
धार्मिक स्थळांवर वाजणारे भोंगे किंवा ध्वनिवर्धक आणि मिरवणुकीमध्ये दणाणणारे डीजे म्हणजे ‘काना’डोळा न करता येणाऱ्या गोष्टी. दोन्ही प्रकारांत होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबत आतापर्यंत किती तक्रारी आल्या असतील देवच जाणे! पण, या तक्रारींच्या ‘आवाजा’कडे, त्रस्त नागरिकांच्या वेदनेकडे लक्ष द्यावे, असे ना राजकारण्यांना वाटले ना पोलिस किंवा प्रशासनाला. सर्वसामान्य माणसाला अशावेळी हतबल वाटले तर नवल नाही. आपल्याकडे शांततेच्या वातावरणात राहण्याच्या अधिकाराकडे अत्यंत अनास्थेने पाहिले जाते.