अग्रलेख : स्फोटक मौन

इराणच्या खेळाडूंनी कतारमधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इराणचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देऊन आपली नाराजी स्पष्टपणे नोंदविली.
iran football players
iran football playerssakal
Updated on
Summary

इराणच्या खेळाडूंनी कतारमधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इराणचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देऊन आपली नाराजी स्पष्टपणे नोंदविली.

खेळाडू असोत, कलाकार असोत, की समाजातील अन्य प्रभावशाली व्यक्ती. आपापल्या ‘मैदानां’वर त्यांनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीमुळेच त्यांना वलय प्राप्त झालेले असते. त्यामुळे निर्माण होणारे स्थान आणि जबाबदारी जे ओळखतात, ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन समाजहितासाठी प्रसंगी उभे राहतात. इराणच्या फुटबॉलपटूंनी आपल्या देशातील महिलांच्या स्वातंत्र्यासाठीच्या झगड्याला पाठिंबा दर्शविणारी जी कृती केली, ते याचे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. हिजाबच्या सक्तीविरुद्ध इराणमधील महिलांनी आंदोलन चालवले आहे. यासंदर्भात इराणच्या खेळाडूंनी कतारमधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इराणचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देऊन आपली नाराजी स्पष्टपणे नोंदविली. जेथे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकाच ठिकाणी केंद्रित झालेली असते, तेथे अशा दमनकारी शक्तीला आव्हान देण्याचे काम कठीण असते. अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या कतारमधील फुटबॉल विश्वकरंडकाच्या सामन्यात हे धाडस इराणच्या फुटबॉलपटूंनी दाखवले. यापूर्वी इराणच्या बास्केटबॉल व वॉटरपोलो संघातील खेळाडूंनीही असे धाडस दाखवले होते. मात्र यावेळची कृती जास्त लक्षवेधक ठरली.

फुटबॉलपटूंच्या या ‘निषेधा’स मोठी पार्श्वभूमी आहे आणि ती म्हणजे जनतेने कोणती वेषभूषा करावी, वा समाजात कशा प्रकारचे आचरण करावे, यासंबंधात राजसत्ता घालू पाहत असलेल्या निर्बंधांची. महिलांनी हिजाब परिधान केलाच पाहिजे, या सक्तीविरुद्ध इराणमध्ये संघर्षाचा उद्रेक झाला आहे. तेथील दमनशाही प्रवृत्तीचे राज्यकर्ते तसेच काही मूलतत्त्ववादी मुखंड हे हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांवर भयावह अत्याचार करत आहेत. दोनच महिन्यांपूर्वी हिजाब परिधान न करणाऱ्या मेहसा अमिनी या युवतीला तेथील तथाकथित ‘नैतिक पोलिसां’नी ताब्यात घेतले आणि याच पोलिसांच्या अमानुष अत्याचारात तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून अवघे इराण हिजाबविरोधात तीव्र निदर्शने करत असून, तेथे पोलिसांनी सुरू केलेल्या दमनसत्रात आजवर चारशेहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात किमान ५८ अल्पवयीनांचा समावेश आहे. याच हुकुमशाही दंडेलीचा निषेध या फुटबॉलपटूंनी इंग्लंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी जाहीरपणे मौन पाळून केला.

राष्ट्रगीत गायले गेले तेव्हा हे खेळाडू एक तर जमिनीकडे पाहत होते तर काहींची नजर आकाशाकडे होती. मात्र, निषेधाचा हा अभिनव मार्ग आणि तोही थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर देशोदेशींचे कोट्यवधी क्रीडाप्रेमी टीव्हीवर बघत असताना अवलंबिल्यामुळे आता या क्रीडापटूंवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी हे धाडस दाखवले आहे. इराणच्या खेळाडूंची जगभरातील नेटिझन वाहवा करीत आहेत. मात्र एवढ्याने तेथील सत्ताधारी बधतील, असे नाही. कतारमधील या निषेधाची जगभरात चर्चा असतानाच इराणच्या याच दमनशाही राजवटीने हेंनगामे गाझियानी आणि कातायून रियाही या दोन अभिनेत्रींना हिजाब न घालता निषेध मोर्चात सहभागी झाल्याबद्दल अटक केली आहे. देशभरात भीतीचे वातावरण उभे करून पुराणकालीन धार्मिक प्रथा-परंपरा तसेच रीती-रिवाज पाळण्यास महिलांना भाग पाडावे, यापलीकडे कोणताही उद्देश या अटकांमागे नाही.

अगदी अलीकडल्या काळापर्यंत इराण हा देश महिलांना स्वातंत्र्य देण्यात अग्रभागी होता. मात्र, इब्राहिम रईसी यांच्या सध्याच्या राजवटीने काळाची चक्रे उलटी फिरवण्याचा निर्णय घेतला, त्यामागील कारण हे निव्वळ धार्मिक आहे. अर्थात, इराणच्या याच खेळाडूंनी यापूर्वी झालेल्या एका मैत्रीपूर्ण सामन्यातही काळी जाकिटे परिधान करून आपल्या देशातील महिलांना पाठिंबा दिला होता. मात्र, विश्वचषकासाठी दोहा येथे रवाना होण्यापूर्वी त्यांनी देशाचे कठोरपंथी अध्यक्ष रईसी यांची भेट घेतल्यामुळे हिजाबसक्तीच्या मागणीसाठी गेले दोन महिने रस्त्यावर उतरलेल्या हजारो निषेधकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र, अखेरीस या खेळाडूंनी थेट विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यापूर्वी हे धाडस दाखवून या महिलांना पाठिंबा दिला आहे.

इराणकडून खेळणाऱ्या फुटबॉलपटूंच्या या कृतीस स्टेडियममधूनही इराणच्या समर्थकांनीही राष्ट्रगीताच्या वेळी मौन पाळून उत्स्फूर्त पाठिंबा तर दिलाच; शिवाय जगभरातून आता त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. हे सारे जण ‘महिला-जीवन-स्वातंत्र्य’ असे तीन शब्द लिहिलेले टीशर्ट घालूनच आले होते आणि हेच इराणमधील या लढ्याचे परवलीचे शब्द बनले आहेत. देश मग तो इराण असो की अन्य कोणताही, धार्मिक दंडेलशाही सुरू झाली की एक ना एक दिवस तेथील जनता त्याविरोधात बंड करून लोकशाही स्वातंत्र्याची मागणी कशी करते, याचीच ही घटना साक्ष देत आहे.

मात्र, यामुळे या कट्टर शियापंथीयांचे बहुमत असलेल्या मुस्लिम राष्ट्राचे अध्यक्ष रईसी यांचे लगोलग मतपरिवर्तन होण्याची शक्यता बिलकूलच नाही. मूलतत्त्ववादाचे वारे डोक्यात शिरले की माथी उलट्या दिशेनेच प्रवास करू लागतात. एकेकाळी महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या राष्ट्राचा हा अधोगतीचाच प्रवास आहे. मात्र, इंग्लंडविरोधातील हा सलामीचा सामना इराणने गमावला असला तरी जगभरातील केवळ फुटबॉलप्रेमींचीच नव्हे तर लोकशाही मूल्यांवर श्रद्धा असणाऱ्या आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आग्रही असलेल्या कोट्यवधी जनतेची मने मात्र याच धाडसी खेळाडूंनी जिंकली, यात शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com