अग्रलेख : अनर्थ अन् उद्रेक

प्रजाहितदक्ष सत्ताधाऱ्यांना जनता खांद्यावर घेऊन मिरवते, मान-सन्मान देते. देवत्वपदीही बसवते.
अग्रलेख : अनर्थ अन् उद्रेक
Summary

प्रजाहितदक्ष सत्ताधाऱ्यांना जनता खांद्यावर घेऊन मिरवते, मान-सन्मान देते. देवत्वपदीही बसवते.

प्रजाहितदक्ष सत्ताधाऱ्यांना जनता खांद्यावर घेऊन मिरवते, मान-सन्मान देते. देवत्वपदीही बसवते. मात्र तेच जेव्हा जनहिताला पायदळी तुडवतात, स्वप्नांची राखरांगोळी करतात, भवितव्य अंधःकारमय करतात, तेव्हा अशा राज्यकर्त्यांना पायदळी तुडवायला तीच जनता मागेपुढे पाहात नाही. सुमारे सहा महिने श्रीलंका असंतोषाने धुमसत आहे. त्याचा हिंसक आणि चिंताजनक उद्रेक सोमवारी झाला. ज्या पंतप्रधान महिंद राजपक्ष यांच्यामागे श्रीलंकावासीय गेली पाच दशके होते, त्यांनीच त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. त्यांच्या निवासस्थानाला चूड लावली. त्यांच्या वडिलांचे स्मारक जमीनदोस्त केले. श्रीलंकेच्या राजकारणावर राजपक्ष घराण्याचे प्रचंड वर्चस्व आहे. पण त्यांच्या अविवेकी धोरणाने, चीनच्या कच्छपीने ते धुळीला मिळत आहे. घराणेशाहीचा अतिरेक, तुघलकी निर्णय, भ्रष्टाचारी, एककल्ली राजवट अशाच शब्दांत राजपक्ष बंधूंच्या राजवटीचे वर्णन करता येईल. हिंद महासागरातील फिलिपिन्समध्ये फर्डिनंड मार्कोस ज्युनियर यांच्या रुपाने पुन्हा मार्कोस घराणे सत्तेवर येत आहे. त्यांच्या वडिलांचीही अशीच हुकूमशाही, एककल्ली, मनमानी, भ्रष्ट राजवट होती. ती तेथील जनतेने उलथवली होती. पुन्हा मार्कोस घराणे फिलिपिन्सच्या सत्तास्थानी येण्याच्या तयारीत असतानाच, ज्या राजपक्ष घराण्याचा उल्लेख ‘श्रीलंकेचे मार्कोस’ असा केला जातो, ते अस्तंगताकडे चालले आहे.

श्रीलंकेच्या राजकारणात पन्नास वर्षे सक्रिय महिंद राजपक्ष यांची राजकीय कारकीर्द राजकीय आणि आर्थिक अराजकामुळे काळवंडली आहे. त्याला ते स्वतः, अध्यक्ष आणि त्यांचे धाकटे बंधू गोटाबाया राजपक्ष, माजी अर्थमंत्री व बंधू बासिल राजपक्ष यांच्यासह सुमारे चाळीसवर आप्त जबाबदार आहेत. आज श्रीलंकेच्या तिजोरीत जेमतेम २५ लाख डॉलरची परकी चलनाची गंगाजळी आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर, देणी, व्याज असे ५१ अब्ज डॉलर आहे. दोन वर्षांपूर्वी आलेला कोरोना, त्याने पर्यटनावर आधारित श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग लावला. आंधळेपणाने सेंद्रिय शेतीचा अट्टाहास आणि रासयनिक खतांची बंदरातील जहाजांची परतपाठवणी अशा तुघलकी कारभारामुळे आगीत तेल ओतले गेले. त्यात भर टाकली ती रशिया-युक्रेन युद्धाने. परिणामी, गेली दोन महिने श्रीलंकेत अशांतता, अस्थिरता, अस्वस्थता नांदते आहे.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, औषधे, इंधनापासून गरजेच्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. बहुतांश राजपक्ष सत्तेवरून पायउतार होऊनही विरोधी पक्ष सर्वसमावेशक सरकारात सामील व्हायला धजेनात. शांततेत निदर्शने करूनही प्रश्‍न सुटत नसल्याने आंदोलनकर्त्यांच्या संयमाचा बांध फुटला. आता श्रीलंकेत राजकीय आणि सामाजिक अराजक भडकले आहे. लष्करप्रमुख म्हणून तमिळ फुटिरतवाद्यांचा निप्पात केल्यामुळे ‘द टर्मिनेटर’ उपाधी लाभलेल्या अध्यक्ष गोटाबाया यांनी जनतेलाच आपत्तीत लोटले आहे. त्यांच्यावर मानवी हक्कांची पायमल्ली, शस्त्रसामग्री खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महिंदा यांच्यावरही त्सुनामीची मदत हडप करण्यापासून भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. अर्थमंत्रीपदाच्या काळात बासिल राजपक्ष यांचा उल्लेख ‘मिस्टर टेन पर्सेंट’ व्हायचा. श्रीलंका प्रशासकीय सेवेसह दोन हजारांवर कामगार संघटनांनी गोटाबाया राजपक्ष यांनीही सत्ता सोडावी म्हणून आंदोलन केले तरी ते जळूसारखे सत्तेला चिकटून आहेत.

देश उभा करायचा, तर त्या देशातील लोकांमध्ये काही प्रेरणा रुजवाव्या लागतात. नेतृत्वाची कसोटी त्यात असते. मग कोणाचे तरी मांडलिक होण्याची, कोणाच्या तरी कुबड्यांवर चालण्याची गरज उरत नाही. श्रीलंकन राष्ट्रवादाला असा विधायक आशय मिळालाच नाही. उलट तो वंशवादात विभागला गेला. त्यातून किती अनर्थ होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे आजचा श्रीलंका. चीनच्या बळावर गगनभरारीचे स्वप्न राजपक्ष यांनी रंगवले होते. परिणामी, सहा अब्ज डॉलर आणि परतफेडीसाठी महसुलातील मोठा वाटा देणे असा बोजा श्रीलंकावासीयांच्या डोईवर आला आहे. एकही विमान न उतरलेले विमानतळ, सामना न झालेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारले. भारताला शह देण्यासाठी हमनबोटा बंदर चीनला विकसित करायला दिले. या सगळ्याची विषारी फळे श्रीलंकावासीयांच्या जीवावर उठली आहेत.

चीन मात्र चार तुकडे फेकण्यापलीकडे श्रीलंकेतील राजपक्ष यांना वाचवायला पुढे सरसावलेला नाही. याउलट आपण आतापर्यंत दोन अब्ज डॉलरची विविध स्वरुपात मदत केली. एक अब्ज डॉलरची तरतूद करून शेजारधर्म निभावला. औषधे, इंधन दिले. आपण त्यांना शांतता, स्थैर्यासाठी मदत केली. उलट कटोरा घेऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई बँक, जागतिक बँक यांच्याकडे श्रीलंकेने हात पसरूनही त्यांनी झुलवत ठेवले. या संस्थांवर अमेरिका, युरोपीय देशांचे वर्चस्व आहे. एका अर्थाने जागतिक राजकारणाची दिशा बदलत असली तरी अमेरिकी, युरोपीय वर्चस्वाची धार कायम आहे, हेच खरे. ज्या प्रकारे जनक्षोभाला राजपक्ष घराणे तोंड देत आहे, ते पाहता हिंसक, अप्रिय घटनांची धार अधिक टोकदार होऊ शकते. त्याने श्रीलंकेतील अराजक आणि अस्थिरतेचा वणवा अधिक दाहक होऊ शकतो. ज्या जनतेने डोक्यावर घेऊन आनंदाने मिरवले, त्यांच्या गळ्यातले ताईत झाले, त्या जनतेची हाक राजपक्ष यांनी ऐकली पाहिजे. आता ‘लव्ह’ नव्हे तर ‘हेट’ स्टोरीचा अंक सुरू असल्याचे वास्तव समजून घेतले पाहिजे. म्हणूनच असंतोषाचा वणवा शमवण्यासाठी गोटाबाया राजपक्ष यांनीदेखील बंधू महिंदा यांच्या पावलावर पाऊल ठेवून सत्तेवरून दूर झाल्याशिवाय कोंडी फुटणार नाही. नाही तर जनताच त्यांना सत्ताच्युत करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com