
‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला सातत्याने सज्जड इशारे देत आहेत. तसे ते द्यायला हरकत नाही, याचे कारण सैन्याचे आणि जनतेचेही मनोबल उंचावलेले ठेवण्यास अशा वातावरणनिर्मितीची गरज असते. परंतु कळीचा मुद्दा हा आहे की, या गर्जनांना साजेशी अद्ययावत संरक्षणसिद्धताही आवश्यक असते. सरकार या आघाडीवर काहीच करीत नाही, असे म्हणणे रास्त ठरणार नाही; परंतु याबाबतीत सावध करणारी दोन महत्त्वाची निवेदने गांभीर्याने घ्यायला हवीत. त्यापैकी एक म्हणजे भारताचे हवाईदल प्रमुख अमरप्रीतसिंग यांचे संरक्षणसाहित्य खरेदीला होत असलेल्या विलंबाबाबतचे विधान आणि दुसरे म्हणजे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये दिलेल्या मुलाखतीत भारतीय हवाईदलाच्या हानीबाबत केलेले भाष्य. ‘‘आपली किती विमाने पडली, यापेक्षा ती का पडली हे महत्त्वाचे आहे,’’ असे सांगत सरसेनाध्यक्षांनी मोहिमेदरम्यानच्या चुका दुरुस्त करून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचे नमूद केले.