
पडद्यावरील करिष्मा, भाषिक अस्मिता, प्रादेशिकता, भावनिकता हे मुद्दे नेहेमीच तमीळनाडूच्या राजकारणात प्रभावी ठरत आले आहेत. यापैकी एक किंवा अनेक घटकांचा उपयोग करीत राजकीय नेते सत्तेवर मांड ठोकतात. जर काही आव्हान निर्माण झाले तर यापैकीच एखादा मुद्दा कसा तापवायचा, हे या राजकीय नेत्यांना चांगलेच ठाऊक असते. तमीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सध्याच्या पवित्र्यांकडे पाहताना याचाच प्रत्यय येतो. अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांवर रुपयाचे चिन्ह न वापरता तिथे तमीळ लिपीतील अक्षरे प्रसिद्ध करणे हे त्यांचे ताजे वादग्रस्त पाऊल. रुपयाचे चिन्ह हे केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरले आणि ओळखले जाते. तेच आपल्या एखाद्या अधिकृत कागदपत्रांतून काढून टाकणे ही गोष्ट निश्चितच गंभीर आहे. तिला फुटिरतेच्या मानसिकतेचे परिमाण आहे. हिंदीच्या सक्तीला विरोध करणे समजू शकते, परंतु त्यासाठी या टोकाला जाण्यामागे स्टॅलिन यांचे हेतू काय आहेत, हे तपासायला हवे.