अग्रलेख : मारेकऱ्याचा गौरव कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress
अग्रलेख : मारेकऱ्याचा गौरव कशाला?

अग्रलेख : मारेकऱ्याचा गौरव कशाला?

राजीव गांधी यांच्या हत्येला ३१ वर्ष पूर्ण होत असतानाच, या हत्येच्या कटातील एक प्रमुख गुन्हेगार ए. जी. पेरारीवलनची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका झाल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. एवढेच नव्हे तर तमिळनाडूतील द्रमुक तसेच अण्णाद्रमुक या दोन कट्टर पारंपरिक विरोधकांना एकाच वेळी आनंदाचे भरते आल्याचे चित्र समोर आले आहे! पेरारीवलनची सुटका काही तो निर्दोष ठरल्याने झालेली नाही, तर कायद्यातील काही तरतुदींच्या आधारे तांत्रिक कारणांनी झालेली आहे, याचेही भान तमीळ अस्मिताबाजीत रमलेल्या या पक्षांना उरलेले नाही. त्यामुळे पेरारीवलनच्या सुटकेचे श्रेय घेण्यासाठी हे दोन्ही पक्ष अहमहमिकेने मैदानात उतरले तर आहेतच; शिवाय त्यामुळे ‘तमीळ राष्ट्रवादा’ला नव्याने फोडणी देऊन या राज्यातील सर्वच स्थानिक तसेच प्रादेशिक छोटे-मोठे पक्षही पेरारीवलनच्या उदात्तीकरणात दंग झाले आहेत. हे चित्र मन विषण्ण करून सोडणारे आहे. राजीव गांधी यांची १९९१च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान हत्या झाली. त्या कटात प्रत्यक्ष सामील असल्याचा आरोप पेरारीवलन याच्यावर होता. तपासाच्या व न्यायालयीन अशा सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला शिक्षा देण्यात आली होती, हे विसरता येणार नाही. राजीव गांधी यांची हत्या करताना घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात आणखी किमान डझनभरांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि त्यात काही तमिळी पोलिसही होते. तरीही या गुन्हेगाराच्या सुटकेमुळे या पक्षांना आलेले आनंदाचे उधाण हे निषेधार्ह आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पेरारीवलनची सुटका होताच, तो आणि त्याची आई यांची भेट घेतली आणि त्यास चक्क प्रेमभराने आलिंगनही दिले! ‘मुख्यमंत्री’ या वैधानिक पदावर असलेल्या एका व्यक्तीने एका मोठ्या हत्येचा आरोप सिद्ध होऊन, तब्बल तीन दशकांचा कारावास भोगून सुटलेल्या गुन्हेगाराला अशा रीतीने प्रतिष्ठा देणे, हा औचित्याचा भंग आहे. अशा प्रकारे राजकीय पक्ष गुन्हेगारांचे उदात्तीकरण करत असतील, तर असे गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढत जाऊ शकते, याचेही भान स्टॅलिन यांना उरलेले नाही. त्याचवेळी अण्णा द्रमुकचे दोन माजी मुख्यमंत्रीही पेरारीवलनची गौरवगाथा मुक्त कंठाने गात, पेरारीवलनच्या सुटकेचे श्रेय जयललिता यांनी मुख्यमंत्रीपदी असताना घेतलेल्या ठाम भूमिकेस देत आहेत. या मागे तमिळी मतपेढ्यांचे राजकारण तर आहेच; शिवाय या उदात्तीकरणास श्रीलंकेतील तमीळ विरुद्ध सिंहली यांच्यातील विद्वेषाचा आणखी एक पदर आहे.

श्रीलंकेत १९८० या दशकाच्या अखेरीस स्थानिक सिंहली विरुद्ध तमिळ यांच्यातील संघर्षाने रौद्र स्वरूप धारण केले होते. तामिळ टायगर्स या नावाने काम करत असलेल्या संघटनेने मोठ्या प्रमाणात हत्यासत्र सुरू केले होते. त्यावेळी आपल्या या शेजारच्या राष्ट्रात शांतता प्रस्थापित व्हावी, या एकमात्र उद्देशाने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी तेथे भारतीय सैन्याचे ‘शांतता पथक’ रवाना केले होते. या पथकाकडून तेथे शांतता प्रस्थापित करताना काही तमिळींची हत्याही झाली होती. श्रीलंकेतील घटनेचे पडसाद तमिळनाडूत उमटतात. तेथे राजीव गांधी तसेच काँग्रेस यांच्याविरोधात विद्वेषाची लाट उफाळून आली होती. हा संताप इतका भयानक होता की पुढे ही कारवाई थांबून आपले ‘शांतता पथक’ चेन्नईत परतले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि द्रमुकचे बडे नेते करुणानिधी यांनी या पथकाच्या स्वागतास जाण्यासही नकार दिला होता. राजीव गांधी यांच्याविरोधातील संतापाच्या याच लाटेत माथी भडकलेल्या काहींनी अखेर त्यांची हत्या घडवून आणली. आज पेरारीवलनच्या उदात्तीकरणाच्या या लाटेत अण्णाद्रमुकही सामील होण्यास आणखी एक कारण आहे. जयललिता मुख्यमंत्री असतानाच मंत्रिमंडळाने केवळ पेरारीवलनच नव्हे तर या हत्येच्या खटल्यात दोषी ठरलेल्या सर्वांची सुटका करावी, असे केंद्राला साकडे घातले होते. तसे न झाल्यास आपले सरकार या सर्वांना मुक्त करेल, असे आव्हानही जयललिता सरकारने दिले होते. तमीळ अस्मितेपोटी हे पक्ष कोणत्या थराला जाऊ शकतात, त्याचेच हे उदाहरण होते.

अर्थात, आपल्या देशात झालेल्या राजकीय हत्या तसेच जातीय आणि धार्मिक विद्वेषातून उफाळलेल्या दंगली यात शिक्षा झालेल्यांच्या उदात्तीकरणाचे प्रयत्न नवे नाहीत. त्याची सुरुवात थेट स्वातंत्र्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या महात्मा गांधींच्या हत्येपासून झालेली बघावयास मिळत आहे.

पेरारीवलनच्या सुटकेनंतर खरा पेच उभा राहिला आहे तो द्रमुकचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची. खरे तर राजीव गांधी कुटुंबियांनी या हत्येतील गुन्हेगारांना माफी बहाल केलेली असतानाही, पेरारीवलनच्या सुटकेनंतर काँग्रेसने शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त केला होता. पण या पक्षाशी आघाडी करणारा द्रमुकच या उदात्तीकरण मोहिमेत आघाडीवर आहे आणि काँग्रेसला मूग गिळून गप्प राहणे भाग पडले आहे. मात्र, गुन्हेगारांच्या या अशा प्रकारच्या उदात्तीकरणाचा करावा तितका निषेध थोडाच. अशा उदात्तीकरणामुळे अशा प्रकारच्या हिंसक आणि सुडाच्या राजकारणाला बळ मिळते, याचे भान ठेवून याबाबतीत संयम पाळण्याची गरज आहे. सत्तेच्या खेळात सद्सद्विवेकाला सोडचिठ्ठी देण्याची गरज नाही.

Web Title: Editorial Article Writes Rajiv Gandhi Murderer Congress Politics Mk Stalin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top