
महाविकास आघाडी सरकारातील तीन पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही एकदिलाने काम करत आहोत, अशा वल्गना राणा भीमदेवी थाटात राज्य पातळीवरील नेते सातत्याने करतात. मात्र प्रत्यक्षात तळाच्या पातळीवरील या तीन पक्षांच्या लोकप्रतिनिधींचेच मनोमीलन झालेले नाही, हे विधान परिषद निवडणुकीने दाखवून दिले.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकांपैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्यामुळे केवळ विदर्भातील दोन जागांकडेच अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, या दोन्ही जागांवर केवळ सत्ताधारी महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांचा दणदणीत पराभवच झाला असे नाही, तर आघाडीची मतेही मोठ्या प्रमाणात फुटल्यामुळे आघाडीत एकवाक्यता नाही, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकास आघाडीला बसलेला हा मोठा धक्का तर आहेच; शिवाय त्यामुळे ‘एकला चलो रे!’ अशी गर्जना सातत्याने करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही चांगलाच मुखभंग झाला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नागपुरात या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या रणनीतीचे जे काही धिंडवडे निघाले, ते या पक्षाला अपमानास्पद असेच आहेत. सरकारातील तीन पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत आणि आम्ही एकदिलाने-एकवाक्यतेने काम करत आहोत, अशा वल्गना राणा भीमदेवी थाटात राज्यपातळीवरील नेते सातत्याने करत असले, तरी प्रत्यक्षात तळाच्या पातळीवरील या तीन पक्षांच्या लोकप्रतिनिधींचेच मनोमीलन झालेले नाही, हे या निवडणुकीने सिद्ध केले. भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला विदर्भात धोबीपछाड देऊन ते दाखवून दिले, असेही म्हणता येईल.
खरे तर नागपुरात महाविकास आघाडीकडे बहुमत नव्हतेच आणि त्यामुळेच या विदर्भातील नानांनी भाजपचेच डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसमध्ये आयात करून, त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. तेव्हापासूनच काँग्रेसमधील धुसफूस रोजच्या रोज चव्हाट्यावर येत होती. मात्र, उमेदवारी मिळाल्यानंतरही हे भोयर खऱ्या अर्थाने प्रचारात तर उतरले नाहीतच; शिवाय त्यानी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या साध्या गाठीभेटीही घेतल्या नाहीत. मात्र, त्यांनी शेवटच्या क्षणी जे काही केले, ते तर चित्तचक्षुचमत्कारीच होते! त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आणि मग सुनील केदार यांनी विदर्भवीर नानांना बाजूस सारून, काँग्रेसच्याच रिंगणात राहिलेले डमी उमेदवार मंगेश देशमुख यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करणे भाग पडले. खरे तर तेव्हाच भाजपचे चंद्रकांत बावनकुळे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, त्यानंतरही काँग्रेसची अधिक मानहानी झाली ती महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे! आता बावनकुळे यांच्या विजयाचे श्रेय देवेन्द्र फडणवीस घेत असले, तरी त्यांनीच बावनकुळे यांची विधानसभा उमेदवारी कापली होती, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच विदर्भातील केवळ बावनकुळे यांचा तेली समाजच नव्हे तर अवघा ओबीसी नाराज झाला होता. त्याची भरपाई आता झाली आहे.
अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात झालेली नाचक्की ही शिवसेनेला मान खाली घालायला लावणारी आहे. त्यांनी विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. अर्थात, पूर्वी ते दोनदा निवडून आले तेव्हा त्यांना भाजप तसेच वसंत खंडेलवाल यांचा पाठिंबा होता. भाजपने चाणक्यनीती अवलंबून या खंडेलवाल यांनाच बाजोरिया यांच्या विरोधात उभे केले आणि ते दणदणीत म्हणता येईल, अशा मताधिक्याने निवडून आले! त्यास अर्थातच शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही तितकीच कारणीभूत आहे. एकंदरित या दोन पराभवांमुळे महाविकास आघाडीची पुरती नाचक्की तर झालीच आणि मुख्य म्हणजे या सहांपैकी चार जागा सहज जिंकल्याने भाजपचा रथ आता जमिनीपासून चार अंगुळे वरूनच चालू लागणार हेही स्पष्ट झाले. ‘आता या विजयानंतर मागे बघायचेच नाही!’ अशी जी काही प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली, त्यामुळे भाजपला या यशाचा किती आनंद झाला आहे, तेच दिसून येत आहे.
अर्थात, या विजयानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेली प्रतिक्रिया मात्र त्यांचे अज्ञानच प्रगट करणारी ठरली. जनमत आता बदलू लागल्याचेच हे निकाल सांगत आहेत, असे दानवे म्हणाले खरे; पण विधान परिषदेच्या निकालांशी लोकांचा जराही संबंध नसतो, याकडे तेव्हा त्यांनी सोयीस्कर दुर्लक्षच केले. शिवाय, या अशा निवडणुकांत राजकारणापेक्षाही अर्थकारणालाच अधिक महत्त्व असते, हे किमान दानवे यांना कोणी सांगायची गरज नाही. महाविकास आघाडीची मते का फुटली यावर आता प्रदीर्घ काळ चर्वितचर्वण सुरू राहील आणि आघाडीतील पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळही उडेल. त्यापलीकडची बाब म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित पक्षाने भाजपला केलेली मदतही दुर्लक्ष करण्याजोगी नाही. एक मात्र खरे! राज्यातील प्रतिष्ठेच्या महापालिका निवडणुकींच्या तोंडावर सत्ताधारी आघाडीला हा फटका बसल्याने आता या आघाडीला पुढच्या निवडणुका डोळ्यांत तेल घालून लढवाव्या लागतील, यात शंकाच नाही. सरकारवर या निकालांचा काहीही परिणाम होणार नसला, तरी या निकालांनी सत्ताधारी आघाडीला मोठा धडा शिकवला आहे. केवळ कागदावरची आघाडी निवडणुका जिंकून देत नसते, तर त्यासाठी तळाच्या पातळीपर्यंत आघाडीचा मंत्र न्यावा लागतो, हा तो धडा आहे. त्यातून आघाडीचे नेते काही बोध घेतात की राज्याची सत्ता हाती आहे, या खुशीतच मश्गूल राहतात, ते बघावयाचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.