अग्रलेख : कोलाहलाचे हलाहल

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम हाती घेतल्यापासून या महाराष्ट्रदेशी एकच कलकलाट सुरू झाला आहे!
Raj Thackeray
Raj ThackeraySakal
Summary

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम हाती घेतल्यापासून या महाराष्ट्रदेशी एकच कलकलाट सुरू झाला आहे!

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम हाती घेतल्यापासून या महाराष्ट्रदेशी एकच कलकलाट सुरू झाला आहे! या ‘आवाज की दुनिया’मध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आपलाही आवाज लावला आणि हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सारेच नेते तसेच त्यांचे समर्थक झांजा वाजवण्यात दंग होऊन गेले. त्यामुळे एकेकाळी सर्वांना बरोबर घेऊन गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या राज्यात सांप्रत काळी नेमके काय सुरू झाले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर मुंबईत डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३मध्ये लागोपाठ दोन दंगलींना मुंबईकरांना सामोरे जावे लागले, तेव्हा जानेवारीच्या दंग्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी ‘महाआरती’चा घाट घातला होता. त्यानंतर थेट ३० वर्षांनी या राज्यात पुनश्च एकवार महाआरत्यांची लाट वेगाने फोफावत चालली आहे. देशात कायम प्रगतिपथावर असलेला हा महाराष्ट्र थेट तीन दशके मागे जात आहे की काय, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.

‘आवाजाला आवाजानेच उत्तर’ देण्याचा हा निर्णय तीन मे नंतर अमलात आणण्याचा राज यांचा इरादा आहे. मात्र, त्यामुळे होऊ घातलेला कलकलाट तसेच गोंगाट यापेक्षाही सध्या राज्यभरात वाढत चाललेले राजकीय ध्वनिप्रदुषण हे अधिक धोकादायक आहे; कारण त्यामुळे समाजात गेल्या तीन दशकांपासून उभी ठाकलेली दुराव्याची दरी अधिकच रुंदावत जाणार आहे. खरे तर गजर रामनामाचा असो किंवा ‘अल्ला हो अकबर!’ अशा नाऱ्यांचा असो; त्याचा राजकीय लाभ नेहमीच होतो, असे म्हणता येत नाही. ‘सनातन धर्मा’चा गजर करूनही कोल्हापूरात त्याचा लाभ तो करणाऱ्यांना झाला नाही, हे यासंबंधातील अगदी ताजे उदाहरण आहे. त्यामुळेच की काय, मशिदींवरील भोंग्यांचा विषय हा सामाजिक प्रश्न आहे, असा पवित्रा आता राज ठाकरे यांनी घेतला आहे. तरीही आता महाराष्ट्रदिनी आपला ‘आवाज’ लावण्यासाठी राज यांनी केलेली औरंगाबाद या महानगराची निवड त्यामागील त्यांचे राजकीय हेतू लपवून ठेवू शकलेली नाही. हे सारे या महाराष्ट्राला नेमके कुठे घेऊन जाणार आहे, हे राज तसेच त्यांच्या मागे फरफटत जाणाऱ्या नेत्यांना कळत असणारच. मात्र, तरीही जाणीवपूर्वक हा ‘खेळ’ सुरू करण्यात आला असेल, तर ते जनतेसाठी अधिक धोकादायक आहे.

खरे तर मशिदींवरील भोंग्यांचा आवाज हा न्यायालयाने घालून दिलेल्या प्रमाणापेक्षा मोठा असेल तर त्यावर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाईचा आग्रह धरायला हवा. शिवाय, असे ध्वनिप्रदुषण मग ते कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वा धार्मिक स्तरावर होत असेल, तर त्यास पायबंद हा घालायलाच हवा. त्यात कोण्या एका धर्मावर लक्ष केंद्रित होता कामा नये. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही अनेक महत्त्वाचे प्रश्‍न सोडवणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. समस्यांनी ग्रासलेल्या लोकांचा आक्रोशही सुरू आहे. पण आपल्या सर्वपक्षीय राजकारण्यांना तो ऐकू येत नाही. प्रश्न बेरोजगारांचे असोत की शेतकऱ्यांचे, की महागाईच्या झळांनी होरपळून निघणाऱ्या ‘आम आदमी’चे असोत, त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. हा आक्रोश आणि संभाव्य उद्रेक दाबून टाकता यावा म्हणूनच मशिदीवरील भोंग्यांच्या नावाने कलकलाट सुरू केला गेला नाही ना, अशीही शंका उपस्थित होते. आता अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी राजकीय नेत्यांची अहमहमिका सुरू झाली आहे. या नेत्यांच्या पाठोपाठ त्यांचे समर्थकही तेच करू पाहत आहेत. अनेक तरुण एखादे सकारात्मक काम करण्याऐवजी झांजा वाजवण्यात दंग झालेले गल्लोगल्ली दिसू लागले आहेत.

देशभरात निर्माण होत असलेल्या धार्मिक तणावाचे पडसाद महाराष्ट्रातही उठू लागले आहेत. मुंबईतील मानखूर्द असो की तिकडे दूरवरच्या विदर्भातील अचलपूर-परतवाडा असो; धार्मिक विद्वेषाची ज्वाला त्वेषाने उफाळून येऊ लागली आहे. एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातील महाराष्ट्राचे आणि देशाचेही चित्र मन खिन्न करून टाकणारे आणि मन निराशेच्या गर्तेत घेऊन जाणारे आहे. राज ठाकरे यांनी ‘हनुमान चालिसा’ पठणाचे आवाहन करताच लगोलग त्याच्या प्रती हातोहात खपू लागणे, ठिकठिकाणी सहज गर्दी गोळा केली जाणे, मग त्यांना राजकीय प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांनीही त्याच धर्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, शिवसेनेनेही हिंदुत्वाला आम्ही विसरलेलो नाही, हे पुन्हापुन्हा सांगू लागणे, हा सगळा कोलाहल एकूणच राजकीय अधःपतन कोणत्या थराला गेले आहे, हे दाखविणारा आहे. निव्वळ भावनिक मुद्दे मांडत राजकीय अवकाश मिळवू पाहणारा पक्ष आणि त्याचा नेता आज महाराष्ट्राला आपल्या मागे फरफटत नेऊ शकत असेल, तर ते या राज्याच्या वैचारिक दारिद्र्याचे लक्षण मानावे लागेल. यातून बाहेर पडून सत्ताधारी नेत्यांनी मूलभूत प्रश्‍नांना भिडणारा कारभार करून राजकीय चर्चाविश्‍वाला इष्ट वळण द्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com