
India’s Foreign Policy Shift Engaging with Taliban for National Interest and Regional Stability
Sakal
अग्रलेख
परराष्ट्र धोरण ठरविताना देशहिताचा सांभाळ आणि संवर्धन हे सर्वोच्च ध्येय असते. त्यामुळेच परिस्थिती पाहून तात्कालिक आणि दूरगामी धोरणे ठरवावी लागतात. प्रसंगी विचारसरणीला मुरड घालावी लागते. परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात सांगितल्या जाणाऱ्या या सर्व बाबींचा प्रत्यय भारताने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारशी सुरू केलेल्या संवादाच्या संदर्भात येत आहे. त्या देशात २०२१मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत त्याच्याशी अंतर राखून होता. अमेरिका, भारत, तसेच युरोपातील अनेक देशांनी तेथील मानवी हक्कांची स्थिती, दहशतवाद आणि स्त्रियांना मिळणारी पक्षपाती वागणूक यांमुळे त्या सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही. असे असूनही परिस्थितीची गरज ओळखून भारताने आता त्यासंदर्भात व्यावहारिक भूमिका घेतली असून, दारे पूर्णपणे बंद न करता एक फट मोकळी ठेवली आहे.