रंग बदलती दुनिया...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscars Awards 2023

लॉस एंजेलिसच्या शानदार डॉल्बी सभागृहात दणाणलेल्या ‘नाटू नाटू’च्या ठेक्याने वेडावून गेलेली लक्षावधी भारतीय मने आता ऑस्करयशाच्या नशील्या रंगात बुडून गेली.

रंग बदलती दुनिया...!

वर्तमानातले चित्रपट आशयाच्या बाबतीत अधिक घनतेकडे वळू लागलेले दिसतात. ही अर्थातच आनंदाची बाब आहे.

लॉस एंजेलिसच्या शानदार डॉल्बी सभागृहात दणाणलेल्या ‘नाटू नाटू’च्या ठेक्याने वेडावून गेलेली लक्षावधी भारतीय मने आता ऑस्करयशाच्या नशील्या रंगात बुडून गेलेली असतील. कारण यंदा एक नव्हे, ऑस्करच्या दोन बाहुल्या भारतीय चित्रविश्वात दाखल झाल्या आहेत. एक ऑस्कर पुरस्कार ‘नाटू नाटू’ या धुंद गाण्यासाठीचा आणि दुसरा ‘एलिफंट व्हिस्परर्स’ या सर्वोत्तम लघुपटासाठीचा. या लघुमाहितीपटात निसर्ग आणि मानवाच्या अद्वैताची लय ऐकू येते.

पैकी ‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर तमीळ चित्रपटाने कोरोनाकाळाचे मळभ सपशेल उडवून लावले होते. त्याच चित्रपटातील ठेकेबाज ‘नाटूगीता’ने ऑस्करची बाहुली पटकावली. यंदाचे ‘सर्वोत्कृष्ट अस्सल चित्रपटगीत’ म्हणून हे गाणे नावाजले गेले आहे. तसे ते होणार, याची अटकळ होतीच. मेलडीच्या खुराकावर पोसलेल्या जुन्या पिढीतील भारतीय ‘कानसेनां’ना ‘नाटू नाटू’चा एवढा दणदणाट कशासाठी, याचा अंदाज लागत नव्हता. पण हेच गीत जेव्हा ऑस्करच्या रंगमंचावर नृत्यवृंदाने पेश केले तेव्हा त्यातून उसळणारी ऊर्जेची कारंजी, नजरबंदी करणारा पायांचा ठेका, भारतीय संगीत आणि पाश्चात्य वाद्यमेळाचा अपूर्व मिलाफ यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले.

प्रसिद्ध सिनेतारका दीपिका पदुकोण हिने राहुल सिप्लिगुंज आणि कालभैरवा या दोघा गायकांची ओळख करुन दिल्यानंतर नर्तकवृंदाने मंचाचा ताबा घेत ‘नाटू नाटू असे काही पेश केले की, जणू त्या डॉल्बी सभागृहाचे छप्पर उडाले! एमएम कीरवाणी यांची स्वररचना, प्रेमरक्षित यांची नृत्यरचना आणि निष्णात नर्तकवृंदाने सादर केलेला हा नजराणा डॉल्बी सभागृहात पेश झाला, तेव्हा उपस्थित थक्क झाले होते. अशाच प्रकारचा जल्लोष २००८ मध्ये ए. आर. रेहमान आणि गुलजार यांच्या ‘जय हो’ने केला होता. प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे ओढण्यासाठी जगभरातली चित्रसृष्टी आटोकाट प्रयत्न करते आहे, त्या पार्श्चभूमीवर ‘नाटू नाटू’चे यश डोळ्यात भरण्याजोगे आहे. या गाण्यावर ठेका धरला नाही, असा एकही भारतीय पाय नसेल!

‘नाटू नाटू’चे कौतुक चाललेले असतानाच ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भावगर्भ भारतीय लघुमाहितीपटाने ऑस्करचा बहुमान पटकावला आहे. ‘नाटू नाटू’च्या जल्लोषात हे यश निव्वळ कुजबुजण्याजोगे नाही तर अगदी उच्चरवात अभिमानाने सांगण्याजोगे आहे. तमिळनाडूतील फॉरेस्टात राहणाऱ्या बोम्मन आणि बेली नावाचे वनवासी जोडपे रानटी हत्तींचा प्रतिपाळ कसे आईबापाच्या भूमिकेतून करते, त्याची सत्यकहाणी पडद्यावर आणणारा हा लघुमाहितीपट आपण सारीच निसर्गाची लेकरे आहोत, हा संदेश कुठलाही उपदेश किंवा सुविचार न मांडता देतो. यात कामे करणारे कलावंत ‘कलावंत’ नाहीत, प्रत्यक्ष तीच माणसे आणि प्राणी आहेत. आवर्जून पाहावा, असा हा लघुमाहितीपट आहे.

कार्तिकी गोन्सालवीस आणि गुणित मोंगा यांनी ‘नेटफ्लिक्स’साठी तयार केलेला हा लघुमाहितीपट भारताची मान उंचावणारा ठरला आहे. ऑस्कर पुरस्कारांच्याबाबतीत अनेक भाकिते दरवर्षी केली जातात. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नव्हते.

परंतु, एखाद-दुसरा अपवाद वगळता जाणकारांचे बरेचसे अंदाज अचूक ठरले. ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारांची अक्षरश: लूटमार केली. डॅनियल शायनर्ट आणि डॅनियल क्वान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळवता झालाच, पण सोबत उत्कृष्ट अभिनेत्री, सहायक अभिनेते, पटकथा वगैरे आणखी सहा ऑस्कर त्याने पटकावले. २००८ मध्ये ‘स्लमडॉग मिलियनर’ने अशा प्रकारचा पराक्रम केला होता.

‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’ या चित्रपटाची गोष्ट अमूर्त अंगाने जाते. या चित्रपटाद्वारे मलेशियन वंशाच्या मिचेल येवोने सर्वोत्तम अभिनेत्रीची बाहुली घरी नेली, तिची प्रमुख भूमिका वाखाणण्याजोगी आहे. ‘द व्हेल’ या चित्रपटातील लठ्ठंभारती इंग्रजीच्या प्राध्यापकाची हळवी भूमिका साकारणारा ब्रेंडन फ्रेझर याने सर्वोत्तम अभिनेत्याचा मान मिळवत आपले पुनरागमनही सार्थ ठरवले. ‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट’ हादेखील एक नितांतसुंदर युद्धविरोधी युद्धपट आहे. त्याला उत्कृष्ट छायालेखनाचा पुरस्कार मिळाला. ‘द बान्शीज ऑफ इन्शिरिन’मधल्या अभिनेता कॉलिन फॅरेलची भूमिका नावाजली गेली होती; पण त्याचा पुरस्कार हुकला, तसेच विख्यात निर्माता-दिग्दर्शक स्टिवन स्पीलबर्गने आत्मीयतेने केलेल्या ‘द फेबलमॅन्स’लाही रिकाम्या हाताने परतावे लागले.

नभांगणातील नवतारा विस्तारत जातो, तशी जागतिक चित्रपटसृष्टी विस्तारते आहे, असे दिसते. समाजमाध्यमे आणि ओटीटी मंचांच्या तुफानी धडाक्यानंतर मनोरंजनाचे विश्‍व सामान्य माणसाच्या मुठीत आले. साहजिकच चित्रपटगृहे ओस पडत गेली. कोरोनाचे भयावह संकट आल्यानंतर तर मनोरंजनाचा आकृतिबंधच बदलून गेला. प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे कसे ओढायचे, हा यक्षप्रश्न भेडसावू लागलेला असताना चित्रपटांची दुनिया आपले जुने रंग आणि कात टाकू पाहाते आहे, असा भास होतो. चित्रपटविश्वातल्या प्रवाहांचा अदमास घेतला तर लक्षात येते की, जे घटक एकेकाळी उत्तम चित्रपटाचा फॉर्म्युला ठरत होते, ते चित्रपटांनी ओटीटी माध्यमांना बहाल करुन टाकले आहेत. उदाहरणार्थ, गुन्हेगारी किंवा विकारविलसितांच्या कहाण्या! वर्तमानातले चित्रपट आशयाच्या बाबतीत अधिक घनतेकडे वळू लागलेले दिसतात,ही आनंदाची बाब. तंत्रज्ञान, कथावस्तू यात काळानुरुप बदल होत असतात. आशयघनतेची मागणी मात्र अधिक आग्रही होत चालली आहे. त्याचे प्रतिबिंब यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात उमटले.