
‘पहलगाम’मधील हल्ल्याचा बदला घेण्याचे आव्हान मोदी सरकारने पेलले. परंतु ते पेलताना अकस्मात जाहीर झालेली शस्त्रसंधी, त्याचे श्रेय घेण्यासाठी सरसावणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे धूर्त मनसुबे, लष्करी कारवाई तार्किक शेवटाला नेण्याचा विरोधी पक्षांचा व जनतेचा आग्रह, संघर्ष चिघळल्यास अर्थकारणावर होणारे संभाव्य दुष्परिणाम अशा अनेक दबावांचा सामना त्यासाठी सरकारला करावा लागला. हवाईदलाच्या हल्ल्यांनी घायकुतीला आलेल्या पाकिस्तानला एवढ्या स्वस्तात का सोडले, यावरुन आक्षेप घेतले जाऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून चित्र बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झाले आहे. मोदींनी भूमिका खणखणीतपणे मांडली आणि कोणतीही संदिग्धता राहणार नाही, याची काळजी घेतली. हे आवश्यकच होते. दहशतवाद्यांना छुपी साथ देत भारताला सतत जायबंदी करू पाहणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी आपल्या भाषणात त्याची जागा दाखवून दिली.