
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कारकीर्दीत जगात ताणतणाव होते; परंतु कोणत्याही मोठ्या संघर्षाचा भडका उडालेला नव्हता. त्यामुळेच या तथ्याकडे बोट दाखवत गेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याविरोधात निवडणूक लढविताना आपण शांततेचे पाईक आहोत, असा आव आणत ट्रम्प यांनी प्रचार केला होता. सत्तेवर येताच रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याच्या वल्गनाही केल्या होत्या. प्रत्यक्षात चित्र काय आहे? रशियाच नव्हे तर युक्रेनची खुमखुमीही कमी होत नाही. ज्या इस्राईलची पाठराखण सातत्याने अमेरिका करीत आली आहे, त्या देशाने थेट इराणच्या लष्करी तळांवर हल्ले करून पश्चिम आशियातील युद्धाची व्याप्ती वाढवली आहे.