esakal | स्मरण वैचारिक जागरणाचे 
sakal

बोलून बातमी शोधा

स्मरण वैचारिक जागरणाचे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ पाक्षिकाची यंदा शताब्दिपूर्ती आहे. दलितांच्या न्याय्य हक्कांना वाहिलेल्या या पहिल्या नियतकालिकाविषयी...

स्मरण वैचारिक जागरणाचे 

sakal_logo
By
डॉ. हरिश्‍चंद्र निर्मळे

एखादा नवा विचार, नवे तत्त्व किंवा नवीन कायदा समाजमनात एकाएकी रुजविणे शक्‍य नसते. त्यासाठी अगोदर समाजमनाची तयारी करावी लागते. विचारजागृतीची बीजे प्रथम त्याच्या मनात पेरावी लागतात. हे अवघड कार्य समर्थपणे पार पाडण्यासाठी नियतकालिकेच अधिक उपयुक्त असतात. नियतकालिकांची ही शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आली. असे समर्थ आणि प्रभावी माध्यम हाती असल्याशिवाय दलितांची दु:खे जगाच्या वेशीवर टांगता येणार नाहीत आणि अस्मितेची ज्योत त्यांच्या अंत:करणात तेवती ठेवता येणार नाही, याची जाणीव त्यांना होऊ लागली होती. १९१९ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज मुंबईत आले असता, डॉ. आंबेडकरांनी त्यांची भेट घेऊन, केवळ दलितांच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वतंत्र नियतकालिकाची आवश्‍यकता बोलून दाखविली. शाहू महाराजांना ही कल्पना आवडली. तत्काळ त्यांनी अडीच हजार रुपयांचा धनादेश बाबासाहेबांच्या स्वाधीन केला. त्यानंतर काही दिवसांतच, शनिवारी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ या केवळ दलितांच्या उद्धारासाठी वाहिलेल्या पाक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वतंत्र अन्‌ स्वायत्त
डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ पाक्षिकाचे ३१ जानेवारी ते २३ ऑक्‍टोबर १९२० या काळात एकूण १९ अंक प्रकाशित झाले. त्यापैकी अंक क्र. १ ते ३, ५, ६ व १० आणि १३ ते १९ एवढे अंक उपलब्ध आहेत. ‘मूकनायक’ हे पाक्षिक आठ पानांचे होते. यापैकी दहावा अंक दहा पानांचा विशेषांक होता. छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली ३०, ३१ मे व १ जून १९२० दरम्यान नागपूर येथे झालेल्या ‘अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदे’चा संपूर्ण अहवाल या अंकात प्रसिद्ध करण्यात आला होता. हे नियतकालिक दहाच महिने चालले असले, तरी ते दलितांचे एक स्वतंत्र, स्वायत्त आणि परखड विचारांचे पहिले नियतकालिक होते. त्याचे सर्व उपलब्ध अंक राज्य शिक्षण विभागाने वसंत मून यांच्या संपादकत्वाखाली नोव्हेंबर १९९० मध्ये पुनर्मुद्रित केले आहेत.

केवळ वैचारिक लेखनालाच प्राधान्य देण्यात आलेल्या; पण दुर्दैवाने अल्पजीवी ठरलेल्या आणि आज उपलब्ध असलेल्या ‘मूकनायक’मधून सुमारे बारा अग्रलेख, सात वैचारिक लेख, ‘विविध विचार’ आणि ‘क्षेमसमाचार’ या सदरात येणारे चोवीस स्फुटलेख, याशिवाय ‘आमची हालचाल’, ‘कळावे की’, ‘कुशल प्रश्न’, ‘शेला पागोटे’ अशा सदरांतून अठरा प्रासंगिक विचार, असे विपुल लेखन प्रसिद्ध झाले. कथा, कवितेसारख्या ललित लेखनाला मात्र बाबासाहेबांच्या ध्येय-धोरणानुसार प्रसिद्धी मिळू शकली नाही. डॉ. आंबेडकर ४ जुलै १९२० पर्यंत भारतात होते तोपर्यंतचे ‘मूकनायक’मधील सर्व लेखन ते स्वत:च करीत होते. यादरम्यान दहा अंक प्रसिद्ध झाले. यामधील ‘मनोगत’, ‘स्वराज्याची सर सुराज्याला नाही!’, ‘हे स्वराज्य नव्हे, आमच्यावर राज्य’, ‘स्वराज्यातील आमचे आरोहण’, ‘राष्ट्रातील पक्ष’ हे पाच अग्रलेख आणि ‘स्वराज्याचे माता-पिता’, ‘बुजतील म्हणून’, ‘मुसलमान ब्राह्मण झाले’, ‘टोणगे पान्हवतील काय?’, ‘यांचा ब्राह्मण वर्ण असावा खास’, ‘वैऱ्यांनी की हो नेला कैवारी’, ‘अपराध कोणता? द्वेष्ट्यांशी सहकार्य’, ‘मूळ शोधा मग वाद मिटेल’ हे ‘विविध विचार’मधील आठ स्फुटलेख आंबेडकरांनीच लिहिले आहेत, हे त्यांच्या खास भाषा, लेखनशैलीवरून आणि त्यांच्या अभ्यास, विद्याव्यासंग, बहुश्रुतता, प्रकांड पांडित्य, संत आणि पौराणिक संदर्भ देण्याच्या पद्धतीवरून सुस्पष्टपणे जाणवते. ‘मूकनायक’मधील हे सर्व अग्रलेख, स्फुटलेख आणि अन्य लेखकांनी लिहिलेले लेख म्हणजे तत्कालीन समाजातील अस्पृश्‍योद्धार चळवळीचे आणि त्यानिमित्तच्या घडामोडींचे स्वच्छ प्रतिबिंब आहे. राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या ‘मूकनायक’मधील लेखनाने टिळकांचा ‘केसरी’ आणि आगरकरांचा ‘सुधारक’ यांमधील लेखनाच्या बरोबरीची झेप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विचार जागृतीची बीजे तत्कालीन दलितांच्या मनात रुजवून त्यांना अन्याय-अत्याचारांविरुद्ध बंड पुकारण्यास ‘मूकनायक’ने शिकवले.
(लेखक प्राचार्य आहेत.)

loading image