esakal | अग्रलेख : परीक्षांची परीक्षा !
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख  : परीक्षांची परीक्षा !

आजमितीला१६१देशातील सुमारे दिडशे कोटी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवन कोरोनानेग्रस्त झाले आहे.त्यांच्या शाळा,महाविद्यालये बंद आहेत.त्याचे परिणाम विकसनशील देशात जाणवू लागले आहेत

अग्रलेख : परीक्षांची परीक्षा !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

`कोरोना`साथीच्या संकटामुळे जनजीवन ठप्प झाल्याने होणार्या दुष्परिणामांचा वेध मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. विशेषतः आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रावर होणार्या परिणामांची चिकित्सा होत आहे आणि ते स्वाभाविकही आहे. पण शैक्षणिक क्षेत्रावर होणार्या परिणामांचीही सर्वांगीण आणि व्यापक चर्चा व्हायला हवी. उमलती पिढी मैदानाऐवजी चार भिंतीत अडकल्याने अस्वस्थ असेल तर आश्चर्य नाही. मार्च-एप्रिल तसा परीक्षांचा काळ. पाठोपाठ येतात त्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आणि त्यांच्या प्रवेशाच्या परीक्षा. नेमक्या त्याच काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ कोविडच्या साथीने आणली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांपासून ते नोकरीसाठीच्या परीक्षांना करकचून ब्रेक लागलाय. कोरोनाचा विळखा ढिला कधी होईल, काहीच सांगता येत नाही. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा निर्धार व्यक्त करीत नीट, जेईई, सीए तसेच अन्य काही स्पर्धात्मक आणि महाविद्यालयीन परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उरलेल्या तारखा लवकरच जाहीर होतील. सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणात परीक्षांच्या तारखा जाहीर करून त्या घेणे ही मोठीच कसोटी असणार आहे. परीक्षा घेताना पाळावे लागणारे सुरक्षित अंतर, परीक्षार्थींना करावा लागणारा प्रवास, हजारोंच्या संख्येने एकत्र येणे, झालेल्या परीक्षांचा निकाल लावणे आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवणे आणि अखेरीला ज्याच्यासाठी एवढे सोपस्कार पार पाडले, त्या विद्यार्थ्याला आपल्या भवितव्याची दिशा निश्चित करून नेमका कोठे प्रवेश घ्यायचा हे ठरवणे, हे आव्हानात्मक आहे. त्यातच विद्यापीठ परीक्षांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने तोडगा काढला, की केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा होतील. तथापि, त्या कशा घ्यायच्या, ऑनलाईन की ऑफलाईन, त्यासाठी यंत्रणा कशी राबवायची हे सर्व काटेकोरपणे ठरवावे लागेल. ` कोरोना`ची धास्ती नजरेआड करून चालणार नाही. त्यामुळे एकुणातच, शैक्षणिक वर्षाचे कोलमडलेले वेळपत्रक सावरण्याची कसरत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेषतः दहावी, बारावी तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षांच्या समाप्तीनंतर त्यापुढील अभ्यासक्रमांचे प्रवेश घेतानाचे सोपस्कार अंमलात आणताना सुसूत्रता आणि समन्वय महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी सर्वच संबंधित यंत्रणा, राज्य आणि केंद्र सरकार आणि प्रवेश यंत्रणांना त्यांच्यातील समन्वयाचे बिनचूक नियोजन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनीदेखील गोंधळून न जाता, त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. काही परीक्षांची राज्यात मर्यादित केंद्रे आहेत, काही परीक्षांची जिल्हा स्तरावर केंद्रे आहेत. अशा केंद्रांचे विकेंद्रीकरण करावे. जेणेकरून प्रवास टाळणे, सुरक्षित अंतर ठेवत परीक्षा घेणे, त्या केंद्रांचे निर्जंतुकीकरण करणे या बाबी करताना यंत्रणांवरचा ताण टाळता येईल. त्यासाठी परीक्षा पद्धतीची गरजेनुसार फेरमांडणी करावी. संघ लोकसेवा आयोगापासून ते विविध राज्यांच्या लोकसेवा आयोगांच्या परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशनपासून ते बँकिंग आणि लष्करभरतीपर्यंतच्या अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. अन्य राज्य परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. नोकरीविषयक परीक्षांसाठी वयाचे निकष कळीचा मुद्दा आहे. त्यावरही सरकारने तोडगा काढावा. जेणेकरून इच्छुकांची संधी हिरावून घेतली जाणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, आजमितीला १६१ देशातील सुमारे दिडशे कोटी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवन कोरोनाने ग्रस्त झाले आहे. त्यांच्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्याचे परिणाम विकसनशील देशात जाणवू लागले आहेत. शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील, ते सांगता येत नाही. सध्या काही ऑनलाईन वर्ग भरत असले तरी ते इंटरनेटभरोसे आहेत. ग्रामीण भागात सेवा असली तरी तिच्या सातत्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सक्षम करणे, त्यांचे तांत्रिक ज्ञान वाढवणे, त्यासाठी संबंधित शिक्षणसंस्था आणि सरकारने आगामी काळातील कोरोना साथीचे भय लक्षात घेवून नियोजन केले पाहिजे. ग्रामीण भागात पोषण आहारावर तेथील मुलांचे पोषण अवलंबून आहे, त्याच्या पुरवठ्यात सातत्य राखण्याकडे कटाक्ष हवा. तसेच मुलांची गळती होवू नये, हेही पाहतानाच, शिक्षण प्रक्रियेतून त्यांचे होणारे समाजशिक्षण, भावनिक पोषण आणि जपणूक याचाही विचार केला पाहिजे. सरकारने शुल्कवाढ करू नका, असे सांगूनही शाळांच्या शुल्काचे शुक्लकाष्ठ पालकांच्या मागे लागल्याचे प्रकार कानावर येत आहेत. विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा पडद्याआडून त्याचे तुणतुणे वाजवत आहेत. अर्थकारणाचा रूतलेला गाडा, रोजगाराचे प्रश्न, खर्चाचे येणारे इतर ताण लक्षात घेता, सबुरीने घेणे, व्यवहार्य आणि व्यापक विचारांती निर्णय घेणे यावर कटाक्ष पाहिजे. एकूणच ज्ञानगंगा अखंड राहण्यावर भर दिला जावा. हे सर्व ज्या विद्यार्थ्यांसाठी केले जाते आहे त्यांचे भवितव्य घडवत, त्याला बळ आणि उभारी देत कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी सिद्ध करण्याचा दूरदर्शी विचार आवश्यक आहे. परिवर्तनाच्या टप्प्यावरील या पिढीच्या भावविश्वाला `कोरोना`च्या झळा लागू देता कामा नयेत. 

loading image