‘नाम’मुद्रा : आकाशी झेप

एअर इंडिया पुन्हा एकदा टाटांकडे आल्यानंतर अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गेली अनेक वर्षे एअर इंडियाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचीच चर्चा जास्त होत होती.
natarajan chandrasekaran
natarajan chandrasekaransakal
Summary

एअर इंडिया पुन्हा एकदा टाटांकडे आल्यानंतर अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गेली अनेक वर्षे एअर इंडियाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचीच चर्चा जास्त होत होती.

एअर इंडिया पुन्हा एकदा टाटांकडे आल्यानंतर अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गेली अनेक वर्षे एअर इंडियाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचीच चर्चा जास्त होत होती. आता टाटा तिला पुन्हा उभारी देतील, ही अपेक्षा ‘महाराजा’प्रेमींना नक्कीच वाटते. पण आर्थिक खड्ड्यातला हा वारू बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान टाटांपुढेही आहेच. त्यासाठी त्याला त्याच तोडीचे सक्षम नेतृत्व हवे. म्हणून मग तुर्की एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आईची यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय झाला होता; मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अखेर टाटांनी नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडेच एअर इंडियाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

चंद्रशेखरन हे नाव टाटा समूहाला नवे नाही. तिथे ते चंद्रा नावाने परिचित आहेत. सध्या टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालकपद ते भूषवत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट या संस्थांवर ते आहेत. गेल्याच महिन्यात त्यांच्यावर टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे, असे हे चंद्रशेखरन टाटांच्या अत्यंत जवळचे आहेत. ते मूळचे तमिळनाडूचे. मोहनूरमधील एका सरकारी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी पदवी घेतली आणि तिरुचिरापल्लीतल्या इंजिनीयरिंग कॉलेजमधून संगणक विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९८७ मध्ये त्यांनी टाटा समूहात प्रवेश केला. उपजत कौशल्यबुद्धीच्या जोरावर त्यांनी या समूहात अनेक उच्च पदे भूषविली. २००९ मध्ये ते टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली टीसीएसने अनेक उंच भराऱ्या घेतल्या. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक महसूल आणि सुमारे पाच लाख ५६ हजार कन्सल्टंटसह टीसीएस ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी नोकऱ्या देणारी कंपनी ठरली होती. त्यामुळेच तेव्हा टीसीएसची जगातील सर्वांत प्रभावशाली उद्योगांमध्ये गणना झाली होती.

चंद्रशेखरन यांच्या कामाचा आलेख कायम चढताच राहिला आहे. टाटांनीही त्यांच्यावर अनेक जबाबदारीची पदे सोपवली आणि त्यांनीही त्यांचा विश्वास वृद्धिंगत केला आहे. ''एअर इंडिया’सारख्या मोठ्या कंपनीला प्रगतिपथावर नेण्यासाठी म्हणूनच टाटांनी ५९वर्षीय चंद्रशेखरन यांचे नाव निवडले आहे. त्यांनीही तातडीने काम सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा निर्णय झाल्यानंतर चंद्रा यांनी लगेच सर्व संचालकांकडून ‘एअर इंडिया’बाबतची सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात केली. ‘एअर इंडिया’बाबत त्यांनी काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. कंपनीत आमूलाग्र बदल करण्यासाठी त्यांनी एक रोडमॅप तयार केला आहे. उत्तम ग्राहक सेवा, जगातील सर्वांत उच्च दर्जाच्या हवाई तंत्रज्ञानाचा वापर, विमानसेवेच्या जाळ्यात वाढ, शिवाय उच्च आदरातिथ्य अशी उद्दिष्टे त्यांनी ठरवली आहेत. यामुळेच विमानवाहतूक सेवेत एअर इंडिया सर्वोच्च उंची गाठेल असा चंद्रा यांचा विश्वास आहे आणि तो त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनाही दिला आहे. चंद्रशेखरन मुंबईत राहतात. त्यांची पत्नी ललिता या हौशी छायाचित्रकार आणि धावपटूही आहेत. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विविध संस्थांनी अनेक पुरस्कारांनी गौरव केला आहे. केंद्र सरकारने त्यांना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com