
शोषित, पीडित समाजावरील अन्याय दूर करणे हे ध्येय योग्य आणि कोणालाही पटेल, असे आहे. परंतु साध्य-साधन शुचिता गुंडाळून ठेवून हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला की मूळ ध्येय बाजूलाच राहते. एखादी चळवळ मूळ ध्येयापासून कशी आणि किती भरकटते, याचे उदाहरण म्हणजे नक्षलवादी चळवळ. भारतीय राज्यघटना न मानता इथल्या लोकशाहीला बोगस ठरवत भारतीय राज्यसंस्थेविरुद्ध युद्ध पुकारणे हे देशापुढचे फार मोठे आव्हान आहे. त्याचा मुकाबला करताना नक्षलवाद्यांना नेस्तनाबूत करण्याच्या घोषणा आजवर केंद्रातील आणि राज्यांतीलही विविध पक्षांच्या सरकारांनी केल्या. परंतु ते उद्दिष्ट साध्य झालेले नाही. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोहीम आरंभली असून गेल्या काही दिवसांत झालेल्या दोन कारवायांत मिळून वरिष्ठ नेत्यासह ५८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला, हे सुरक्षा दलांचे नक्कीच मोठे यश आहे. त्याचा तपशील जाणून घेतला तर सुरक्षा दलांनी केलेले नियोजन आणि निर्धार यांचा प्रत्यय येतो. छत्तीसगड- तेलंगण सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांना २६ हजारांहून अधिक सुरक्षा जवानांनी घेरून नक्षलवाद्यांना कोंडले. या कारवाईत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याच्या बातमीची शाई वाळली नसतानाच छत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवादी दलांचा सर्वोच्च नेता व भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या नक्षलवादी संघटनेचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसव राजू याच्यासह २७ नक्षलवादी मारले गेले. या चळवळीचा रणनीतिकार, सर्वेसर्वा बसव राजूचा मृत्यू, हा या चळवळीला बसलेला सर्वात मोठा हादरा.