
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील सोळा महिने सुरू असलेला सशस्त्र संघर्ष थांबण्याची शक्यता हा केवळ पश्चिम आशिया क्षेत्रालाच नाही, तर जगासाठीच दिलासा आहे. या युद्धात झालेल्या भयंकर विनाशाची काळपट छाया क्षितिजावरून लगेच दूर होणे केवळ अशक्य आहे; परंतु उशिरा का होईना दोन्ही बाजूंना थांबण्याचे शहाणपण सुचले ही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. हा उशीर होण्याचे एक कारण म्हणजे युद्ध हे देशांतर्गत राजकारणाचे हत्यार बनवले गेले. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या इस्राईलमधील राजवटीविषयी तेथील सर्वसामान्य लोकांत नाराजी होती.