
अग्रलेख : आकांक्षांपुढती ट्विटर ठेंगणे
एलॉन मस्क या उद्योगपतीच्या आकांक्षांचा वारू किती वेगाने धावतो आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा ट्विटर ही समाजमाध्यम कंपनी विकत घेण्याच्या निर्णयावरून आला. माहिती आणि विचारांचे मुक्त वहन करणाऱ्या समाजमाध्यमांचा प्रभाव पाहता ट्विटरने अक्षरशः सारे जग कवेत घेतले आहे, असे म्हटले जाते. मंगळावर किंवा चंद्रावर मनुष्याचा तळ असला पाहिजे आणि तिथे वस्ती करता आली पाहिजे, अशी आरपार गगनभेदी स्वप्ने पाहणाऱ्या या उद्योजकाला मायक्रोब्लॉगिंगची सुविधा असलेल्या ‘ट्विटर’सारख्या माध्यमावर मालकी प्रस्थापित करण्याची गरज का वाटली असेल? कोणाच्याही मनात स्वाभाविकपणे उपस्थित होणारा हा प्रश्न. खुद्द मस्क यांनीच विविध मुलाखतींमधून ‘संपत्ती मिळविण्यासाठी मी काही करीत नाही आणि बॅंकेत किती रक्कम आहे, यावर माझे समाधान अवलंबून नसते’, असे म्हटले आहे. हा दावा कितपत खरा आहे, यावर मतमतांतरे होऊ शकतात. याचे कारण मस्क यांचा बालपणापासूनचा प्रवास पाहिला तर त्यात सतत नवीन करून पाहण्याची ऊर्मी दिसतेच; पण त्याचवेळी त्यातील अर्थकारणाविषयी असलेली त्यांची जागरुकताही जाणवते.
अगदी लहानपणापासून कम्प्युटरची आणि व्हिडिओ गेमची आवड असलेल्या मस्क यांनी शालेय वयातच स्वतः कल्पना लढवून असा एक गेम बनवला. नुसता गेम बनवून स्वस्थ न बसता तो पाचशे डॉलरला विकलादेखील. पुढची त्यांची वाटचाल पाहिली तर ‘बे एके बे’असे पाढे म्हणण्याऐवजी लाखाचे आणि कोटींचेच पाढे म्हणणाऱ्यांपैकी मस्क एक असावेत, असे वाटते. उद्योजकीय भूकेच्या पोटात संपत्तीसंचयाची भूक असतेच. मस्क हे काही त्याला अपवाद नाहीत. पण त्याहीपलीकडे आपले प्रभावक्षेत्र वाढविण्याचीही ऊर्मी असते. सत्तेचा सोपान खुणावतो, तो केवळ राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनाच अशी काहींची समजूत असते. ती बरोबर नाही. मस्क यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींनाही तो साद घालत असतो. विजेवर चालणारी वाहने बनविणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सीईओ असलेले मस्क एकदम ‘ट्विटर’सारख्या समाजमाध्यम क्षेत्रातील कंपनीवर मालकीची अभिलाषा बाळगतात ती यामुळेच.
सध्या राजकीय संज्ञापनात सर्वाधिक प्रभावी ठरत जाणारे ट्विटर हे माध्यम आहे. अगदी मोजक्या शब्दात केलेला संदेश सर्वदूर पोचविण्याची त्याची खासियत राजकीय नेत्यांना आकृष्ट करते. या राजकीय संदेशवहनाचा जगभरातील एकूण व्याप प्रचंड आहे. या माध्यमावर नियंत्रण याचा अर्थ केवळ नवा ब्रॅंड मिळविणे एवढेच नसून सर्व संबंधित ‘डेटा’ उपलब्ध होणे असाही होतो. ही माहिती विविध प्रकारची असेल. ती उपयुक्त आहेच; पण विशेष नोंद घेण्याची बाब ही, की देशोदेशीच्या नागरिकांचा राजकीय कल आणि दृष्टिकोन यांविषयीच्या माहितीचाही त्यात अंतर्भाव आहे. ‘माझ्या निर्णयामागे आर्थिक कारणे नाहीत’ असे जेव्हा मस्क म्हणतात, तेव्हा ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते.
महिन्याला तीस कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्ते, पस्तीसहून अधिक भाषांमधून होणारे संदेशवहन, रोजच्या रोज केल्या जाणाऱ्या ट्विटची संख्या चाळीस कोटीहून अधिक असलेल्या या समाजमाध्यम कंपनीभोवती एक वलय निर्माण झाले असल्यास नवल नाही. फेसबुकनेही ही कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी झाला नाही. मस्क यांनाही ट्विटरच्या संचालक मंडळाने सुरवातीला विरोध केला होता. कंपनीचे नऊ टक्के समभाग आपल्या ताब्यात आहेत, असे जाहीर करून मस्क यांनी प्रथम आपला इरादा व्यक्त केला तेव्हा संचालक मंडळच नव्हे तर अन्य समभागधारकांनीही फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तब्बल ४४ अब्ज डॉलर आपण गुंतवणार असून ते कशाप्रकारे गोळा करीत आहोत, हे मस्क यांनी जाहीर केल्यानंतर कंपनी करारास राजी झाली आहे.
त्यामुळे २०१३ पासून सार्वजनिक कंपनी असलेली ट्विटर आता पूर्णपणे खासगी कंपनी होणार आहे. पण या मालकी हस्तांतरापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आहे तो मस्क यांच्या धोरणांचा. ते निरपवाद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत आहेत आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालणे चुकीचे आहे, असे ट्विट त्यांनी मागेच केले होते. कार्यप्रणालीत संपूर्ण पारदर्शकता आणली पाहिजे, या मताचे ते आहेत. हे ऐकायला मधूर वाटत असले तरी असे निरपवाद स्वातंत्र्य शक्य आहे काय आणि इष्ट आहे का, याचाही विचार करावा लागेल. सध्याच अशा प्रकारच्या अनिर्बंध संज्ञापनाचे काय परिणाम होत आहेत, त्याचा अनुभव देशोदेशी येत आहे. मस्क यांनी अमेरिकी कायद्याच्या चौकटीतच स्वातंत्र्य असेल असे स्पष्टीकरण केले असले तरी या बाबतीत केवळ अमेरिकेच्या परिस्थितीचा विचार करून भागणारे नाही. जगात इतर देशांचेही काही प्रश्न आणि त्याविषयी त्यांना वाटणारी काळजी आहे. इलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षेची उड्डाणे डोळे दिपवून टाकणार असली तरी या संदर्भातील संवेदनशीलता आणि उत्तरदायित्व याचा विसर पडून चालणार नाही; कंपनी ‘खासगी’ झाली असली तरीही. आपल्या निर्णयामागे अंतःस्फूर्तीचाही भाग असतो, असे सांगणाऱ्या मस्क यांना सार्वजनिक संवादाइतकेच आंतरिक संवादाचे महत्त्वही ठाऊक असेल, असे मानण्यास जागा आहे.
Web Title: Editorial Article Writes Twitter Social Media Company
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..