अग्रलेख : औटघटकेचा आक्रोश! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hang the Rapist

आपला देश प्रगतीच्या घोडदौडीत एकेक टप्पा पार करत निघाल्याचे सांगताना काही जणांचे चेहरे समाधानाने निथळत असले तरी समाजातले अनेक कोपरे अजूनही काळोखात असल्याचे दाखवून देणाऱ्या घटना घडत आहेत.

अग्रलेख : औटघटकेचा आक्रोश!

आपला देश प्रगतीच्या घोडदौडीत एकेक टप्पा पार करत निघाल्याचे सांगताना काही जणांचे चेहरे समाधानाने निथळत असले तरी समाजातले अनेक कोपरे अजूनही काळोखात असल्याचे दाखवून देणाऱ्या घटना घडत आहेत. महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील गोंदिया जिल्ह्यात एक असहाय महिला नराधमांच्या अत्याचारांची बळी ठरली. दहा वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या निर्घृण घटनेत ‘निर्भया’चा बळी गेला होता. घायाळ देहानिशी मृत्यूशी झुंजत असताना तिला देशवासीयांनी मेणबत्त्या पेटवून, मूक निदर्शने करुन साथसोबत दिली होती. यापुढे स्त्रियांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत, अशा आणाभाका अनेक स्वयंसेवी संघटनांनी घेतल्या होत्या. संसदेनेही बलात्काराबाबतचे कायदे कडक करुन या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. गुन्हेगारांना जरब बसावी, हा हेतू त्यामागे होता. परंतु, त्यानंतरही स्त्रियांवर होणाऱे अत्याचार थांबले नाहीत. मुंबईत महालक्ष्मी येथील ‘शक्ती मिल’च्या आवारात घडलेला सामूहिक बलात्काराचा भयानक प्रकार असो किंवा दीड वर्षापूर्वी मुंबईत साकीनाका येथे एका युवतीचा बलात्कारानंतर झालेला मृत्यू असो, स्त्रीवरील अत्याचारांच्या या घटनांची मालिका अजूनही थांबायला तयार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील एका निवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर आश्रमशाळा अधीक्षकाने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. आणखी किती घटना घडल्यानंतर समाज जागा होणार आहे?

गोंदिया जिल्ह्यातील महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेसंदर्भात दररोज समोर येणाऱ्या बाबी बघितल्या तर महिला अत्याचारांच्या घटनांकडे आपण किती असंवेदनशील आणि निर्बुद्धपणे पाहतो याची कल्पना येते, आणि मन ओशाळून जाते. तीन-चार दिवस लैंगिक अत्याचार सोसणारी ही महिला अतिशय विटंबित अवस्थेत रस्त्यालगत बेशुद्धावस्थेत आढळली. नराधमांनी लचके तोडल्यानंतर ती लाखनी पोलिस ठाण्यापर्यंत पोचलीदेखील होती, पण तिच्याकडे कोणी लक्षच न दिल्याने, तेथून ती निघून गेली, आणि पुन्हा बलात्कारालाच बळी पडली, अशी माहिती पुढे येत आहे. हे सारेच अनाकलनीय आणि पोलिसांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारे आहे. लोकसंख्या आणि पोलिस प्रमाण लक्षात घेतले तर गुन्ह्यांना आळा घालण्यास हे पोलिस दल कसे पुरे पडणार असा युक्तिवाद बऱ्याचदा केला जातो. त्यातील तथ्यही नाकारता येणार नाही. पण जेव्हा एक पीडिता पोलिस ठाण्यापर्यंत पोचते, त्यानंतरही ती तेवढीच असुरक्षित राहात असेल, तर यंत्रणेतील या मद्दडपणाला काय म्हणायचे, हा प्रश्न आहे. पोलिसांचे निलंबन वगैरे सोपस्कार आता सुरू झाले आहेतच. परंतु स्त्रियांविषयीची किमान संवेदनशीलता, जाणीव कोणत्याच स्तरावर आपण निर्माण करू शकलेलो नाही.

महिला पोलिसांनाही त्या पीडितेची साधी विचारपूस करावी वाटू नये? या दुर्दैवी महिलेस नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविले गेले असून तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली गेली असली तरी, जंतु प्रादुर्भावामुळे तिची प्रकृती गंभीर आहे.

लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मात्र अनेकांना कंठ फुटला आहे. या प्रकरणी आता आदेश सुटतील, त्याप्रमाणे कारवाईही होईल. स्त्री अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त करणारे चार-चार कॉलमी कढ काढले जातील. समाजमाध्यमांवर नित्याप्रमाणे मतामतांचा गल्बला होईल. काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होईल, ती आणखी एक बलात्काराची घटना उघडकीस येईपर्यंत. गेली अनेक वर्षे हेच आणि असेच चालत आले आहे. हे दुष्टचक्र कधी थांबणार? या सगळ्याच्या मुळाशी स्त्रीला दुय्यम लेखण्याची वृत्ती आहेच. तिचेच विकृत टोक बलात्काराच्या घटनांमध्ये दिसते. एकीकडे कायदे कठोरात कठोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण जे या कायद्याचे रखवालदार आहेत, तेच पुरेसे जागरूक नसतील, तर काय होते, हे विदर्भातील घटनेने दाखवून दिले. लैंगिक अत्याचार हा जागतिक चिंतेचा विषय आहे. जे भारतात घडते आहे, तसेच ते अन्य देशातही कमीअधिक प्रमाणात घडते.

‘निर्भया’ प्रकरण घडले तेव्हा त्याची पाश्चात्य देशांमध्येही चर्चा झाली होतीच. तरीही आपल्या देशात ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे स्त्रीत्वाबद्दलच्या सर्वंकष आदरभावनेचा अभाव. याबाबतीत आपल्या समाजाने शतकानुशतके जो दांभिकपणा दाखवला आहे, त्याला तोड नाही. स्त्रीसन्मानाचा मुद्दा चर्चेत आला की, शतकानुशतकांच्या उदात्त परंपरा, माता, जननी, देवी, देवता ही संबोधने तात्काळ उच्चारली जातात. प्रत्यक्षात आपला बहुतांश समाज स्त्रियांना कसा वागवतो, हे सर्वविदित आहेच! गेल्या तीन वर्षांतील राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवाल सांगतो की, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा समावेश देशातील आघाडीच्या राज्यांत होतो. राज्यात दररोज सुमारे ८८ महिलांवर अत्याचार होतो, असे आकडेवारी सांगते. हे आकडे आपल्या व्यवस्थेचे सपशेल अपयशच दर्शवतात. ही परिस्थिती बदलायची म्हटले तर मार्ग काही सोपा आणि छोटा नाही. प्रबोधन, प्रतिकार आणि प्रहार या तिन्ही मार्गांचा अवलंब एकत्रित होणे गरजेचे आहे. महिलांचा सन्मान वाढवायचा असेल तर त्याची सुरुवात घरापासूनच करावी लागणार आहे, हे सत्य स्वीकारावेच लागेल.