हौस ऑफ बांबू : समवसरण : एक अनावरण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of bamboo

नअस्कार! समवसरण हा किती सुंदर शब्द आहे, नै! हा शब्द उच्चारताना एकदाही ओठाला ओठ (स्वत:चेच) न लागल्यानं लिपस्टिकदेखील बिघडत नाही.

हौस ऑफ बांबू : समवसरण : एक अनावरण!

नअस्कार! समवसरण हा किती सुंदर शब्द आहे, नै! हा शब्द उच्चारताना एकदाही ओठाला ओठ (स्वत:चेच) न लागल्यानं लिपस्टिकदेखील बिघडत नाही. समवसरण म्हंजे काय? असा प्रश्न तुम्ही विचाराल. तर (आमच्या) पुण्यात त्याचा अर्थ ‘एक प्रकारचे अँफीथिएटर’ असा होतो. असे सुंदर अँफीथिएटर जे की लॉ कॉलेज रोडवर ‘बॅरिस्टा’च्या जरा पलिकडे आणि ‘जर्मन बेकरी’च्या जरा अलिकडे असते. शब्दकोशात अँफीथिएटरचा अर्थ ‘उघड्यावरील किंवा खुला, गोलाकार रंगमंच-आसनव्यवस्था’ असा दिला आहे.

हे ‘एक प्रकारचे अँफीथिएटर’ लॉ कॉलेज रोडवरल्या डॉ. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या आवारात बांधण्यात आलं आहे. संस्थेच्या फडताळात जितकी प्राचीन आणि ऐतिहासिक दप्तरं नि रुमाल आहेत, त्याच्याहीपेक्षा प्राचीन वृक्ष नि वनराजी संस्थेच्या आवारात आहे. तिथं गेल्यावर कुठल्याही क्षणी काही मृगशावके उड्या मारत इथून तिथं जातील, आश्रमातील शिष्यगण मोळ्या घेऊन गुरुगृही परतताना दिसतील, असं वाटत राहातं. काही ऋषिकन्या...जाऊ दे.

याच संस्थेच्या आवारात जुरासिक कालखंडातला एक वटवृक्ष ध्यानस्थ साधुबुवासारखा केव्हाचा उभा आहे. त्याच्या प्रशस्त पाराभोवती आता हे नवं अँफीथिएटर सज्ज झालंय. भारतदेशाचे जगप्रसिद्ध वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्याचं नुकतंच उद्घाटन झालं. -म्हंजे थिएटरातला पहिलाच प्रयोग गडकरींच्या नाटकाचा! आणखी काय हवं? विमानं उतरतील, असे रस्ते बांधणारे हे सद्गृहस्थ! अँफीथिएटरात उत्तमोत्तम कार्यक्रम होणार, याची नांदीच म्हणायची ही!

अर्थात आमच्या पुण्यात अँम्फीथिएटरं कमी नाहीत. फर्गसन महाविद्यालयाचं ‘साहित्य सहकारा’शी घट्ट नातं जुळलेलं अँफीथिएटर असो, वा गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारातला ज्ञानवृक्षाच्या छायेतला खुला रंगमंच असो, म्हंजे भांडारकरचं जमेस धरुन दोन किलोमीटरच्या परीघात चार-पाच अँम्फीथिएटरं झाली! सिंबायोसिसपासून अमानोरापर्यंत अन्य खाजगी, निमखाजगी, निमसरकारी आणि सरकारी मिळून कैक डझन अँम्फीथिएटरं एकट्या पुण्यात आहेत. आता बोला!

अँफीथिएटरचं उद्घाटन मात्र शानदार झालं. वडाच्या झाडाखाली बसून गडकरीसाहेब फिरोदियासाहेबांना मुंबई-गोवा महामार्गावर आम्ही अशीच शेकडो झाडं लावतोय, असं सांगत होते. (आणि फिरोदियासाहेबही आश्चर्यचकित झाल्याचे दाखवत होते.) ‘विश्लेषण, प्रशिक्षण आणि प्रबोधन या त्रिसूत्रीनुसार चाला’ असा मंत्र वाहतूकमंत्री गडकरीजींनी आपल्या भाषणात दिला. हे थोडंफार ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ याच तत्त्वासारखं आहे. हो की नाही? सांस्कृतिक दळणवळणातही ‘बीओटी’ आलं म्हणायचं!! (टोलनाके न येवोत म्हंजे मिळवली!) गडकरीजींनी दिलेला मंत्र ऐकून फिरोदियासाहेबांनी प्रदीपजी रावत यांना, रावतजींनी भूपाल पटवर्धन यांना नेत्रपल्लवी करुन ‘आलं ना लक्षात?’ असं विचारल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नाही. हे तिघे-चौघे एकमेकांना खाणाखुणा करुन अंगठेबिंगठे दाखवत होते, तेव्हाच गडकरीसाहेब बोलून गेले : ‘‘याचा उपयोग उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून करु नका!’’ सगळं मुसळ केरात!! परिणामी, सगळे इकडे तिकडे बघू लागले!! असो.

बाकी आमचं पुणं हेच मुळी एक विशाल असं अँफीथिएटर आहे. या अँफीथिएटरात अहोरात्र वेगवेगळी नाटकं चालूच असतात. पुणेकरांना एवढे खुले रंगमंच लागतात तरी कशाला? असं कुणी विचारेल. त्यानं पुण्यात येऊन काही दिवस राहावं. आहेत ती अँफीथिएटरं कमी आहेत, असं त्याला वाटायला लागेल.

अरे हो! समवसरणचा अर्थ सांगायला विसरलेच! सर्वांना समान संधी किंवा अवसर देण्याची क्रिया म्हंजे समवसरण!! कानामात्रावेलांटी नसलेलं हे समवसरण नुसतं उच्चारतानाही घसरायला होतंय. ‘समवसरणावर गेले होते’ असं पुढेमागे सांगायची पाळी आली तर?

Web Title: Saroj Chandanwale Writes Hous Of Bamboo 16th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top