

Prince Andrew Arrest
sakal
एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा जगभर दरारा होता. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तो हळूहळू मावळत गेला, तरीही तेथील राजघराण्याच्या प्रतिष्ठेचे वलय कायम राहिले, याची काही ऐतिहासिक कारणे आहेत. या घराण्यातील एक राजपुत्र अँड्रू माउंटबॅटन- विंडसर यांच्या अटकेची बातमी जगभर पसरत आहे, तेव्हा ब्रिटिश राजेशाहीच्या उरल्यासुरल्या अवशेषांनाही काळोखाने ग्रासले आहे काय, असा प्रश्न पडतो. अँड्रू माउंटबॅटन- विंडसर यांना झालेली अटक ही कुप्रसिद्ध ‘एपस्टीन प्रकरणा’शी संबंधित आरोपांतून उद्भवली आहे. राजघराण्यातील एका वरिष्ठ व्यक्तीला अशा प्रकारे अटक होण्याची ही गेल्या चारशे वर्षांतील पहिलीच वेळ आहे. ही घटना साधीसुधी नाही. बदलांच्या, आधुनिकतेच्या प्रपातात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणाऱ्या या राजघराण्यातील परिवारावर आदळलेली ही उल्का आहे. सँड्रिंगहॅम इस्टेटमधील ‘वूड फार्म’ येथून पोलिसांनी अँड्रू यांना ताब्यात घेतले.