढत जिथे होते, तिथे बीअरचा महापूर वाहातो, हा आजवरचा परिपाठ. कतारनेही बीअर उपलब्ध करुन दिली आहे; पण एका बाटलीसाठी बाराशे रुपये मोजण्याची तयारी मात्र हवी! हे यजमानपद कतारला मोठ्या मिनतवारीने मिळाले. ‘फिफा’वर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. मानवी हक्कांच्या सर्रास उल्लंघनाबद्दल अनेक देशांनी कतारला धारेवर धरले होते.

परकी मजूरांना गुलामासारखी वागणूक देणाऱ्या कतारला शेवटी केवळ यजमानपद मिळवण्यासाठी आपले कायदे बदलावे लागले. मजूरवर्गाला सवलती जाहीर कराव्या लागल्या. खेळांची आणि त्याहीपेक्षा स्पर्धांची ही ताकद विलक्षण आहे. फुटबॉल विश्वकरंडक सामाजिक परिवर्तनेही घडवतो, याचेच हे एक उदाहरण. विश्वकरंडकाच्या आयोजनातून कतारला कमाई फारशी होणार नसली तरी सदिच्छा नक्कीच गाठीला बांधता येतील. उद्घाटनानंतर यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात पहिली लढत होईल. पुढे १८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात ३२ देशांचे संघ मैदानात उतरणार आहेत. फ्रान्सचा पॉल पोग्बा, नगोलो कांते किंवा पोर्तुगालचा गोलो आदींना दुखापतींनी छळल्याने ते यंदा दिसणार नाहीत. पण इंग्लंडचा हॅरी केन, पोलंडचा रॉबर्ट लेवांदोवस्की, फ्रान्सचा मेबापे, ब्राझिलचा नेमाल किंवा फॅबिनो, पोर्तुगालचा क्रिस्तियाने रोनाल्डो, अर्जेंटिनाचा मेस्सी हे सितारे आपला हुन्नर पणाला लावतील. यातले काही सितारे मावळण्याच्या बेतात आहेत, हे लक्षात ठेवून लढती बघाव्यात. युक्रेनचा संघ पात्र ठरला नाही, तर गतवेळी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा रशियाचा संघ युद्धामुळे बंदीला तेवढा पात्र ठरला! ब्राझिल, स्पेन, अर्जेंटिना हे फुटबॉलमधले ‘दादा’ संघ. इटलीचाही एकेकाळी यात समावेश होत असे, पण यंदा इटली पात्रता फेरीतच गारद झाला. तगडे संघ, दिग्गज फुटबॉलपटू, अफलातून चाली रचत झळकावलेले चमत्कारिक गोल, पेनल्टी कॉर्नर मिळवण्यासाठी केलेली मैदानावरची नाटकबाजी, लाल किंवा यलो कार्ड, अशा अनेक गोष्टी जगभरातल्या दैनंदिन संभाषणाच्या बाबी होणार आहेत. अगदी दिग्गज नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदांपासून गावातल्या पारावरल्या गप्पांपर्यंत सर्वत्र फुटबॉल असेल.

आपला देश क्रिकेटवाल्यांचा असला, तरी फुटबॉलचे वेडेही काही कमी नाहीत. भारताचा फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय वर्तुळात फारसा दखलपात्र नाही. फिफा विश्वकरंडकापासून तर आपला देश अनेक कोस दूर आहे. फुटबॉलच्या इतिहासाचे धागेदोरे प्राचीन अझटेक युगापर्यंत जोडता येतात. ब्रिटनमध्ये जन्मलेला हा आधुनिक फुटबॉलचा खेळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेने आपला मानला. भारतासारखे अनेक देश आत्ता कुठे व्यावसायिक फुटबॉलची मजा पद्धतशीरपणे चाखू लागले आहेत. व्यावसायिक खेळाडूंची लोकप्रियता, पैशांचा धबधबा, क्लबांमधली देवाणघेवाण, हे सारे आपल्यासाठी ‘दूरचे दिवे’ होते. पण आता परिस्थिती वेगाने बदलते आहे. आज भारत विश्वकरंडकाच्या रांगेत नाही, पण भविष्यात तिथे पोचणारच नाही, असे नाही. ‘आप कतार में हैं’ हा दिलासादायक संदेश यंदाचा विश्वकरंडक जणू आपल्यासाठी घेऊन आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com