

Global AI Conference Delhi
sakal
‘गलगोटिया विद्यापीठा’च्या सादरीकरणांमध्ये इतरांच्या संशोधनाचा वापर स्वतःच्या नावाने झाला असेल, तर तो केवळ संस्थेचा प्रश्न राहत नाही; तो भारताच्या संपूर्ण शैक्षणिक परिसंस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ठरतो.
दिल्लीतील ‘भारत मंडपम’मध्ये सुरू असलेली ‘ग्लोबल एआय परिषद’ भारतासाठी तांत्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन ठरावी, अशी अपेक्षा होती. कृत्रिम बुद्धिमत्ता हा २१व्या शतकातील सत्तासमीकरणांचा निर्णायक घटक मानला जात असताना, भारताने स्वतःला ‘जबाबदार, लोकशाहीवादी आणि समावेशक एआय शक्ती’ म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. हेतू चांगला असला तरी त्यासाठी कराव्या लागणाऱ्या काटेकोर पूर्वतयारीच्या आणि नियोजनबद्ध व्यवस्थेच्या बाबतीत राहिलेल्या उणीवांनी कठोर आत्मपरीक्षणाची गरज प्रकर्षाने समोर आणली आहे. परिषदेच्या पहिल्याच दिवसापासून समोर आलेल्या अव्यवस्थेने आणि त्यात भर घालणाऱ्या शैक्षणिक चौर्याच्या वादाने आपल्या प्रयत्नांना गालबोट लागले. नैतिक एआय, डेटा सार्वभौमत्व, जागतिक सहकार्य, स्थानिक भाषांतील मॉडेल, स्टार्टअपना चालना, असे मोठ-मोठे शब्द मंचावरून उच्चारले गेले.