
आग, वादळ, पूर अशा आपत्ती कुठे ना कुठे घडत असतात. काही मानवनिर्मित, तर काही नैसर्गिक असतात. खरोखरच परिस्थिती माणसाच्या हातात नसेल तर होणाऱ्या जीवितहानीविषयी आपण काहीच तक्रार करू शकत नाही. थोडीशी खबरदारी घेतली तर दुर्घटना टाळण्याजोगी स्थिती असेल तर मात्र अशा घटनांबाबत चिकित्सा व्हायलाच हवी. कोण दोषी होते, याचा माग घ्यायला हवा. कोणत्याही जबाबदार शासनपद्धतीत असे केले जाते. त्यामुळेच पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या सर्वार्थाने पुढारलेल्या शहरांलगतच्या कुंडमळा येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल घेतली जाणे क्रमप्राप्त आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या देशातील आणि ६५ वर्षांची वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अनेक गावे आजही सुविधांपासून वंचित आहेत. विशेषतः नद्या आणि डोंगरांच्या कुशीतील गावांचा यात समावेश आहे. पुणे, पिंपरी शहरांच्या जवळच्या कुंडमळासारखे छोटे गाव अद्यापही पक्क्या रस्त्याने जोडलेले नाही.