अग्रलेख : ...जमाने के साथ भी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC
अग्रलेख : ...जमाने के साथ भी

अग्रलेख : ...जमाने के साथ भी

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्राथमिक भागविक्रीची प्रक्रिया सुरू झाली असून, आर्थिक सुधारणांचा जो प्रवास १९९१ नंतर भारताने सुरू केला, त्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. त्यासंबंधीच्या घोषणेमुळे इतिहासाचे एक आवर्तन पूर्ण झाले आहे. रूळ बदलताना जसा खडखडाट होतो, तसा तो याही बाबतीत झाला असला तर नवल नाही. अशा प्रकारच्या एकूणच बदलाला आपल्याकडे बराच विरोध झाला. विमाधारकांचे नुकसान होईल, कर्मचाऱ्यांवर गंडांतर येईल, परकी हातात हा व्यवसाय जाईल; एवढेच नव्हे तर देशाचेच नुकसान होईल, अशा अनेक आक्षेपांचा धुरळा उडवून देण्यात आला होता. साहजिकच संघटित कर्मचारी वर्गाने अशा प्रकारच्या स्थित्यंतराला तीव्र विरोध केला होता.

अद्यापही काही मुद्यांबाबत शंका नि आक्षेप असले तरी त्या विरोधाचे सूर बऱ्याच अंशी मावळल्याचे जाणवत आहे. मुळात सरकारने फक्त साडेतीन टक्के भागभांडवल विक्रीस काढले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. प्राथमिक भाग विक्रीत कर्मचारी आणि विमाधारक या दोघांसाठीही काही भाग राखीव ठेवण्यात आला असून त्यांच्यातही या ‘आयपीओ’विषयी कमालीची उत्सुकता दिसते आहे, हे बदलत्या वातावरणाचे निदर्शक आहे.

भारताच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ‘आयपीओ’ असल्याने त्याचे महत्त्व वादातीत आहे. १९५६मध्ये आयुर्विमा महामंडळाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतरचा काळ म्हणजे भारतातील प्रत्येक क्षेत्राच्याच उभारणीचा,पायाभरणीचा काळ होता. विम्याचे महत्त्व आणि गरज पटवून देण्यापासून अनेक बाबतीत समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून झाले. तिचा पाया विस्तारला. २९ कोटी विमाधारक हे या संस्थेचे बलस्थान. काळाच्या ओघात विमा व्यवसायात मोठे बदल व्हायला लागले. विशेषतः जागतिकीकरणानंतर इतर सर्व क्षेत्रात स्पर्धा सुरू झाल्यानंतर विमा क्षेत्रालाही या बदलाचे वारे धडका देणार, हे स्पष्ट झाले. प्रश्न ते कधी होणार एवढाच होता. एका योजनेसाठी ‘जिंदगी के बाद भी, जिंदकी के साथ भी’,असे अर्थवाही घोषवाक्य देणारी एलआयसी आता ‘जमाने के साथ’ राहू इच्छित आहे, हाच या घडामोडींचा अर्थ. विमाधारकांकडून गोळा होणारे पैसे एलआयसी अन्यत्र गुंतवत आली आहे आणि आता तीच गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय म्हणून समोर आली आहे. यातला एक मोठा बदल म्हणजे या निमित्ताने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या या विमा कंपनीत मोठा संरचनात्मक बदल या निमित्ताने होत आहे. मक्तेदारीकडून स्पर्धेला सामोरे जातानाचा प्रवास खडतर असला तरी हिताचा असतो; ग्राहकांच्याही, संचालकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्याही. आजवर शेअर बाजारात एलआयसीची नोंदणी झालेली नव्हती. आता ती नोंदणीकृत झाल्यानंतर साहजिकच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ती उत्तरदायी असेल.

सार्वजनिक छाननीला सामोरे जाण्याची आजवर गरज भासली नव्हती. आता मात्र ती ‘परीक्षा’ सातत्याने द्यावी लागेल. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, उच्च व्यावसायिक कार्यक्षमता आणि ग्राहकांना उत्तम सेवा या सगळ्या गोष्टी येतील, अशी आशा निश्चित निर्माण झाली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका जेव्हा या क्षेत्रात उतरून ‘लिस्टेड’ झाल्या, तेव्हा त्यांच्याही कार्यपद्धतीत बरेच बदल झाले. खासगी बॅंकांशी स्पर्धा करताना त्यांना ते घडवावेच लागले. अद्यापही ती प्रक्रिया पूर्णत्वाला गेली असे म्हणता येत नसले तरी सुधारणा झाल्या, हे मान्य करावे लागते. एलआयसीही आता त्या मार्गाने जात आहे, ही त्यामुळेच स्वागतार्ह घटना आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची १५ टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवण्यात येते. त्यातील रकमेचे प्रमाण लक्षात घेतले तर अशा गुंतवणुकीसाठी भारतात एखाद्या सशक्त पर्यायाची गरज होतीच. एलआयसीमुळे तो पर्याय उपलब्ध झाला आहे. मुळात केवळ साडेतीन टक्के हिस्सा विकत असल्यामुळे सरकारची ९६.५टक्के मालकी कायम आहे.

निर्गुंतवणूकीतून ७८ हजार कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरवले होते. जेमतेम १२ हजार कोटींपर्यंतच सरकारला मजल मारता आली. सरकार प्रामुख्याने उद्दिष्टपूर्तीच्या आणि ही तफावत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून याकडे पाहात आहे, हे उघड आहे. याचे कारण या निर्गुंतवणुकीतून २१ हजार कोटी रुपये उभे राहणार आहेत. पण तसे ते उभे करत असतानाच या सगळ्या बदलाचे जे व्यापक परिमाण आहे, त्याकडे सरकारचेही दुर्लक्ष होऊ नये. एलआयसीकडील निधी हा इतर गर्तेत गेलेल्या संस्थांच्या उद्धारासाठी वापरण्याचे निर्णय घेताना त्यामागची भूमिका आणि दृष्टिकोन याबाबत अधिक पारदर्शिता राखावी लागेल. ज्या बदलाला या निमित्ताने सुरवात झाली आहे, तो अर्थपूर्ण होण्यासाठी सर्वंच संबंधित घटकांना त्याच्याशी सुसंगत अशी पावले टाकावी लागतील.

Web Title: Editorial Article Writes Lic

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top