
रोलां गॅरोसच्या मध्यवर्ती ‘फिलिप शॅत्रीए’ कोर्टवरची लाल माती ज्यासाठी गेली वीस वर्षे आतुर असे, तिने अखेर आपल्याच छातीवर ते पाऊल कायमचे गोंदवून घेतले. वीस वर्षें राफाएल नदाल या ‘क्ले कोर्ट’वर उतरत होता, झुंजत होता आणि जिंकतही होता. वीस पैकी चौदावेळा तो या कोर्टावर अजिंक्य ठरला, आणि गेल्या वर्षाअखेरीस निवृत्तही झाला. ‘क्ले कोर्ट’चा शहनशहा म्हणून टेनिसविश्वात अजरामर झालेल्या राफाएल नदालला नुकताच याच कोर्टवर मानाचा मुजरा करण्यात आला. हा सन्मानसोहळा ज्याच्या वाट्याला आला, त्या नदालवर तर जणू देवादिकांनी पुष्पवृष्टी करावी, असाच तो सारा माहौल होता. पण या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या १५ हजार टेनिसरसिकांच्या डोळ्यांच्या धारा आवरत्या आवरत नव्हत्या. एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांनाही लाभले होते.