

India EU trade pact
sakal
अग्रलेख
वीस ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेला युरोपीय महासंघ आणि चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करणारा भारत यांचा जगातील पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होतो. दोघांची लोकसंख्या २०० कोटी, म्हणजे जगाच्या एकचतुर्थांश. युरोप आणि भारताचा मिळून जगातील ‘जीडीपी’मध्ये वाटाही तेवढाच, पंचवीस टक्क्यांचा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्काचा शस्त्रासारखा वापर करुन युरोपीय महासंघ आणि भारताला सतत धमकावून त्रस्त केले होते. युक्रेन-रशिया युद्धाचा आर्थिक भार उचलत नाही म्हणून युरोपीय महासंघाला लक्ष्य करणाऱ्या ट्रम्प यांनी रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादले. त्यामुळे २७ देशांचा युरोपीय महासंघ आणि १४० कोटी लोकसंख्येच्या भारताची आंतरराष्ट्रीय व्यापारात कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर १९ वर्षांपासून रेंगाळलेला मुक्त व्यापार करार भारत व युरोपीय महासंघाने पूर्णत्वाला नेला आहे.