अग्रलेख : समाजभानाची ‘सनद’

देशाच्या प्रशासकीय कारभारात अनेक महिला अधिकाऱ्यांनी कर्तबगारीचे झेंडे आजवर रोवले आहेत. हीच परंपरा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतही महिलांनी कायम राखली आहे.
Shruti Sharma
Shruti SharmaSakal
Summary

देशाच्या प्रशासकीय कारभारात अनेक महिला अधिकाऱ्यांनी कर्तबगारीचे झेंडे आजवर रोवले आहेत. हीच परंपरा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतही महिलांनी कायम राखली आहे.

देशाच्या प्रशासकीय कारभारात अनेक महिला अधिकाऱ्यांनी कर्तबगारीचे झेंडे आजवर रोवले आहेत. हीच परंपरा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतही महिलांनी कायम राखली आहे. ‘मुलगी शिकली; प्रगती झाली!’ या बोधवाक्याचे प्रत्यंतर सोमवारी जाहीर झालेल्या या परीक्षेच्या निकालातून आले आहे. देशभरातून प्रथम क्रमांक नवी दिल्लीच्या श्रुती शर्माने पटकवला आहे, तर महाराष्ट्रातून सर्वप्रथम येण्याचा मान मुंबईकर प्रियंवदा म्हादडकरला मिळाला आहे. गेल्या दोन-अडीच दशकांत युवावर्गाचे अवघे आयुष्य स्पर्धांनी व्यापून टाकले आहे.

शिक्षणापासून संगीतापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून विज्ञानापर्यंत विविध क्षेत्रांतील या स्पर्धांमध्ये महिला बाजी मारत असल्याचे सातत्याने दिसत आहे. प्रशासकीय कारभार अलीकडच्या काळात अनेक बदलांना सामोरा जात आहे. डिजिटलायझेशनने तो अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा, अशी अपेक्षा आहे. या प्रक्रियेत महिला अधिक सक्षमपणे आपला वाटा उचलतील. त्यांच्यामुळे कारभारात अधिकाधिक संवेदनशीलताही येईल, अशी आशा नक्कीच बाळगता येईल.

यापूर्वी २०१४ मध्ये झालेल्या ‘यूपीएससी’च्या परीक्षेत पहिले चार क्रमांक महिलांनी पटकावले होते. त्यानंतर यंदाच्या निकालात श्रुतीपाठोपाठ अंकिता अगरवाल आणि गामिनी सिंघला या दोन युवती आहेत. ‘यूपीएससी’ परीक्षा घेण्यास सुरुवात झाल्यापासून श्रुतीच्या रूपाने महिलेने प्रथम क्रमांक पटकवण्याची ही गेल्या दहा वर्षांतील पाचवी वेळ आहे! असे घवघवीत यश मिळवणाऱ्या या युवतींबरोबरच जिवाची बाजी लावून या परीक्षेत उतरलेल्या आणि अखेर ती बाजी जिंकणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन. ‘यूपीएससी’च्या या निकालात एकूण ६८५ उमेदवारांपैकी महाराष्ट्रांतील यशस्वी उमेदवारांची संख्या ही साठपेक्षा अधिक आहे. याचा अर्थ या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांपैकी दहा टक्के जागा महाराष्ट्राने पटकवल्या आहेत, हे विशेष नमूद करण्याची आणि अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांमध्ये मुंबई, पुणे या महानगरातील उमेदवारांपेक्षा नवशहरी तसेच ग्रामीण भागातील तरुणांची संख्या अधिक असणे, हीदेखील नोंद घेण्याजोगी बाब.

विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच नाशिक या भागातून यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. कुठून आला यापेक्षा किती मेहनत घेतली, याला जास्त महत्त्व आहे, हे यावरून स्पष्ट होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास, उपेक्षित, आदिवासी अशा समाजाच्या विविध घटकातील, आर्थिक स्तरातील उमेदवारांनी केलेली कामगिरीही डोळ्यात भरण्यासारखी आहे. या मुलांना येणाऱ्या अडचणी, परीक्षेसाठी उपलब्ध असणारे महागडे कोचिंग, अन्य सुविधांची कमतरता या साऱ्यांवर मात करून या समाजगटातील युवकांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. त्यास अर्थातच त्यांची जिद्द आणि मेहनत कारणीभूत आहेच. गावागावांतील अनेक तरुण यूपीएससी असो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा, त्यांमध्ये यश मिळवण्यासाठी शहरांच्या दिशेने धाव घेत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे देशभरात बघायला मिळत आहे.

प्रशासकीय अधिकारी बनून गावाची आणि कुटुंबाची उन्नती साधण्याचे स्वप्न ही मुले पाहत असतात आणि काही तडफदार तसेच प्रामाणिक सनदी अधिकारी आदर्श म्हणून, त्यांच्या डोळ्यासमोर असतात. मग या परीक्षांसाठी तयारी करून त्या आदर्शाप्रत पोचण्याचा ते प्रयत्न करतात. असे असले तरीही महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतातील मुले विशेषतः यूपीएससीच्या परीक्षेमध्ये अधिक जिद्दीने उतरतात, हेही वास्तवच. सोमवारी लागलेल्या निकालातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीवर एक नजर टाकली तरी त्याची प्रचिती येते. उत्तर प्रदेश-बिहार या राज्यांतील तरुणांना तेथे फारसे औद्योगिकरण न झाल्याने संधी सीमित असतात आणि सनदी सेवा हाच त्यांना करीअरचा उत्तम मार्ग वाटतो, हे त्यामागचे एक कारण असू शकते. अर्थात महाराष्ट्रातही आता बुद्धिमान तरुणांना या क्षेत्राचे आकर्षण वाटू लागल्याचे गेल्या काही वर्षांतील यशस्वीतेच्या आकड्यांवरून आणि त्याच्या उंचावणाऱ्या आलेखावरून दिसते आणि ही स्वागतार्ह बाब आहे.

‘यूपीएससी’सारख्या प्रशासकीय सेवेच्या परीक्षांना देशभरातून काही लाख तरुण दरवर्षी बसत असतात. त्यातील उत्तीर्णांचे प्रमाण हे अगदीच अत्यल्प असते. परीक्षेसाठी होणारी भाऊगर्दी बघता, या निकालाची टक्केवारी ही जेमतेम एक-दोन टक्के असते, हे लक्षात घ्यायला लागते. वयाच्या विशीत प्रवेश केल्यानंतर हे तरुण या परीक्षेच्या उंबरठ्यावर येतात. पहिल्या प्रयत्नात यश पदरी न पडलेले तरुण पुढे अनेकदा प्रयत्न करत राहतात. आठ-दहा वर्षे या परीक्षांच्या चक्रात घालवूनही यश न मिळालेल्या आणि त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या अनेक तरुणांच्या कहाण्या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. त्यामुळेच सनदी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणे आणि त्यासाठी परिश्रम करणे ही स्वागतार्ह गोष्ट असली तरी ते करत असतानाच करीअरचे आणि जीवनातील अर्थार्जनाचे काही पर्याय मार्ग मनाशी योजून ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक दार उघडले नाही तर दुसरे, नाहीतर तिसरे अशी लवचिकता ठेवायला हवी.

परीक्षेत यश मिळविलेल्या सर्वांनी लोकाभिमुख प्रशासन या ध्येयाच्या दिशेने काम करायचे आहे आणि मिळणार असलेली ‘सनद’ समाजभानाची आहे, याची जाणीव नक्कीच ठेवायला हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com