अग्रलेख : घोडचुका अन् लाथाळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi security
अग्रलेख : घोडचुका अन् लाथाळ्या

अग्रलेख : घोडचुका अन् लाथाळ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेत ज्या काही त्रुटी आढळून आल्या आहेत, त्याचा दोन बाजूंनी विचार करावा लागेल. पंतप्रधान; मग ते कोणत्याही पक्षाचे वा विचारांचे असोत; त्यांच्या सुरक्षेबाबत हयगय होता कामा नये आणि तशी ती झालेली दिसत असल्यामुळे त्याबाबत गांभीर्याने विचार व्हायलाच हवा. पंजाबात सीमेपासून अवघ्या १०-१५ किलोमीटर अंतरावर जे काही घडले, त्याची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यासंबंधात अहवाल सादर करण्याचे आदेश पंजाब सरकारला दिले आहेत. हे योग्यच झाले. सुरक्षेच्या बाबतीत सर्व पातळ्यांवरचा समन्वय किती आवश्यक असतो, याचा जो धडा या निमित्ताने मिळाला आहे, तो महत्त्वाचा आहे. भविष्यात अशा चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी. दुसरे म्हणजे नेत्यांच्या सुरक्षेचा विषय हा राजकीय आखाड्याचा केला जाता कामा नये, याचा विवेक सर्वांनीच बाळगणे आवश्यक असते.

या घटनेचे जे राजकारण झाले, त्याची दखल घेताना साहजिकच पहिल्यांदा समोर येतो तो शेतकरी आंदोलनाचा संदर्भ. वर्षभर राजधानीत ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी चिकाटीने केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले. त्या आंदोलनात ठळक सहभाग पंजाबातील शेतकऱ्यांचा होता. ते राज्य लवकरच विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहे. तेथे सध्या काँग्रेसचे सरकार आहे. शेतकरी प्रश्नावरील माघारीनंतर मोदी प्रथमच पंजाबात जात होते. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे दौऱ्यास कमालीचे महत्त्व होते. मात्र, या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांची निदर्शने होण्याची शक्यता पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवी होती. त्यात हयगय झाली आणि पंतप्रधानांना दौरा अर्धवट सोडून दिल्लीस परतावे लागले. या दौऱ्यास हवामानानेही फटका दिला. नियोजित कार्यक्रमानुसार मोदी हे भटिंडा विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टरने हुसैनीवाला हुतात्मा स्मारक स्थळी जाणार होते. मात्र, खराब हवामान आणि पाऊसही सुरू झाल्याने त्यांनी काही काळ वाट बघून, रस्तामार्गे जाण्याचा निर्णय घेतला आणि मग शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे त्यांचा ताफा हा एका उड्डाण पुलावर अडकला. अखेर त्यांना तेथूनच माघारी जावे लागले. तेव्हा या घटनेचा सुरक्षा त्रुटीतील प्रशासकीय हलगर्जीपणा तसेच नंतर सुरू झालेला राजकीय भांगडा यांची दखल घ्यायलाच हवी.

‘सभेला गर्दी न जमल्यामुळे पंतप्रधानांनी दौरा रद्द केला’, असे ट्विट काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केल्यामुळे भाजप समर्थक खवळले. मग त्या पक्षाची नेतेमंडळी आणि कार्यकर्ते ‘पंतप्रधान जीवावरच्या हल्ल्यातून बचावले,’ असे समाज माध्यमांद्वारे सांगू लागले. शिवाय, दस्तुरखुद्द मोदी यांनी ‘भटिंडा विमानतळापर्यंत सुखरूप पोचल्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा!’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केली. एकदा त्यांनीच अशी भूमिका घेतल्यानंतर भाजप पाठीराख्यांच्या अंगी बारा हत्तींचे बळच आले. राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. या राजकीय साठमारीस पंजाब विधानसभेच्या तोंडावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांचा संदर्भ आहे, हे उघड आहे. राहिला प्रश्न पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील प्रशासकीय त्रुटीचा. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी पंतप्रधानांबद्दल आपणांस आदरच आहे, असे सांगत राज्याच्या पोलिस महासंचालकांनी शेतकऱ्यांच्या निदर्शनाबद्दल मोदी तसेच त्यांची सुरक्षा यंत्रणा यांना पूर्वसूचना दिली होती, असा दावा केला आहे. त्याबाबत आता वेगवेगळी माहिती बाहेर येत आहे. त्यामुळेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार या घटनेची संपूर्ण माहिती बाहेर येईल, तेव्हाच नेमक्या फटी कुठे आहेत, कोण दोषी आहे, ते स्पष्ट होईल. सुरक्षा व्यवस्थेबाबत जे काही घडले ते गंभीर आहेच; पण त्याचे संकुचित राजकारण करण्याचा मोह मोदी यांनाही आवरला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यातील समन्वयाचा गोंधळ, ऐनवेळी बदललेले नियोजन, पंतप्रधानांचे रस्तामार्गाने जाणे यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. पण त्याचे राजकीय भांडवलच जास्त झाल्याने मूळ मुद्दा काहीसा दुर्लक्षित राहिला. असे भांडवल करण्यात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाचे लोक होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेकडे पक्षातीत भूमिकेतून पाहता यायला हवे. तेच परिपक्व लोकशाहीचे लक्षण असते. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न देशाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, याचे मोल देशवासीयही जाणतात. पंतप्रधानपदी असतानाच इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती; तर याच पदावर असताना श्रीलंकेसंबंधी स्वीकारलेल्या धोरणामुळे, ‘एलटीटीई’ने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली, हा इतिहास तसा अलीकडचाच आहे. एकूणच अशा संवेदनशील प्रश्नावर सगळ्यांनीच संयम पाळणे सुज्ञपणाचे ठरले असते. तसा विवेक आणि संयम सध्या राजकारणातून पार हद्दपार झालेला दिसतो. पंजाबातील काँग्रेस नेते जे काही घडले त्याबाबत चिंता व्यक्त करत असताना त्या पक्षाचे नेते सुरजेवाला यानिमित्ताने मोदी यांची खिल्ली उडवू पाहतात, हेही निषेधार्हच. निदान आता तरी राजकारण बाजूला ठेवून जे काही घडले, त्याची निष्पक्षपाती चौकशी व्हायला हवी.

सुरक्षेसाठी माणसाने अभेद्य भिंती उभारल्या आणि त्या भिंतींच्या सुरक्षेसाठी स्वतः माणूस बंदूक घेऊन उभा राहिला.

- ॲरन सॉरकिन (लेखक, पटकथाकार)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top