अग्रलेख : परतीचे काटेरी दोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin

कोणतेही युद्ध हे विशिष्ट अशा उद्दिष्टासाठी लढले जाते. दीर्घकाळ लढूनही ते साध्य होत नसेल तर होणारे नुकसान कितीतरी जास्त असते.

अग्रलेख : परतीचे काटेरी दोर

कोणतेही युद्ध हे विशिष्ट अशा उद्दिष्टासाठी लढले जाते. दीर्घकाळ लढूनही ते साध्य होत नसेल तर होणारे नुकसान कितीतरी जास्त असते. त्याची जाणीव जसजशी गडद होत जाते, तसेतसे त्यात गुंतलेले सर्वच जण घायकुतीला येतात आणि त्यांच्या बेधुंदपणाला ‘सीमा’ राहात नाही. रशिया- युक्रेन युद्धाबाबत गेले काही दिवस तसेच घडताना दिसते आहे. त्यातल्या त्यात आशेचा किरण म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की या दोघांनीही निदान युद्धबंदीविषयी निदान काही वाच्यता तरी केली आहे एवढाच. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अलीकडेच अमेरिकेत जाऊन, अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतल्यानंतर पुतीन यांचा जमिनीपासून चार अंगुळे वरूनच चाललेला ‘गर्वरथ’ जमिनीवर उतरला होता आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी ‘रशियाला हे युद्ध थांबवायचे आहे आणि त्यासाठी राजनैतिक पातळीवरील वाटाघाटी कामी येऊ शकतील,’ अशा आशयाचे उद्‍गार काढले होते.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विषयात पुढाकार घेऊन प्रथम पुतीन यांच्याशी बोलणी केली आणि त्यांनंतर झेलेन्स्की यांच्याशीही या प्रकरणात शांततापूर्ण तोडगा कसा काढता येईल, याबाबत विचारविनिमय केला होता. परंतु जोवर अमेरिका या प्रयत्नांत सक्रिय आणि मनःपूर्वक भाग घेत नाही, तोवर हे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता नाही. अमेरिकी शस्त्रास्त्र उत्पादकांना युद्ध थांबायला नको आहे. उलट नव्याने उत्पादित होत असलेल्या शस्त्रांसाठी त्यांना बाजारपेठ हवी आहे. एकूणच युद्धापेक्षाही युद्ध थांबविण्याचा मार्ग किती कठीण असतो, याची प्रचीती सध्या येत आहे. झेलेन्स्की यांनी यासंदर्भात दहाकलमी कार्यक्रम सादर केला आहे. त्याचा उपयोग समझोत्यासाठी होण्याची शक्यता नसली तरी वातावरणनिर्मितीसाठी होऊ शकेल. झेलेन्स्की यांनी ‘जी-२०’ या व्यासपीठावरून दहा कलमे जाहीर केली.

त्यांच्या तोडग्यात रशियाने आपले सैन्य त्वरित मागे घ्यावे, सर्व युद्धकैद्यांची सुटका करावी तसेच युक्रेनचे सार्वभौमत्व मान्य करतानाच अणुसुरक्षेबरोबरच अन्न आणि ऊर्जा सुरक्षेचीही हमी घ्यावी, अशी काही कलमे होती. झेलेन्स्की-बायडेन भेट तसेच त्यानंतर मोदी यांनी घेतलेला पुढाकार यामुळे हे युद्ध थांबवण्याविषयी निदान बोलले जाऊ लागले. मात्र या विषयात अद्याप ठोस काही घडलेले नाही. पुतीन यांनी युक्रेनबरोबर बोलणी करण्याची तयारी दर्शवली असली तरी युक्रेनच्या पाश्चिमात्य समर्थक राष्ट्रांना ते मान्य नाही, असे सांगण्यात येते. तर कबजा केलेला युक्रेनचा भूभाग सोडण्याची रशियाची तयारी नाही, असा युक्रेनचा दावा आहे. मात्र, या गुंतागुंतीच्या आणि शह-काटशहाच्या राजनीतीनंतरही आता या युद्धाचा शेवट जवळ आला आहे, असे निदान चित्र उभे राहणे, दिलासा देणारे आहे.

गेल्या सप्टेंबरमध्येच मोदी यांनी पुतिन यांच्याशी संपर्क साधून, ‘हे युद्ध आणि लढायांचे युग नाही,’ असे उद्‍गार काढले होते. तेव्हापासून युक्रेन हा आपल्या पाश्चिमात्य पाठीराख्यांपेक्षाही भारतावरच अधिक अवलंबून आहे, असे दिसत आहे. एकीकडे युद्ध थांबविण्याची बात केली जात असली तरी त्याच्याशी सुसंगत वर्तन घडते आहे का, हा प्रश्न आहेच. रशियन कच्च्या तेलाच्या भावांवर बंधन घालण्याच्या अमेरिकी आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या देशांना पुढचे पाच महिने तेल पुरवले जाणार नाही, अशी घोषणा पुतीन यांनी केली आहे. एकीकडे दोन्हीकडची जीवितहानी आणि दुसरीकडे युद्धधोरणांच्या विरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी असे प्रकार रशियात सुरू आहेत. तेथील अनेकांचे आवाज बंद करण्यात आले. काही जण ‘गायब’च झाले. पुतीन यांची पाताळयंत्री शैली युद्धाआधीही सर्वपरिचित होती. या पार्श्वभूमीवर भारतात ओडिशा येथे झालेल्या दोन संशयास्पद मृत्यूंमुळे खळबळ माजणे स्वाभाविक आहे.

पर्यटनासाठी भारतात आलेल्या एका रशियन लोकप्रतिनिधीचा ओडिशातील एका हॉटेलमधील तिसऱ्या मजल्यावरून पडून मत्यू झाल्याचे सांगितले गेले. पॉवेल अँटोव्ह असे या उद्योजक असलेल्या लोकप्रतिनिधीचे नाव असून, ते पुतीन यांचे टीकाकार होते. त्यांच्यासमवेत भारतात आलेल्या आणखी एका पर्यटकाचे दोनच दिवसांपूर्वी निधन झाले. या सगळ्याच्या मुळाशी जाणे आणि घातपाताचे धोगेदोर उकलणे आव्हानात्मक असले तरी आवश्यक आहे. अपघात की कारस्थान, हे शोधावे लागेल. पुतीन यामागे नसतीलच असे सांगता येत नाही; किंवा या संशयास्पद मृत्यूंचा रोख पुतीन यांच्याकडेच जाणार याचा अदमास घेऊन अन्य कोणी हे घडविले आहे का, हेही पाहावे लागेल.

याचे कारण युद्धात पहिल्यांदा हत्या होत असते ती सत्याची. गेल्या सप्टेंबरमध्ये रशियातील ‘लॅकॉइल’ या बड्या तेल कंपनीचे सूत्रधार रॅव्हील मॅगॅनोव्ह यांच्या मृत्यूचे गूढ उलगडलेले नसतानाच आता अँटोव्ह यांचा मृत्यू भारतात झाला आहे. अँटोव्ह हे रशियातील सर्वात मोठे सॉसेज उत्पादक. असेंब्लीमध्ये ‘व्लादिमिर’ भागाचे प्रतिनिधी. दानशूर म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. त्यांनी रशियाचा युक्रेनवरील हल्ला हे ‘अतिरेकी कृत्य’ असल्याचे मत समाजमाध्यमांवर व्यक्त केले होते.

अर्थात कोणताच विरोधी आवाज ऐकून घेण्याची पुतीन यांची तयारी नसते. यद्धकाळात होणारी होरपळ कशी सर्वंकष असते, याचीच ही उदाहरणे आहेत. त्यामुळेच ते थांबविण्याच्या प्रयत्नांना आता बळ मिळावे, एवढीच अपेक्षा आपण तूर्त करू शकतो.