
भारतात गुन्हे करून परदेशात पळून जाण्याची क्लृप्ती लढविणारे गुन्हेगार ही देशासाठी मोठी डोकेदुखी असतेच, परंतु त्यामुळे एकूण व्यवस्थेचीही हानी होते. याचे कारण जोवर गुन्हेगार ताब्यात येत नाही, तोपर्यंत त्यातील पीडित व्यक्ती, संस्था यांना न्याय मिळणे अशक्य होते. आर्थिक गैरव्यवहार असेल तर संबंधितांचे नुकसान हा एक ठळक मुद्दा असतो आणि त्याबाबतीत तोंडाने कितीही वल्गना केल्या तरी राज्यकर्तेही हतबल असतात. ‘याला फरपटत आणू’, ‘त्याला बेड्या ठोकू’, अशा घोषणा केल्या, तरी त्या पोकळ वाटतात, याचे कारण परदेशातून गुन्हेगारांना देशात आणणे ही सोपी गोष्ट नसते. दोन देशांत जर ‘गुन्हेगार हस्तांतर करार’ झाला असेल तरच हे शक्य होते. हा विषय पुन्हा ऐरणीवर येण्याचे कारण बेल्जियममध्ये मेहूल चोक्सीला झालेली अटक. त्याच्याच काही दिवस आधी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेने भारताच्या ताब्यात दिले आहे.