मनोरंजन जेव्हा जुगारी वृत्तीला बळ देते, तेव्हा केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक प्रश्न तयार होतो. अशा वेळी सरकारला हातावर हात बांधून स्वस्थ बसता येणार नाही. त्या दृष्टीने सरकारने बंदीचे पाऊल उचलले आहे, हे रास्त म्हणावे लागेल.
वास्तव आणि आभासी जगातील सीमारेषा धूसर होण्याचा सांप्रत काळ हा जसा स्थित्यंतराचा आहे, तसाच तो माणसाच्या प्रभुत्वाची कसोटी पाहणारादेखील आहे. वेगवान इंटरनेटने जसे ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मला बळ दिले; तसा ऑनलाइन गेमिंग उद्योगही फोफावला. जुगारी खेळाची अनेकांना चटक लागली. काही कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त झाली.