अग्रलेख : मृद््गंध हरपला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृद््गंध हरपला...

आपल्या मांडणीसाठी अखंड परिश्रम आणि रसाळ कीर्तनकाराचा पिंड असा अपूर्व संगम बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्वात होता. बाबासाहेबांची वाणी आणि शब्दवैभव अस्सल मराठी मातीच्या गंधाचे होते.

अग्रलेख : मृद््गंध हरपला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हंड्या-झुंबरांनी लखलखलेल्या प्रशस्त दालनाच्या छताचे लोलकीय झुंबर अचानक विझून जावे, आणि उदासवाणा अंधार सर्वत्र पसरावा, तशी उणेपणाची कळा शिवचरित्रात अवघं जीवन रंगून गेलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं आली. तसे घडणे स्वाभाविकच होते. बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांचे मराठीच्या दालनातील एक विशिष्ट स्थान होते. बाबासाहेबांची हयात छत्रपती शिवरायांच्या कीर्तीच्या निरुपणात रंगून गेली होती. ध्यास घेतल्यासारखे ते शिवचरित्र सागंत राहिले. तोच त्याचा श्वासही बनला. त्यांनी सांगितलेली शिवरायांच्या पराक्रमाची गाथा कमालीची लोकप्रिय होती. त्यांनी शंभर उन्हाळे- पावसाळे पाहिले. इतकं प्रदीर्घ आयुष्य लाभलं. साहजिकच महाराष्ट्रातील किमान तीन-चार पिढ्यांनी त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज ‘पाहिले’, ‘ऐकले’!

आपल्या जीवनाचे प्रयोजन सापडणे हे तसे दुर्मीळच असते. किंबहुना, ते शोधण्यातच अनेकदा जीवित खर्ची पडते. सुदैवाने बाबासाहेबांना आठव्या-नवव्या वर्षीच आपले प्रयोजन गवसले- ते शिवचरित्राचे. इतिहासाचा अभ्यासक असे संबोधण्यापेक्षा शिवशाहीर म्हटलेले त्यांना अधिक भावत असे. त्याच रसाळ शैलीत त्यांनी शिवरायाची कहाणी अनेक दशकं महाराष्ट्राला सांगितली. ‘ही शिवगाथा माझ्या महाराष्ट्रातील माताभगिनी आणि लेकीसुनांपर्यंत पोचायला हवी’ हे त्यांच्या जीविताचे अंतिम ध्येय होते. ते ध्यासपर्व अखेर सोमवारी पहाटेच्या सुमारास संपले. विख्यात इतिहासतज्ज्ञ ग. ह. खरे, त्र्यं.शं. शेजवलकर आदी महानुभावांचे बोट धरुन बाबासाहेब इतिहासाच्या गहन अरण्यात शिरले, तेथून ते मनाने परत कधी आलेच नाहीत. खऱ्यांचे सहायक म्हणून त्यांनी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त खूप वर्षे काम केले. दऱ्याखोऱ्यातून, काट्याकुट्यांतून, गडकिल्ले पालथे घालत त्यांनी दस्तऐवज शोधण्याचा उदंड खटाटोप केला. गडकिल्ल्याचं, शस्त्रास्त्रांचं महत्त्व बाबासाहेब जाणत होते.

या शस्त्रांनी साकारलेला गडावंर प्रत्यक्षात आलेला इतिहास समान्यांच्या मनाला साद घालेल अशा रीतीनं मांडणं हे त्याचं मोठचं काम होतं. यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. मराठी भाषेतील लडिवाळ शब्दकळा तर त्यांच्या पुढ्यात हात जोडून उभी होतीच. या गुणांच्या समुच्चयानिशी त्यांनी रचलेले शिवचरित्र- ‘राजा शिवछत्रपती’- वेगळाच इतिहास घडवून गेले. शिवपूर्वकालिन जगण्याचे, शिवकालिन घटनांची अत्यंत रसाळ भाषेत त्यांनी केलेली वर्णने आजही जुन्या पिढीतील कित्येकांना आठवत असतील. खरे-शेजवलकरांसारख्यांच्या सहवासामुळे अभ्यासाची बैठक जमवण्याचे तंत्र जमून गेले; पण निरुपणकाराला आवश्यक असणारी प्रतिभा त्यांच्या ठायी होतीच. त्यांचा पिंड रसाळ कीर्तनकाराचा. ही त्यांची सुगम शैली महाराष्ट्राला भावली. बाबासाहेबांची वाणी आणि शब्दवैभव अस्सल मराठी मातीच्या गंधाचे. एकीकडे संत-पंत-तंतांच्या वाङमयावर पोसलेला लेखकीय पिंड, आणि त्याला मिळालेली इतिहासाची जोड यामुळे पुढले गारुड घडले.त्यांची शिवचरित्र व्याख्यानमाला ऐकण्यासाठी लोक तिकिट काढून येत असत. व्याख्याने असोत, की ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग, त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आला. हे सारे घडले, ते साठोत्तरी काळात.

मराठी साहित्याच्या क्षेत्रात तेव्हा उलथापालथ होऊ लागली होती आणि रेडिओ नावाचे प्रकरणही मध्यमवर्गीय घरांमध्ये प्रतिष्ठापित झाले होते. ‘आश्विन वद्य चतुर्दशीचा दिवस. टळटळीत दुपार होती…’ अशा वळणाने शिवकहाणी पुढे जाऊ लागली, की श्रोते नकळत पुरंदऱ्यांचे बोट धरुन त्यांनी दाखवलेल्या इतिहासाच्या इलाख्यात हिंडून येत. बाबासाहेबांच्या वाणीतले नाट्य सारी कहाणी डोळ्यांसमोर उभी करत असे. पु ल.देशपांडे यांनी ‘हरितात्या’ नावाची एक व्यक्तिरेखा लिहिली. हरितात्या म्हणजे सदैव इतिहासात बुडालेली वल्ली. वर्तमानात जगणेच त्यांना नामंजूर! बाबासाहेब पुरंदरे हे त्या पिढीसाठी हरितात्याच होते. अर्थात, वर्तमानाचे भान त्यांना होते. उत्स्फूर्त शाब्दिक कोट्यांमधून, मार्मिक टिप्पणीमधून त्याची चुणूक दिसत असे. परंतु, मन रमले होते शिवकाळात. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा मंत्र अखंड वीणेसारखा त्यांच्या मनात झंकारत राहिला. वाणी आणि लेखणीच्या जोडीने बाबासाहेबांनी ‘शिवसृष्टी’ साकारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी ‘पुढीलां’वर आहे.

हल्ली पर्यटनस्थळातील हॉटेलच्या जाहिरातीत किंवा बिल्डरांच्या गृहसंकुलाच्या जाहिरातीत निसर्गरम्य ‘हिल व्ह्यू’ किंवा ‘सी-फेसिंग’ खोल्यांची भलामण आढळते. बाबासाहेब ही महाराष्ट्रासाठी इतिहासाच्या इलाख्याकडे उघडणारी एक खिडकी होते. सर्वसामान्यांनी शिवरायांचा इतिहास पाहिला तो या खिडकीतून. पुरंदऱ्यांच्या संशोधनाबद्दल अनेक आक्षेप पूर्वीही होते, आजही आहेत. इतिहास हे काही भूतकाळाचे साचलेले डबके नव्हे, तो प्रवाही असतो. जसजसे पुरावे पुढे येतात, तसतशी इतिहासाची मांडणी बदलते. त्याचे पुनर्लेखन होते, ही एक सेंद्रिय आणि आवश्यक प्रक्रिया आहे. पुण्यातील पुरंदरेवाड्यात अनेक तरुणांचा राबता अखेरपर्यंत असे. काही तरुण त्यांच्याशी हिरीरीने वादही घालत.

परंतु, बाबासाहेबांनी हार आणि प्रहार स्थितप्रज्ञतेने सोसले. ‘चंडमुंडभंडासुरखंडिनी जगदंबे, उदंडदंडमहिषासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्रधर्मरक्षिके तुळजाभवानी ये! सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं आख्यान मांडलंय, आई, तू ऐकायला ये!’...शिवचरित्राच्या आरंभी बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या इष्टदेवतांना घातलेली ही साद मराठी मन चेतवून जाणारी होती.‘ किंवा अल्याड सोनुरी पल्याड जेजुरी, मधून वाहते कऱ्हा, शिवशाहीचा पुरंदर जणू मोतियाचा तुरा’ या कवनातले वर्णन कुणाही मराठी माणसाची छाती फुगवून जाईल. शब्दकळेची अशी किती उदाहरणे द्यावीत? या शिवशाहिराचे वर्णन करण्यासाठी आणखी कुण्या शाहिराचीच गरज पडावी. शिवचरित्राची अखेर करताना बाबासाहेबांनी ‘अधिक काय लिहू? शब्दच संपले’ अशा शब्दात लेखनसीमा रेखली आहे. तशीच रितेपणाची भावना महाराष्ट्रात आज घर करुन राहिली आहे.

loading image
go to top