
अग्रलेख
भारताला ‘शत्रू क्रमांक एक’ ठरवून आजवर शाबूत राहिलेल्या पाकिस्तानपुढे आता मात्र अस्तित्वाचे संकट गडद होत चालले आहे. दसपट सामर्थ्यवान असलेल्या भारताविरुद्ध युद्ध करून होणारी नाचक्की टाळण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाद्यांना पुढे करण्याचे धोरण स्वीकारले. ‘हजार जखमा करून भारताला रक्तबंबाळ करण्याचे’ हे धोरण होते. पण एखाद्या कल्पनेचा जन्म ज्याप्रमाणे रोखता येत नाही; तसेच तिचा अंतही निश्चित असतो. भारताला बेजार करण्यासाठी वापरलेल्या दहशतवादी अस्त्राचा अतिरेकी वापर करणाऱ्या पाकिस्तानवर या धोरणामुळे स्वतःच रक्तबंबाळ होण्याची वेळ आली आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले नाहीत, तर पाकिस्तानचे तुकडे पडतील, अशी वातावरणनिर्मितीही केली आहे. पहलगामचे हत्याकांड घडवून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.