
हुरहूर लावणारा, मने भिजवणारा, वर्षानुवर्षांचा घट्ट ऋणानुबंध असणारा मोसमी पाऊस अलीकडच्या काळात छातीत धडकी भरविणारे रूप घेऊन का येत आहे? पावसाच्या रूपाने निसर्ग वारंवार आपली परीक्षा घेत आहे आणि आपण त्यात वारंवार अनुत्तीर्ण होत आहोत! मोसमी, बिगरमोसमी, वेळेवरचा, अवकाळी, वळीवाचा अशी वेगवेगळी नावे घेत तो येतो. पण कशाही स्वरूपात आला तरी त्रेधातिरपिट, पडझड, वित्तहानी, जीवितहानी अशा अनेक अनर्थांना सामोरे जाणे टळत नाही. वाहतुकीचा बट्ट्याबोळ हा तर जणू पाचवीलाच पूजलेला. हे केवळ निसर्गाचे लहरीपण असे म्हणून जबाबदारी टाळता येणार नाही. आपल्याकडच्या यंत्रणांचेही अपयश वारंवार समोर येते, हे मान्य करायला हवे. दरवर्षी पाऊस येण्याआधी नालेसफाईपासून पाणी साठवण्याच्या योजनांपर्यंत विविध घोषणांचा ‘पाऊस’ पाडला जातो. परंतु खराखुरा पाऊस कोसळायला लागला की ते सगळे वाहून जाते. यंदा सोळा वर्षांत पहिल्यांदाच तो मे महिन्यात राज्यात दाखल झाला आहे.