

India EU trade deal
sakal
India European Union free trade agreement 2026 benefits : मुक्त व्यापार, उदार आर्थिक धोरणे यांचा गेली दोन-तीन दशके सुरू असलेला घणघणाट आता ऐकू येईनासा झाला आहे. त्या काळात या तत्त्वांची जपमाळ ओढणारी, इतरांना मुक्त व्यापाराचे माहात्म्य समजावून सांगणारी अमेरिकी महासत्ताच आता आपला पवित्रा पूर्णपणे बदलताना दिसते आहे. जागतिक व्यवहारातील एक अस्त्र म्हणून व्यापारअटींचा वापर केला जाऊ लागला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी विविध देशांच्या उत्पादनांवर वाढीव आयातशुल्क लादण्याचा सपाटाच लावल्याने याचा फटका अनेक देशांना बसतो आहे. भारत जसा त्यापैकी एक, तसेच युरोपीय देशसुद्धा. अशावेळी व्यापाराचीच नव्हे तर राजनैतिक व्यवहारांची समीकरणेही बदलणार हे ओघानेच आले. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराचा निर्णय यासंदर्भात महत्त्वाचा ठरतो. युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डर लेयेन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनिओ लुईस सांतोस डा कोस्टा २६ जानेवारीला भारतात येत असून त्यावेळी या कराराची शक्यता आहे. दोनशे कोटी लोकांच्या बाजारपेठेचे दार त्यामुळे उघडणार आहे. यासंबंधीची घोषणा दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत उर्सुला व्हॉन डर लेयेन यांनी केली. ट्रम्प यांच्या बेभरवशाच्या निर्णयांची सर्वाधिक झळ बसलेल्या देशांमध्ये युरोपीय महासंघ आणि भारताचा समावेश आहे.