अग्रलेख : उत्तर प्रदेशातील ‌निरुत्तरित प्रश्न!

देशातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेशातील घडामोडी नेहेमीच देशाचे लक्ष वेधून घेतात.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSakal

उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात जाऊन सरकारच्या कारभाराचा आढावा घेण्याची वेळ भाजपवर आली. ही घटना सूचक आहे. पक्षाच्या सरचिटणीसांनी राज्यात घेतलेल्या भेटीगाठींनंतर तेथील कारभार उत्तम असल्याचा निर्वाळा दिला जात असला तरी पक्षांतर्गत खदखद लपून राहिलेली नाही.

देशातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेशातील घडामोडी नेहेमीच देशाचे लक्ष वेधून घेतात. पुढच्या वर्षी वेळापत्रकानुसार या राज्यासह पाच राज्यांच्या निवडणुका होतील, यासंबंधीचे निवडणूक आयोगाचे निवेदन आणि या राज्यातील आपले स्थान टिकविण्यासाठी भाजपची चाललेली धावपळ या घटनांची दखल घेणे त्यामुळे आवश्यक ठरते. कोरोनाच्या स्थितीचा नेमका अंदाज अद्याप आला नसला तरी लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे स्थिती अनुकूल होईल, असे गृहीत धरून निवडणूक आयोगाने पुढच्या मार्च ते मे दरम्यान होऊ घातलेल्या निवडणुका वेळेवर होतील, अशी ग्वाही दिली आहे.त्यावेळी म्हणजे २०२२मध्ये पंजाब तसेच गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड येथेही निवडणुका होणार असल्या तरी अवघ्या देशाचे लक्ष मे महिन्यातील रणरणत्या उन्हात उत्तर प्रदेशची जनता काय कौल देणार, याकडे आतापासूनच लागले आहे. त्याचे एक कारण म्हणजे चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून उत्तर प्रदेशातील सत्ता हासिल करण्यात यशस्वी झालेल्या योगी आदित्यनाथ यांच्या कारभाराविषयी भारतीय जनता पक्षातील काही नेतेगणांनी व्यक्त केलेली जाहीर नाराजी.

दुसरे म्हणजे नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांचे पक्षाच्या दृष्टीने लागलेले असमाधानकारक निकाल. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभाराचा लेखाजोखा तपासून घेण्यासाठी भाजपने मुख्य संघटनात्मक बाबींसंबंधातील कामकाज बघणारे सरचिटणीस बी. एल. संतोष यांना तेथील मंत्र्यांशी एकास एक पद्धतीने चर्चा करण्यास धाडले. आपल्याच पक्षाच्या एखाद्या मुख्यमंत्र्याच्या कारभाराचा अशा रीतीने ‘ताळेबंद’ मांडण्याची वेळ भाजपवर येण्याची ही मोदी तसेच अमित शहा यांच्या राजवटीतील पहिलीच वेळ होती आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आता उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या आधी मुख्यमंत्री बदल तर होणार नाही ना, अशी कुजबूज सुरू झाली.

खरे तर या ‘योगीं’चा महिमा किती अगाध आहे, हे २०१७मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्रीपद मिळवले, ते अद्याप कोणीही विसरलेले नाही. भाजपमध्ये मोदीनंतर निवडणूक प्रचारातील ‘हुकमी एक्का’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच उत्तर प्रदेशात कोरोनाचे थैमान सुरू असतानाही हे योगी बंगालमधील जनतेला ‘रामकथासार’ सांगण्यात दंग होते, तेव्हाच त्यांच्या सरकारच्या कोरोना नियंत्रणातील त्रुटींबद्दल असंतोष आणि तोही स्वपक्षीयांकडूनच गेल्या महिन्यात जाहीरपणे व्यक्त झाला होता. केंद्रीय राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सहा मे रोजीच आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून, ऑक्सिजनचा तुटवडा तसेच इस्पितळात बेड मिळण्यास होणारा अक्षम्य विलंब याबाबत नाराजीचा सूर लावला होता.

आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळातील एक सहकारी आणि लखनौचे आमदार कौशल यांना कोविडमुळे आपल्या भावास गमवावे लागले. ते आणि बस्तीचे खासदार हैश द्विवेदी, भदोहीचे आमदार दीनानाथ भास्कर तसेच कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी आदी आणखी काही भाजप नेत्यांनीही राज्य सरकारच्या प्रशासकीय गोंधळाबाबत संताप व्यक्त करणारी पत्रे लिहिली आहेत. तर भाजपच्याच एका आमदाराने नाव नाव न सांगण्याच्या अटीवर ‘आपण तोंड उघडले तर आपले पद जाईल,’ अशी भीती व्यक्त केली होती. या योगींचा ‘दरारा’ किती मोठा आहे, त्याचीच साक्ष त्यामुळे मिळाली होती. दिल्लीस्थित भाजपश्रेष्ठींचे दूत या नात्याने बी. एल. संतोष यांनी अनेक मंत्री; तसेच उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य तसेच दिनेश शर्मा यांच्या व्यक्तिगत भेटी घेऊन नेमके काय घडतेय, ते जाणून घेतले. हे सारे योगी आदित्यनाथ यांचे पक्षातील स्थान बघता जितके अनपेक्षित तितकेच अकल्पितही होते. अर्थात, त्याचे मूळ हे या देशातील सर्वात मोठ्या राज्यातून लोकसभेवर जाणाऱ्या खासदारांच्या ८० या बलदंड संख्येत आहे, हे लक्षात घ्यावे लागते. त्यामुळेच यदाकदाचित हे राज्य आपल्या हातातून निसटले तर तीन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही त्याचा फटका बसू शकतो, हे ध्यानात घेऊनच ही चाचपणी भाजपने सुरू केली असणार, हे उघड आहे.

मात्र, संतोष यांच्या या दोन दिवसांच्या भेटीगाठींनंतर भाजप नेतेच ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश सरकारवर स्तुतिसुमने वाहू लागले आहेत, ते बघता योगींच्या पक्षातील सध्याच्या प्रभावाची कल्पना येते.‘योगी यांचा कारभार अत्युत्तम असून २० कोटी लोकसंख्येच्या या एका भल्या मोठ्या राज्यात त्यांनी कोरोनावर आणलेले नियंत्रण अन्य कोणत्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला जमलेले नाही,’ असे आता राज्यातील काही भाजपचे नेते सांगू लागले आहेत. तर ‘संघटन सचिव या नात्याने संतोष यांनी केवळ आगामी निवडणुकांसदर्भात चर्चा केली’, असा खुलासा करण्याची वेळ उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यावर आली आहे. पण त्यांनी आणि भाजपच्या प्रवक्ते मंडळींनी कितीही सारवासारव केली, तरी या उत्तर प्रदेश भाजपमधील पक्षांतर्गत खदखद लपून राहिलेली नाही. पक्षशिस्तीच्या नावाखाली ती तात्पुरती झाकली जाईल; पण राज्यातील जनाधार टिकविण्याबाबत पक्षाला वाटत असलेली चिंता या सगळ्या घडामोडींतून स्पष्ट झाली, हे निश्चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com