

women in local politics
esakal
अग्रलेख
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदांसाठी आरक्षण सोडत निघाली आणि अपेक्षेप्रमाणे ५० टक्के आरक्षणाच्या धोरणामुळे निम्म्या महापालिकांचे नेतृत्व महिलांकडे गेले आहे. एकूण २९ पैकी १५ महापालिकांमध्ये आता महिला महापौर विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, नागपूर आणि नाशिक यांसारख्या राज्याच्या आर्थिक आणि राजकीय नाड्या हाती असलेल्या प्रमुख शहरांची धुरा महिलांकडे जाणार आहे. महिलांच्या या वाढत्या राजकीय सहभागाचे केवळ स्वागत करून चालणार नाही, तर या बदलातून निर्माण होणाऱ्या नव्या नेतृत्वाकडून शहरांच्या कायापालटाची अपेक्षा करणेही आता क्रमप्राप्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधी ३३ टक्के आणि नंतर ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे ज्या झपाट्याने महिला राजकारणात सक्रिय झाल्या आहेत, हे कौतुकास्पद आहे.