अग्रलेख : नक्षलवाद्यांच्या कण्यावर घाव | naxalism | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naxalism
अग्रलेख : नक्षलवाद्यांच्या कण्यावर घाव

अग्रलेख : नक्षलवाद्यांच्या कण्यावर घाव

पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीतील म्होरक्यासह तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. राज्यच नव्हे, तर देशाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची आहे. योग्य माहिती आधीच मिळवणे,अचूक नियोजन, सावधता आणि शौर्य या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्र पोलिसांनी मिळविलेले यश उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्राच्या पूर्वेकडील मोठे जंगल क्षेत्र असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना अनेक वर्षांपासून नक्षलवादी हिंसाचाराची कीड लागली आहे. एकेकाळी आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे नक्षलवादी कालौघात खंडणी वसुलीत गुंतले. त्याचबरोबर विकासकामांच्या विरोधात उभे ठाकले. परिणामी हळूहळू स्थानिक लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत गेला. आता बंदुकीच्या धाकावर त्यांच्या कारवाया सुरू आहेत. नक्षलवाद्यांच्या बिमोडासाठी राज्य व केंद्र सरकारने वेळोवेळी मोठमोठ्या योजना आखल्या, अनेक प्रयत्न केले; परंतु, घनदाट जंगलाचा फायदा उठवित शस्त्रांच्या जोरावर नक्षलवादी तग धरून आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे या जंगल भागातील सर्वच सरकारी कामे बंद होती. त्यामुळे नक्षलवादीही शांत होते. अलीकडे कोरोनाचे संकट कमी होताच जंगल परिसरातील प्रकल्प आदींची विकासकामे सुरू झाली. त्यामुळे आदिवासींचा कैवार घेण्याच्या नावाखाली नक्षलवादी पुन्हा डोके वर काढू लागले. सुरजागड येथील विकास कामांच्या निमित्ताने राज्याचे नगरविकासमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र पाठविण्यात आले होते. हे पत्र व सुरजागड आंदोलनाच्या निमित्ताने पोलिस यंत्रणा पुन्हा अधिक सक्रिय झाली. बरेच दिवस शांत असलेले नक्षलवादी काही तरी घातपात करतील, असा पोलिसांचा कयास होता. सूरजागडला निघालेल्या रॅलीतून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून पुढे अनेक धागेदोरे पुढे आले.

मंत्र्यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राची भाषा बघता नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे या भागात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार गोपनीय माहिती मिळविणे सुरू झाले. नक्षलवाद्यांचा वावर आदींवर बारीक नजर ठेवली जात होती. शुक्रवारीच पोलिसांना नक्षली म्होरक्यांच्या वावराबाबत ठोस माहिती मिळाली. त्यावरून ‘नक्षलवाद विरोधी अभियाना’चे प्रमुख संदीप पाटील, गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या सी-६० व अन्य तुकड्यांनी व्यूहरचना आखत मोहीम राबविली. तब्बल ३००च्या वर पोलिस या कारवाईत उतरले. एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांना नक्षलविरोधी कारवाईसाठी जंगलात उतरविणे तेवढेच धोक्याचेही होते. कारण अनेक वेळा नक्षलवादीच पोलिसांना खोट्या खबरा देतात. त्याला फसून पोलिस कारवाईसाठी जंगलभागात जातात. टीप दिलेल्या ठिकाणी अतिशय कमी संख्येने नक्षलवादी असतात. त्या लगतच्या परिसरात ते दबा धरून बसतात.

एकीकडे लुटुपुटुच्या चकमकीत पोलिसांना गुंतविले जाते आणि त्यांना सर्व बाजूंनी घेऊन संपूर्ण पोलिस तुकडीच संपविण्याची योजना आखली जाते. त्या तुकडीला रसदही मिळू दिली जात नाही. अशा पद्धतीने एरवी पोलिसांना जाळ्यात अडकविणारे नक्षलवादीच यावेळी मात्र स्वतःच सापळ्यात अडकले. पलीकडून छत्तीसगड पोलिसांनीही त्यांची सीमा सील केल्याने छत्तीसगडमध्ये पळून जाण्याचा बेत फसला व तिकडून रसदही मिळू शकली नाही. अतिशय विश्वासू माहिती मिळाल्याने एवढ्या मोठ्या संख्येने पोलिस जंगलभागात उतरविण्याची जोखीम पोलिस विभागाने स्वीकारली आणि मोहीम फत्ते केली. या कारवाईत १३ कोटींहून अधिक रकमेची बक्षीसे असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. एकट्या तेलतुंबडेवर पन्नास लाखांचे बक्षीस होते तर अन्य दोघांवर प्रत्येकी २० व १६ लाख रुपयांची बक्षीसे होती. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य आणि मध्य भारतातील कारवायांची जबाबदारी असलेला मिलिंद तेलतुंबडे, त्या खालोखाल प्रमुख असलेले दोघे आणि दोन नक्षल कमांडर अशा पाच प्रमुख नक्षलवाद्यांना संपविण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईने मध्य भारतातील नक्षलवादाचे कंबरडे मोडल्याचे मानले जात आहे.

देशाच्या दृष्टीनेच विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा तिन्ही राज्यांसाठी ही कारवाई महत्त्वाची. या निमित्ताने पोलिसांचे मनौधैर्य आणखी वाढविण्याची गरज आहे. यासाठी त्यांना रोख रक्कम, वेतनवाढी व बढतीरुपी बक्षीसे देण्याची गरज आहेच. त्याचबरोबर नक्षलवादी समस्येकडे समग्र दृष्टीने बघण्याची गरज आहे. ते काम प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे, सरकारचे आहे. आदिवासींच्या भावना जपत यंत्रणेने अधिक संवेदनशीलता दाखविणे गरजेचे आहे. जमिनीचे त्यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडविणे आणि जंगलांवरील त्यांच्या अधिकारांबाबत अधिक उदार धोरण अवलंबण्याची गरज आहे. तसे झाले तर नक्षलवाद्यांना डोके वर काढण्याची शक्यता कमी होईल. गेल्या काही काळात चळवळीतील अनेक म्होरके मारले गेले. काहींनी शरणागती पत्करली. नक्षलवाद्यांचे पितळ उघडे पडल्याने स्थानिक जनताही त्यांच्यापासून दुरावली आहे. नक्षलवाद्यांना आता पूर्वीप्रमाणे स्थानिक भरतीही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वस्तुस्थिती माहिती नसलेल्या शहरी भागातील तरुणाईच्या गळी नक्षलवाद उतरविण्याचे कार्य अलीकडे नक्षलवाद्यांनी सुरू केले आहे. यंत्रणा संवेदनशीलतेने वागली आणि नक्षलवाद्यांविरोधात अशीच सर्व पातळीवर व्यूहरचनात्मक लढाई सुरू ठेवली तर आपली जंगले मोकळा श्वास घेतील. अन्यथा बदला घेण्यासाठी पुन्हा नक्षलवादी डोके वर काढतील, अशी स्थिती आहे.

loading image
go to top