
महाराष्ट्र दिनी या राज्याचा कौतुक सोहळा एकीकडे पार पडत असतानाच, राज्यात राजकीय रण पेटल्याचे चित्र उभे राहणे, हे कोणत्याच पक्षाला शोभा देणारे नव्हते.
महाराष्ट्र दिनी या राज्याचा कौतुक सोहळा एकीकडे पार पडत असतानाच, राज्यात राजकीय रण पेटल्याचे चित्र उभे राहणे, हे कोणत्याच पक्षाला शोभा देणारे नव्हते. खरे तर या शुभदिनाचा मुहूर्त साधून स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या पुढच्या प्रगतीचा आलेख रेखाटला गेला असता, तर या दिनाचे औचित्य अधिक ठळकपणे सामोरे आले असते. मात्र, झाले भलतेच. शिवसेना आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगाबादेतील राज ठाकरे यांच्या आणि मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या सभांमध्ये लक्ष्य करण्यात आले आणि त्यास खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे हे तीन पक्ष कसे हमरीतुमरीवर आले आहेत, त्याचेच प्रत्यंतर जनतेला आले. विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरणे, यात खरे तर नवे काहीच नाही; मात्र तसे करताना जे काही विषय उकरून काढले गेले, ते या राज्याच्या आजवरच्या पुरोगामी प्रतिमेवर ओरखडा उठवणारे होते. विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असतो; मात्र या सभांमधून उटविण्यात आलेल्या ‘आवाजा’त जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता.
महाराष्ट्र दिनी राज ठाकरे आपला पुढचा नवा कोणता कार्यक्रम जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, हे खरेच. त्यांच्या सभांचे व्यवस्थापन हे नेहमीच वाखाणण्याजोगे असते आणि भरपूर गर्दी खेचून आणणारा ‘करिष्मा’ आणि वक्तृत्वही त्यांच्याकडे आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. मात्र, आधीच्या दोन भाषणांपेक्षा नवे मुद्दे त्यांच्याकडे नव्हते. आजवर पुणे-मुंबई-नाशिक पट्ट्यापुरते अस्तित्व असलेल्या या पक्षाची मराठवाड्यात ‘उपस्थिती’ वाढविणे हा उद्देश तर उघडच होता. पण महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि कॉंग्रेसच्या तुलनेत टीकेचा सारा भर राष्ट्रवादी काँग्रेसवर होता. मंगळवारी ‘अक्षय्य तृतीया’ आणि बुधवारी रमझान ईद या दोन सणांनंतर मशिदीवरील भोंगे उतरवलेच पाहिजेत!’ या आपल्या आधीच्या घोषणेचा राज यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे राज्यातील आधीच भडकवण्यात आलेले वातावरण आणखी तापवण्यापलीकडे या सभेतून फार काही हाती लागले नाही.
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी आपला ‘मराठी बाणा’ बासनात बांधून हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेतली, तेव्हाच त्यांच्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट झाली होती. धार्मिक भावनांना हात घालण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षात येत होता. त्यातून राज्यातील सलोख्याच्या वातावरणालाच तडा जाऊ शकतो. त्यांच्या भाषणात राज्यातील जनतेला भेडसावणारे प्रश्न वा भविष्यातील विकास याचा उल्लेखही नव्हता. त्यातच दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील बाबरी मशीद नेमकी कोणी पाडली, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास ‘बाबरीकांडा’नंतर कचरलेला भाजप आणि ‘बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल, तर त्यांचा मला अभिमान आहे!’ या तीन दशकांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या उद्गारांचा संदर्भ होता. बूस्टर सभेत फडणवीसांनी त्यातील फोलपणा दाखवण्यावर भर दिला. हा सगळा ‘खेळ’ उद्धव ठाकरे यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘तुम्हारी कमीज मेरे कमीज से और भगवी कैसी?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचाच होता! ‘मशिदीवरील भोंगे काढण्याची हिंमत नाही आणि मशीद पाडण्याचे श्रेय मात्र घेता!’ असा वार फडणवीस यांनी केला. हे सारे तीन दशकांपूर्वीचे राज्यातील आणि विशेषत: मुंबईत उभ्या राहिलेल्या तणावाच्या वातावरणाची आठवण करून देणारेच होते.
‘बाबरीकांडा’नंतर देशभरात ‘हम और वो’ अशी दुराव्याची दरी उभी राहिली आणि अजूनही त्यानंतरच्या हिंसक दंग्यांच्या जखमा कायम आहेत.विरोधकांना त्या आठवणी पुन्हा जागवून तसेच तणावाचे वातावरण या राज्यात उभे करावयाचे आहे काय, हा त्यानिमित्ताने पुढे आलेला प्रश्न आहे. स्वत: उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार यांची जबाबदारीही त्यामुळे अधिकच वाढली आहे.
राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील आपल्या भाषणात शिवसेनेपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेस; विशेषतः त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले, त्यामागेही काही स्पष्ट राजकारण आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पवार यांनी प्रचाराचे वादळ उठवले होते आणि त्यांच्यामुळेच राज्यात हे महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ शकले. विरोधकांना ही बाब किती झोंबली आहे, हेच त्यांच्या वर्तनावरून सातत्याने दिसते आहे. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याचे प्रतिमाभंजन करताना राज यांनी ते ‘आस्तिक आहेत की नास्तिक’ असाही प्रश्न पुनश्च एकवार उपस्थित केला. हा सारा खेळ अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आला आहे आणि त्यामुळेच भाजप आणि राज ठाकरे यांची पडद्याआडील हातमिळवणीही समोर येत आहे. राहता राहिला प्रश्न तो मशिदींवरील भोगे न उतरवल्यास राज ठाकरे बुधवारपासून दाखवणार असलेल्या ‘महाराष्ट्राच्या ताकदी’चा. त्याला सरकार कसे सामोरे जाते, यावर मे महिन्यातील उन्हाळ्याच्या काहिलीत जनतेला अधिक झळा पोचणार काय, या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. एक मात्र खरे. राज्यातील वातावरण दूषित करण्यास या दोन सभा कारणीभूत ठरल्या आहेत. आता डाव सरकारचा आहे. तो हे सरकार कसे खेळते, यावरच पुढचे राजकारण अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.